नायगाव येथे जिल्हा परिषद शिक्षकांची कार्यशाळा संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 11 December 2019

नायगाव येथे जिल्हा परिषद शिक्षकांची कार्यशाळा संपन्न

नायगाव येथे जिल्हा परिषद शिक्षकांची कार्यशाळा संपन्न

नांदेड : 
         नायगाव विधानसभा अंतर्गत येणाऱ्या नायगाव, उमरी आणि धर्माबाद तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची कार्यशाळा नायगावच्या जयराज पॅलेसमध्ये संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाटक म्हणून एस बी आय बँकेचे मनीष शर्मा हे होते. एस बी आय नायगाव शाखेचे पी. रवीकुमार, नांदेड जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर साहेब, नांदेड मनपाचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 
       
        महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यशाळा आयोजित करण्यामागची पार्श्वभूमी नायगावचे गटशिक्षणाधिकारी के के फटाले यांनी मांडली. त्यानंतर एस बी आय नायगाव शाखेचे पी. रवीकुमार यांनी बँकेतील अनेक योजनांची माहिती दिली. त्याचसोबत शिक्षकांनी अर्थ साक्षर होणे आवश्यक आहे असे सांगितले. त्यानंतर शिक्षणाधिकारी दिग्रसकर साहेबांनी कार्यक्रमाची सूत्रं हातात घेऊन नायगाव, उमरी आणि धर्माबाद तालुक्यातील दोन शाळांना सादरीकरण करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यात नायगाव मधून मुखेडकर आणि मेघमाळे मॅडम यांनी शाळेत राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली.

          यादरम्यान माजी शिक्षण सचिव नंदकुमार साहेबांनी आंतरराष्ट्रीय शाळांविषयी ऑनलाईन माहिती सांगितली. झूम अँप द्वारे त्यांना संपर्क करण्यात आला होता. उमरी तालुक्यातून कें. प्रा. शाळा गोरठा येथील उपक्रमशील शिक्षक धृतराज के जी यांनी शाळेतील उपक्रमाची माहिती दिली. याच दरम्यान नायगाव विधानसभेचे विद्यमान आमदार मा. राजेश पवार व नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्या सौ. पुनमताई पवार सदरील कार्यशाळेला भेट देऊन शिक्षकांशी संवाद दिला. त्यानंतर धर्माबाद तालक्यातून कन्या शाळा धर्माबाद येथील उपक्रमशील शिक्षक नासा येवतीकर यांनी वाचू आनंदे या उपक्रमाविषयी पीपीटी द्वारे माहिती दिली.           
         याप्रसंगी धर्माबाद तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी एल. एन. गोडबोले, उमरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सोनटक्के साहेब, बिलोली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी वाय. एस. कौठकर, देगलूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, मुखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी भारती साहेब, कंधार तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय येरमे, लोहा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के,किनवट तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री पवणे सर  शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश पाटील यांच्यासह धर्माबाद, उमरी आणि नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील  शिक्षकांची 100%  उपस्थिती होती.             
         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटसाधन केंद्र नायगावचे सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यशाळेसाठी आलेल्या शिक्षकांची चहापान आणि फराळाची व्यवस्था एस बी आय बँकेने केला होता. सुमारे पाच ते सहा तास चाललेली कार्यशाळा उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.

No comments:

Post a Comment

Pages