समाजाच्या मानसिकतेत बदल घडवून आणणे ही काळाची गरज.. आमदार केराम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 5 December 2019

समाजाच्या मानसिकतेत बदल घडवून आणणे ही काळाची गरज.. आमदार केराम


महिलांच्या संरक्षणासाठी  केवळ कठोर कायदे करून चालणार नाही ;तर समाजाच्या मानसिकतेत बदल घडवून आणणे ही काळाची गरज आहे.
           -आमदार भीमरावजी केराम 
(यांचे पोलिस रेझिंग डे 'वाद - विवाद स्पर्धा ' व महिला विषयक गुन्हेगारी जनजागृती कार्यक्रमात प्रतिपादन )

किनवट :
    अलिकडच्या काळात महिलांवर झालेल्या हिंसाचाराच्या घटना विचारात घेऊन महिलांच्या संरक्षणासाठी विशेष उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे.  केवळ कठोर कायदे करून या समस्या दूर होतील असे नाही.  त्यासाठी समाजामध्ये महिलांबद्दल स्वाभिमान, सन्मान  आणि आदराची भावना निर्माण करणे आणि त्या दृष्टीने समाजाच्या मानसिकतेत बदल घडवून आणणे ही काळाची गरज झाली आहे. असे प्रतिपादन आमदार भीमरावजी केराम यांनी केले.
           साई वंदना मंगल कार्यालय, किनवट येथे उपविभागीय पोलिस अधिकारी किनवट यांच्यावतीने 'पोलीस रेझिंग डे ' निमित्त आयोजित केलेल्या ' वाद-विवाद स्पर्धा '  व 'महिला विषयक गुन्हेगारी ' जनजागृती या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमासाठी दिवाणी न्यायाधीश जहांगीर र. पठाण व सह दिवाणी न्यायाधीश जे.एन. जाधव यांनीही उपस्थिती लावली होती.
            पुढे बोलताना आमदार केराम असे म्हणाले की, महाराष्ट्राला पुरोगामी, सामाजिक व राजकीय सुधारणांची प्रदीर्घ परंपरा आहे. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा असंख्य विभूतींनी महाराष्ट्राची जडणघडण केली आहे.  भारतीय संविधानाने  दिलेल्या मूलभूत हक्क आणि अधिकारानुसार  स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी विशेष कायदे करण्याची तरतूद आहे. सर्व क्षेत्रात महिलांना समान संधी  व समान स्थानही  मिळाले पाहिजे. महिलांसाठी केलेल्या सर्व कायदेशीर तरतुदींची आणि  कार्यक्रमांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली गेली पाहिजे. काही मुठभर लोक अत्याचारी होतात. तेव्हा बाकीच्या पुरुषांनाही स्त्रियां इतकच असहाय्य वाटतं. अशा घटना घडल्या की आपण पोलिसांना दोष देतो. पण एखाद्या अशाच घटनेचे साक्षीदार असतांना आपण आपली जबाबदारी जाणतो का ? हा हिंसाचार रोखण्यासाठी नैतिक शिक्षण, मूल्यशिक्षण यांची गरज आहे.
            पोलीस निरीक्षक  मारुती थोरात यांनी प्रास्ताविक केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजक उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांनी सेट ट्राईबचे  सारंग वाकोडीकर यांच्या साथीने 'महिला विषयक गुन्हेगारी '  या विषयावर पावर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे पुरुष - महिलांशी संवाद साधला. कायद्याची माहिती देऊन सर्वांना सजग केले.
        ' महिलांच्या सुरक्षित वातावरणासाठी कठोर कायद्याऐवजी सामाजिक बदलाची आवश्यकता ' या विषयावर घेण्यात आलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वाद विवाद स्पर्धेतील यशवंतांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. परिक्षक शिक्षण विस्तार अधिकारी अनिल महामुने, प्रा.डॉ. शुभांगी दिवे, वकील संघाचे सचिव अॅड. दिलीप काळे व सावित्रीबाई फुले विचार मंचच्या संस्थापिका प्राचार्या शुभांगीताई ठमके यांनी स्पर्धकांच्या मुद्यांचा पारामर्श घेत विवेचन केले.

स्पर्धेतील यशवंत असे : प्रथम ( सांघीक ) : सरस्वती विद्यामंदीर उच्च माध्यमिक शाळा, किनवट ( सौंदर्या राजाभाऊ पांडव, वैष्णवी लक्ष्मण गुट्टे ) , द्वितीय ( सांघीक ) : महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा ( वैष्णवी नामदेव कुंभार , प्रणाली प्रदीप कांबळे ) , उत्तेजनार्थ ( सांघिक ) : ज्ञानेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय, बोधडी बुद्रूक ( श्वेता शंकर दुधारे, दीक्षा देवेंद्र गायकवाड ) , वैयक्तिक : अनुकूल बाजू : प्रथम : प्रणाली कांबळे, प्रतिकूल बाजू: प्रथम : सौंदर्या पांडव
        पोलिस विभागास वेळोवेळी सहकार्य केल्याबद्दल मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभियंता प्रशांत ठमके, साई मंदीरचे ट्रस्टी पवार स्वामी, सरस्वती शिक्षण संस्था, किनवट नगर परिषदेचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, साई वंदना मंगल कार्यालयाचे प्रा. किशनराव किनवटकर , ज्योती साऊंडचे सिध्दांत नगराळे, कृषी उत्पन्न बाजार समिती व व्हीजन अॅकॅडमी या संस्था व त्यांच्या प्रमुखांना तसेच स्पर्धा संयोजनासाठी धडपडणारे प्रा.डॉ. सुनिल व्यवहारे व प्रा.डॉ. पंजाब शेरे यांना याच कार्यक्रमाचं औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
        कार्यक्रमास विधी सेवा समिती सदस्य के. मूर्ती,वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. मिलिंद सर्पे, प्रा.रामप्रसाद तौर, प्राचार्य डॉ. आनंद भंडारे, पं.स. सदस्य निळकंठ कातले, चैतन्य भारती महाराज, अनिल तिरमनवार, महिला दक्षता समितीच्या सदस्या सुरेखाताई काळे, भावना दीक्षीत, परवीन बेगम, जयश्री भरणे आदिंची उपस्थिती होती.
        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस उप निरीक्षक राजू मोरे,जमादार गजानन चव्हाण, पांडुरंग बोंडलेवार, पोलीस कर्मचारी अप्पाराव राठोड, परमेश्वर गाडेकर, सुनील फोलबुधे, राजू पाटोदे, ज्ञानबा लोकडे, संदीप वानखेडे, सुरेश माने, नागनाथ जेठे, लक्ष्मण भालेराव, गंगाराम कनकावार, ज्योती पिलवार, संजीवनी मुनेश्वर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार,अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा वर्कर, बचत गटाच्या कार्यकर्त्या, शिक्षक,विद्यार्थी - विद्यार्थिनी, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages