न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य हे आमच्या राज्यघटनेचे मूलभूत वैशिष्ट्यांपैकी एक आहे -न्यायाधीश पठाण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 24 November 2019

न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य हे आमच्या राज्यघटनेचे मूलभूत वैशिष्ट्यांपैकी एक आहे -न्यायाधीश पठाण


न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य हे आमच्या राज्यघटनेचे मूलभूत वैशिष्ट्यांपैकी एक आहे 
-न्यायाधीश पठाण

किनवट ( प्रतिनिधी ) :
न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य हे आमच्या राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांपैकी एक आहे ; परंतु मोफत न्याय वितरण प्रणालीच्या सुरळीत, कार्यक्षम आणि प्रभावी कामकाजासाठी अनुकूल पायाभूत सुविधा व कामाचे योग्य वातावरण असणे अत्यंत आवश्यक आहे. विकासाची गती सुधारण्यासाठी, कायदा विभागाने 'सर्वांसाठी न्याय ' याकरिताच्या प्रयत्नांवर  लक्ष केंद्रित करून आणि ते एक मिशन म्हणून पुढे केले आहे असे प्रतिपादन न्यायाधीश जहांगीर र. पठाण यांनी केले.
              महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिनस्त तालुका विधी सेवा समिती, तालुका किनवटच्या वतीने येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित केलेल्या 'विधी साक्षरता शिबिरा' चा अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते. यावेळी सह दिवाणी न्यायाधीश जे. एन.जाधव, वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. मिलिंद सर्पे, सहसचिव अॅड. राहूल सोनकांबळे , उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, तालुका विधी सेवा समितीचे सचिव तथा गटविकास अधिकारी सुभाष धनवे, विधी सेवा समितीचे सदस्य निवृत्त प्राचार्य वि.मा.शिंदे, के. मूर्ती, पोलिस निरीक्षक मारोती थोरात हे अतिथी मंचावर उपस्थित होते.
               विधी सेवा समितीचे सदस्य निवृत्त प्राचार्य वि.मा. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. वकील संघाचे सचिव अॅड.ड राहुल सोनकांबळे यांनी 'महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम 2005 ' या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी यांनीही आपले विचार मांडले. सह दिवाणी न्यायाधीश जे.एन. जाधव यांनी 'वैकल्पिक वाद निवारण पद्धती व कायदे या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर अध्यक्षीय समारोप करताना तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर ) जहांगीर र.पठाण यांनी 'समान न्याय व मोफत कायद्याचे सहाय्य ' या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी ते असे म्हणाले की, कायदेशीर मदतीसाठी पात्र असलेल्या लोकांना मोफत कायदेशीर मदत पुरवणे, आपापसात शांतपणे वाद मिटविण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन करणे, त्याचबरोबर न्यायालय किंवा कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेत देय सर्व इतर शुल्क भरण्यासाठी कायदेशीर कारवाईचा सल्ला देणे, कायदेशीर कारवाई ऑर्डर इत्यादीच्या प्रमाणित प्रती मिळवणे कायदेशीर प्रक्रियेत छापील आणि कागदपत्रांचे भाषांतर आणि मुद्रण यासह  पेपर बुक तयार करणे आदी सर्व बाबी या  समितीच्या अंतर्गत मोफत पुरविण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याचा जास्तीत जास्त लाभ तळा -गाळातील सर्वसामान्य जनता, महिला, मुलं, कामगार यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
               याच कार्यक्रमाचं औचित्य साधून "न्याय आपल्या दारी पंधरवाडा " निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेता ओंकार किशोर डांगे ( महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, गोकुंदा ),  द्वितीय हिमांशू रवींद्र राठोड (इंदिरा गांधी विद्यालय, गोकुंदा ) , तृतीय आशिष मुरलीधर केंद्रे ( बळीराम पाटील महाविद्यालय, किनवट ), उत्तेजनार्थ मुस्कान अशरफ खान ( सुमतीबाई हेलसिंग नाईक कन्या माध्यमिक विद्यालय, किनवट ), सपना दत्ता आरके (आदिवासी मुलींचे शैक्षणिक संकुल, पिंपळगाव फाटा ), कृष्णल सतीश पाटील (सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक शाळा, किनवट ) यांच्यासह वक्तृत्व स्पर्धेतील यशवंतांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. त्यानंतर विधी साक्षरता फेरी, वक्तृत्व व  निबंध स्पर्धा या उपक्रमासाठी भरीव योगदान दिल्याबद्दल संस्था सचिव अभियंता प्रशांत ठमके, परिक्षक, शहरातील सहभागी शाळांचे प्राचार्य व मुख्याध्यापकांना 'अभिनंदन पत्र' देऊन गौरविण्यात आले.
              कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक गटविकास अधिकारी राठोड, विस्तार अधिकारी (पंचायत) एस.आर. शिंदे, डी.एल. उडतेवार, राम बुसमवार, ग्रामसेवक रावळे, शिपाई वसंत राठोड व  श्रीमती मुनेश्वर आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास अंगणवाडी कार्यकर्त्या, पर्यवेक्षिका, विद्यार्थी, शिक्षक बहुसंखेनं उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages