विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर यश संपादन करावे -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 20 December 2019

विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर यश संपादन करावे -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर यश संपादन करावे
-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

अमरावती : आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी उपलब्ध साधनसामुग्रीच्या आधारावर एवरेस्टवर यशस्वी चढाई केली आहे. विद्यार्थ्यांमधील क्रीडागुण हेरून विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षणासह साधनसामुग्री उपलब्ध करून दिल्यास हे विद्यार्थी जागतिक किर्तीचे होऊ शकतील. विद्यार्थ्यांनीही सातत्यपूर्ण मेहनत, जिद्दीने जागतिक पातळीवर यश संपादन करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. 

येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात आयोजीत आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.  अध्यक्ष स्थानी पद्मश्री प्रभाकरराव वैद्य हे होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, महापौर चेतन गावंडे, प्रधान सचिव मनिषा वर्मा, विभागीय आयुक्त पियूष सिंह आदी उपस्थित होते.

श्री. कोश्यारी म्हणाले की, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी एवरेस्टची चढाई केल्याचे कौतुक आहे. आपल्यातील तीन विद्यार्थ्यांनी हे लक्ष्य ठेवले आणि पुर्ण केले. येत्या काळात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनीही अशाच प्रकारचे भव्य लक्ष्य ठेऊन ते पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत.आश्रमशाळेत राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी मेहनत आणि जिद्दीने स्पर्धेत सहभागी होऊन यशस्वी व्हावे.
केंद्र आणि राज्य शासन विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करीत आहेत. यासाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा. स्पर्धेत सहभागी व्हावे. शिक्षकांनीही त्यांना प्रोत्साहित करावे. योग्य प्रशिक्षणाने हे विद्यार्थी ऑलिंपिकमध्ये सहभागी होऊन पदक प्राप्त करतील, असा विश्वास श्री. कोश्यारी यांनी व्यक्त केला.

सुरूवातीला राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे पारंपारिक नृत्याने स्वागत करण्यात आले. त्यांनतर राज्यपाल यांनी मिशन शौर्य, अटल आरोग्य वाहिनी, कायापालट, कौशल्य विकास, पेसा, कराडी पथ आदी गॅलरीचे उद्घाटन केले. राणी दुर्गावती आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पूष्पहार अर्पण करुन झेंडावंदन आणि दीपप्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. राज्यपाल यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलीत केली. राज्यपाल यांना सहभागी खेळाडूंनी मानवंदना दिली.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. धोत्रे यांनी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात अनेक नामवंत खेळाडू घडले आहेत. अशा ठिकाणी या स्पर्धा होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. स्पर्धेसाठी आवश्यक असलेले सहकार्य करण्यात येतील. तसेच अशा स्पर्धांमधून आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
श्रीमती वर्मा यांनी प्रास्ताविक केले. नागपूर आदिवासी आयुक्त कार्यालयाने आश्रमशाळा तपासणीसाठी तयार करण्यात आलेल्या ई-निरिक्षण अॅप, तसेच क्रीडा स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Pages