26 जानेवारी आज आमच्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला..
आम्ही जगत असताना आम्ही आमच्या स्वप्नांना आकार देण्याचा अधिकार आज च्या दिवशी आम्हास प्राप्त झाला. पण हा अधिकार काय आहे हे आम्हाला कळलेच नाहीत. पण तरीही आम्ही आनंदाने सकाळी उठून घाई-गडबडीत ध्वजारोहण करतो. त्यानंतर दिवसभर आम्ही आमच्या कामात गुंतून जातो. हा आहे आमचा प्रजासत्ताक दिन...
15 ऑगस्ट ला आम्हाला स्वातंत्र्य मिळाले आणि आज या स्वातंत्र्यात आमच्यावर अंमल करण्यासाठी एक नियमावली अमलात आली. पण ही नियमावली काय आहे ? या बद्दल आम्हाला कधीच कोणी काही शिकवलं नाही. हो तस आम्ही नागरिकशास्त्राअंतर्गत संसदीय लोकशाही,मूलभूत अधिकार,मूलभूत हक्क याबद्दल शिकवण्यात आलं. पण ते वयामुळे आमच्या डोक्यात घुसल नाही. शैक्षणिक अभ्यासक्रम हा फक्त अर्धवार्षिक परिक्षेपुरता असतो. त्यामुळं परीक्षेत पास होण्यापूरता आम्ही तो घोकंपट्टी करून त्या-त्या वर्गात पाठ केला व पास झालो. त्या गोष्टीचा आयुष्यात काही संबंध असते हे आम्हाला तेव्हा कळलेच नाही.
पण आज सुद्धा 26 जानेवारीला आम्ही विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने हे सोहळे साजरे केले पण यामुळे आमच्या मनात हक्क, अधिकार किंवा कर्तव्य हे कोठेही आम्हाला कळली नाहीत. जिथे जाल तिथे अडजेस्टमेंट करत रहा. हेच जास्त प्रमाणात शिकण्यात आले. मग या संविधान दिनाचा अर्थ आम्हाला केव्हा कळणार. आजच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम जरूर करा पण त्यात संविधानाचे महत्व, संविधान काय आहे हे सामान्य जनतेला केव्हा समजणार ? काही महिन्यांपूर्वी एक मैत्रीण मला माझी जात विचारत होती. मी माझ्या सवयीनुसार तिला जात सांगणे टाळले. पण तिने माझ्या पुस्तकांमध्ये संविधानाचे पुस्तक बघितल आणि ती म्हणाली, राहू दे आता मला कळली तुझी जात. मी म्हणालो काय आहे सांग बर ? तर ती म्हणाली बाबासाहेबांच्या जातीचा आहेस तू. मी तिला प्रतिप्रश्न केला हा अंदाज कशावरून काढला ? याच उत्तर ऐकल्यानंतर माझा मेंदू सुन्न झाला मी तिला काहीही बोललो नाही. काही क्षणासाठी मी बधिर झालो होतो. तिने दिलेलं उत्तर होत,"तू संविधानाचे पुस्तक वाचतुस ना व संविधानाचे पुस्तक त्याच जातीचे लोक वाचतात." ही आहे संविधानाची किंमत/संविधानाबद्दल भारतीय नागरिकांची मानसिकता. पण तरीही आम्ही निघालोय प्रजासत्ताक दिन साजरा करायला. भारत माता की जय म्हणायला, आज सुद्धा 98-99% शाळेत संविधान दिनाच्या दिवशी बाबासाहेबांचा फोटो लावा अस सांगावं लागते/ तो फोटो तिथे लावावा ही मानसिकता नाही. एक दबाव म्हणून ती प्रतिमा वापरली जाते. ज्या शाळेतून देशाचं भविष्य घडत असते तिथे अशी परिस्थिती तर मग तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर काय संस्कार पडणार आहेत. यात दोष कोणाचा ? शिक्षकांचा, शिक्षण व्यवस्थेचा की पालकांचा ?
या समस्येकडे जर बघितलं तर यात तिघेही दोषी सापडतील. शिक्षक हा शिकवत असताना गर्जेपुरतेच शिकवतो. शिक्षण व्यवस्था कारकून निर्माण होतील अशी आहे. तर पालक आपला पाल्य शिकून एखादी चांगली नोकरी प्राप्त करेल, समाजात आपले नाव मोठं करेल या आशेत असतो.
