वनविभागाच्या पथकावर लाकूड तस्कराचा हल्ला - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 17 December 2019

वनविभागाच्या पथकावर लाकूड तस्कराचा हल्ला


वनविभागाच्या पथकावर लाकूड तस्कराचा हल्ला
किनवट  :  सागवान तस्करीसाठी कुख्यात असलेल्या चिखली बु. (ता.किनवट) गावात वनकर्मचार्‍यांनी अवैधपणे तोडलेल्या सागवानाने भरलेली बैलगाडी अडविली असता, दोन व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला करून मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पाटोदा येथील वनपाल बाबू जाधव यांनी दिल्यावरून, त्या दोघांविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सदर घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे.

    पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी  वन सर्व्हे क्र.३० मध्ये वनपाल बाबू जाधव  आणि त्यांच्यासोबत वनरक्षक टी.एस.तोटावाड, वनकर्मचारी जी.एस.देवकांबळे, एस.डी.गवळी, व्ही.आर.मुडे, एस.पी.काळे, व महिला कर्मचारी सी.डी.बुरकुले, व्ही.के.पंधरे व वनमजूर एम.जे.पवार हे मौल्यवान सागवानाची तस्करी होऊ नये म्हणून गस्त घालीत असतांना, त्यांना बैलगाडीचा आवाज ऐकू आला. त्या दिशेने सर्वजण गेल्यावर एका बैलगाडीत चोरून तोडलेल्या सागवानाने भरलेली एक बैलगाडी व दोन व्यक्ती चिखली गावाकडे जातांना दिसल्या. त्यांनी गावापर्यंत त्या बैलगाडीचा पाठलाग करीत, गावात आल्यानंतर गाडी समोर जाऊन अडविली.

 त्या बैलगाडीतील शेख कासीम शे.जैनुन व शेख इद्रिस शे.जैनुन रा.चिखली बु. यांनी आरडाओरडा करीत गावातील महिला व पुरुषांना बोलावून घेऊन धिंगाणा घालण्यास सुरूवात केली. त्यात कांही लोकांनी जंगल तुम्हारे बापका है क्या? हमारी रोजी-रोटी जंगलपर है. अगर तुम हमारे सामने दोबारा आये तो जिंदगी मिटा देंगे, अशी धमकी देत सर्व वनकर्मचार्‍यांना धक्का-बुक्की करीत मारहाण केली. तसेच महिला वन कर्मचार्‍यांचे केस पकडून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यापूर्वी सुद्धा एका वनकर्मचार्‍याला जीव गमवावा लागल्याने, सर्व वनकर्मचार्‍यांनी माहोलचा अंदाज घेऊन तेथून माघार घेतली. दुसरे दिवशी सोमवारी (दि.१६) वरीष्ठांशी चर्चा करून सायंकाळी ४:२० ला किनवट पो.स्टे.मध्ये उपरोक्त घटनेची तक्रार केली. त्यावरून उपरोल्लेखित दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक मारोती थोरात करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Pages