न्याय मिळण्याची प्रक्रिया सक्षम बनवा: जनवादी महिला संघटना - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 7 December 2019

न्याय मिळण्याची प्रक्रिया सक्षम बनवा: जनवादी महिला संघटना

न्याय मिळण्याची प्रक्रिया सक्षम  बनवा: जनवादी महिला संघटना

नवी दिल्ली : न्याय मिळण्याची प्रक्रिया अधिक सक्षम बनवली पाहिजे आणि बलात्कार पिडीताना योग्य संरक्षण मिळाले पाहिजे, त्यांची योग्य काळजी घेतली गेली पाहिजे.तसेच अशा घटनात पोलिसांना जबाबदार धरून एन्काऊंटर प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत सखोल चौकशी केली गेली पाहिजे, अशी मागणी  तेलंगाना बलात्कार घटनेच्या पार्श्वभूमीवर    अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात केली आहे.
       अलीकडे घडलेल्या बलात्कार आणि खूनाच्या घटना वा खुनाचा प्रयत्न केल्याच्या घटनांबाबत पोलीस व प्रशासनाद्वारा केली गेलेली कारवाई असो अथवा त्यांच्याकडून कोणतीही कारवाई न करणे असो या दोन्ही  कृतीतून न्याय व्यवस्थेचे जे संपूर्ण अपयश दिसून आले आहे त्याबद्दल अखिल भारतीय जनवादी महिला संघटना तीव्र निषेध व्यक्त करीत आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील तक्रार करण्याची हिम्मत दाखविलेल्या दोनही बलात्कार पिडीतांना खुनी हल्ल्यांना तोंड द्यावे लागले. (येथील दुसऱ्या बलात्कार पिडीतेला जामिनावर सुटलेल्या आरोपींनी जिवंत जाळले) यात पोलीस साक्षीदारांना संरक्षण देऊ शकले नाही.तर तेलंगाना येथील  डॉक्टर असलेल्या एका युवतीचा  बलात्कार व खून केल्याच्या घटनेतील ४ आरोपींना तपास व न्यायालयीन कामकाज सुरु होण्याच्या आधीच पोलीस कारवाईत ठार केले गेले.
       गायब झाल्याची तक्रार द्यायला गेलेल्या त्यांच्या कुटुंबियांना त्यावेळी पोलिसांनी सहकार्य केले नव्हते.  एकीकडे प्रभावशाली वर्गाकडून केली गेलेली आरोपींना मारून टाकण्याची मागणी व दुसरीकडे न्यायालयीन प्रक्रिया सुरु होण्याच्या आधीच आरोपींना मारले जाणे या दोन्ही गोष्टींचा विचार करता पोलीस व प्रशासनाने आपली खरी जबाबदारी पार पाडण्यात जे गुन्हेगारी स्वरूपाचे दुर्लक्ष केले,त्यावरील लोकांचा रोष वळविण्यासाठी केलेला हा कावा आहे.
        पोलीस आपली जबाबदारी पार पाडण्यात जितके अपयशी ठरतील तितके महिलांवरील अत्याचाराच्या घटनात वाढ होत राहील त्याचप्रमाणे आरोप सिद्ध होऊन गुन्हेगारांना सजा मिळण्याचे प्रमाणही कमीच राहील.
      प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनावर अखिल भारतीय जनवादी महीला संघटनेच्या अध्यक्षा मालिनी भट्टाचार्य व महासचिव मरियम ढवळे  यांची नावे आहेत.
-----------------------------------------------

No comments:

Post a Comment

Pages