शिक्षक पाठ्यपुस्तक शिकवत असताना त्यातील अपेक्षित अर्थापर्यंत जातच नाही. ठीक आहे अभ्यासक्रम म्हणून तो नियमात राहून शिकवत असेल पण, जेव्हा विविध सांस्कृतिक कार्यक्रम(जयंती,पुण्यतिथी, विशेष दिन)होत असतात तेव्हा भाषणामध्ये किंवा अन्य सांस्कृतिक माध्यमातून काय सांगतात ? तर ते सांगतात इतिहास. ठीक आहे इतिहास नक्की सांगा काही हरकत नाही. मग वर्गात इतिहास विषयांतर्गत शिकवता ते काय असते ? वर्गातही तेच आणि कार्यक्रमातही तेच सांगणार ? तेच सांगणार असाल तर पुन्हा-पुन्हा तेच सांगता कशाला ? प्रशासनाने नियम घातले म्हणून ? प्रशासनाने तुम्हाला काय शिकवावे हे सांगत असताना त्यातून कोणते गुण विद्यार्थ्यांत रुजले पाहिजेत याची सुद्धा नियमावली दिली आहे. मग त्या नियमावलीनुसार कधी मूल्यमापन केलात का ? याच उत्तर तुम्ही तुमच्या मनाला द्या. मला द्यायची काही गरज नाही. या उत्तराचा जेव्हा विचार करतो तेव्हा संविधानातील मूल्यांचा, अभ्यासक्रमातील घटकांचा आणि तुम्ही अभ्यासक्रमामार्फत दिलेल्या शिकवणीचा विचार करतो तेव्हा, तुम्हाला शिक्षक म्हणतो याबद्दल आमची आम्हालाच लाज वाटते. सांस्कृतिक कार्यक्रमात इतिहास सांगत असताना ज्या महापुरुषांचा इतिहास सांगता तेव्हा कधीतरी त्यांनी तत्कालीन जनतेला त्यांच्या अगोदरचा इतिहास सांगत फिरले अस कधीतरी तुम्ही सांगितलंय का ? मग कोणत्या महापुरुषांचा वारसा किंवा आदर्श विद्यार्थ्यांत रुजवण्याचा प्रयत्न करताय ? विद्यार्थ्यांत आदर्श/नवनिर्माणाची प्रेरणा निर्माण करायची असेल तर त्यांची विचारशक्ती,चिकित्सक बुद्धी विकसित करा. महापुरुष कधीही जनतेपुढं इतिहास मांडत बसलेत का ? याचा कधी उहापोह केलाय करणार आहात ? इतिहास सांगत असताना तुम्ही त्यांचे चरित्र सांगत बसता. पण ते चरित्र ऐकून ऐकून त्याचा चोथा झालाय. याचा कधी तुमच्या डोक्यात विचार आलाय का ? याच कस आहे बघा कोणत्याही गोष्टीचा चोथा झाल्यानंतर काय होते हे आपणास सांगण्याची गरज नाही. तेवढे तर सुजाण असालच शिक्षक म्हणून नाही पण वयपरत्वे बुद्धीने प्रौढ आहातच. मग या प्रौढपणाचा काय फायदा ? तुम्ही शिक्षक आहात म्हणजे देशाचं भविष्य वाया घालवताय ? जो शिक्षक स्वतःत जात,धर्म, महापुरुष यांच्याबद्दल द्वेषभाव ठेवून शिकवत असतो तो त्याच भावना विद्यार्थ्यांत रुजवतो. तसा शिक्षक या देशाचा खरा अणूबॉम्बनिर्मिती पेक्षाही घातक बॉम्ब निर्मितीचा कारखाना आहे. बॉम्ब हा एका ठिकाणी गर्दीनुसार लोकांना मारतो पण अशा शिक्षकांच्या हाताखालून हजारो विद्यार्थी बाहेर पडत असतात. हे सर्व विद्यार्थी त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे येतात. तोच विचारांचा वारसा घेऊन जगासोबत जेव्हा व्यवहार करतात तेव्हा देशाला होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी कोण घेणार ? आतंकवादी हल्ल्याची जबाबदारी अमुक अमुक संघटनेने घेतली अस आपण म्हणतो आणि मोकळे होतो. पण ज्या शिक्षणरूपी क्षेत्रातून देशाचं भवितव्य घडवणारा विद्यार्थी बाहेर पडतो तो विद्यार्थी डॉक्टर झाला तर ज्या लोकांचे बळी जातील त्याला कारणीभूत कोण ? जे इंजिनियर होतील त्यांच्या हातून घडलेल्या अयोग्य कामामुळे झालेल्या देशाच्या आर्थिक-मानवी नुकसानिस जबाबदार कोण ? असा प्रत्येक क्षेत्रात जाणारा विद्यार्थी हा देशाला घातक असतो मग या घतकतेला जबाबदार कोणाला धरणार ? म्हणजे या प्रजस्ताकात आम्हाला कायद्याने गोष्टी मिळत आहेत पण त्या मनाणे अंमलबजावणीसाठी केव्हा सक्षम बनणार आहोत ? कागदी घोडे नाचवणारे विद्यार्थी घडवले तर देश विकसित कधीही होणार नाही.
यातला दुसरा घटक म्हणजे शिक्षण व्यवस्था. या व्यवस्थेने फक्त बैल घडवण्याचे काम केलेत. स्वतःच्या मेंदूचा वापर न करता गप्प गुमान जगण्याचा विचार या व्यवस्थेने मनावर लादला आहे. ही व्यवस्था फक्त गुलाम घडवण्याचे काम करते. कारण शिक्षण घेऊन बाहेर पडणारा विद्यार्थ्यांपैकी बरेच विद्यार्थी नोकरी मिळत नाही म्हणून बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या करतो.(शेतकरी आत्महत्येपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे.) तेव्हा या गोष्टीसाठी जबाबदार कोणाला धरणार ? यात दोषी आहे ती व्यवस्था ? बॉम्ब हल्ले झाल्यानंतर पीडितांच्या नातेवाईकांना मदत करता. शेतकरी आत्महत्या केला तर त्यांच्या कुटुंबाला मदत करता. म्हणजे तुम्ही एखाद्यावर संकट आले तरच तुम्ही त्याची दखल घेता अन्यथा त्याच्या कडे लक्ष सुद्धा देणार नाही ? 1950 नंतर भारताचा सर्वांगीण विकास व्हायला किती वर्षे लागली असती हो ? मग अद्यापपर्यंत का नाही झाला ? याच मूळ कारण ? आम्ही प्रश्न उपस्थित करत नाही आणि जो करेल त्याला साथ देत नाही. प्रश्न उपस्थित करन हा तुमचा अधिकार आहे. एवढं तरी माहीत आहे का बरं तुम्हाला ? का फक्त नंदी बैल. या शिक्षकांनी आणि शिक्षण व्यवस्थेने येथे फक्त नंदीबैल घडवलेत. मग या नंदीबैलाच्या देशात सुरक्षित लोकशाहीची अपेक्षा तरी कशी करावी ? जी शिक्षण व्यवस्था तुम्हाला जगण्याचा अर्थ समजावू शकत नाही ती शिक्षण व्यवस्था देशाला घातकच ठरेल ना...? त्यामुळं या समस्येला ही शिक्षण व्यवस्था सुद्धा तेवढ्याच प्रमाणात घातक आहे. प्रजासत्ताक दिनी आम्हाला काय करायला हवं, कोणत्या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार करायला हवा याच भान आम्हाला नाही आणि मिरवतो आम्ही उच्चशिक्षणाच्या डिग्र्या घेऊन.
तिसरा घटक आहे पालक, म्हणजेच आई-वडील. या मुद्द्यावर ज्या काही बाबी येतील त्यात सध्याचे पालक आणि 10-15 वर्षापूर्वीचे पालक यांच्यात काहीही तफावत नाही. अगोदरचे पालक अज्ञान होते व आताचे सज्ञान आहेत. तरीही पालक आपल्या पल्याबद्दल सजग नाहीत. शिक्षण व्यवस्थेत आपला पाल्य जास्तीत-जास्त तावून सुलाखून निघावा ही अपेक्षा प्रत्येक पालक करतो पण ही अपेक्षा करत असताना तो उत्तम अशी नोकरी करेल व वृद्धत्वाचा आधार व्हावा. अशी अपेक्षा ठेवली जाते. त्यातून विविध बंधन त्याच्यावर लादली जातात. या सर्व गोष्टीत पाल्याच्या मानसिक विकासाकडे लक्ष दिल्या जात नाही. सध्या 10 वी व 12 वी च्या निकलादरम्यान जर आपण वर्तमान पत्र हातात घेतले तर रोज विद्यार्थी आत्महत्त्येच्या बातम्या आम्हाला पाहायला मिळतात. वयाच्या 16 ते 18 व्या वर्षी विद्यार्थ्यांना जर मानसिक प्रगल्भता येत नसेल, काय योग्य व काय अयोग्य हे कळत नसेल तर शिक्षण व्यवस्थेसोबत पालकांची भूमिका सुद्धा यात महत्वाची ठरते. माझा पाल्य समाजात माझी मान उंचावेल असे पराक्रम करेल अशी अपेक्षा करतो. पण ही अपेक्षा करत असताना त्याला त्याच्या आवडीचे क्षेत्र सुद्धा निवडू देत नाही. बालवयापासून त्याच्यावर आम्ही अभ्यासच बंधन टाकतो पण आम्ही त्याला कधीही प्रत्येक बाबीचा विचार करण्याची सवय लावत नाही. यातून आपला पाल्य कधी पुस्तकी किडा होऊन जातो ते आपल्याला कळतच नाही. यातून एखादा निर्णय घेत असताना तो निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यात विकसित होत नाही. मग आपल्या परीक्षेचे निकाल येण्यापूर्वीच नापास होण्याच्या भीतीने आत्महत्या करतो. पण आम्ही त्याला कोणत्याही समस्येला कसे धीराने समोर जायचे हे कधी शिकवणार आहोत का ? आयुष्यात अपेक्षा ठेवण्याऐवजी उत्तम कष्ट आणि सम्यक प्रयत्न याची जर पाल्याला सवय लावली तर येणाऱ्या बऱ्याच समस्या कमी होतील. निर्णय क्षमता, चिकित्सक बुद्धी, सम्यक विचार या बाबी जर पाल्यात रुजल्या तर तो आपला विकास नक्कीच करून घेईल व आपला विकास करत असताना आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तींच्या विकासाचा नक्कीच विचार करेल. असे जर घडले तर मग ही खरी देशभक्ती. का राष्ट्रीय सणाच्या दिवशी ध्वजारोहण करणे, देशभक्तीपर गाणे ऐकणे ही देशभक्ती ?
देशभक्ती म्हणजे तरी काय ? देशभक्ती म्हणजे देशाचा विकास, देशाचा विकास म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकांचा विकास होय. पण येथे देशातील प्रत्येक नागरिकांचा विकासाचा विचार होतोय का ? येथे काही विशिष्ट व्यक्तींच्याच खिशात आर्थिक संपत्ती जातेय आणि बाकीचे भुके कंगाल राहतात. मग अशावेळी देशप्रेम कुठे असते ? देशाचा जर खरच अभिमान असेल ना तर इथला प्रत्येक माणूस सधन झाला पाहिजे ही भावना आपल्या मनात निर्माण व्हावी लागेल. पण तशी भावना आमच्या मनात निर्माण होणे शक्यच नाही. मग या बेगड्या देशभक्तीची उधळण आमच्या समोर करू नका. लाज बाळगा जरा. शेजारच्याच भल झालेलं किंवा आपल्या सक्क्या भावच भल झालेलं आम्हाला पाहवत नाही मग देशाचा विकास कसा होईल ? देशभक्ती म्हणजे देशावरचे गाणे ऐकणे देशाबद्दल चांगलं-चांगल बोलणे, वंदे मातरम, जण-गण-मन म्हणणे म्हणजे देशभक्ती न्हवे.अरे या पैकी काहीही नाही म्हटलं तर काही देश अधोगतीला जाणार नाही. देशातल्या प्रत्येक नागरिकांचा सामाजिक, आर्थिक, मानसिक विकास म्हणजे तुमच्या देशाचा विकास होय. देश डबघाईला जातोय आणि आम्ही सोहळे साजरे करण्यात मग्न. सोहळे साजरे करणे म्हणजे मनाचा विरंगुळा आहे. मनाला विरंगुळा तेव्हाच हवा असतो जेव्हा पोटाला पोटभर व तेही सन्मानाने मिळत असते. देशात आजही करोडो लोक एक वेळच्या जेवणावर दिवस काढतात तर दुसरीकडे अन्न आवडीचं नाही भेटलं तर जीव घेतात. ही मानसिकता येते कोठून ?
प्रत्येक वेळी तेच गाणं- तेच पताके, तोच तिरंगा ध्वज या असल्या देशभक्तीने देशाचं काहीही भल होणार नाही. हे सर्व करू नये असं मी म्हणत नाही. पण हे प्रतिकातील देशभक्तीने आमचा विकास होणार आहे का ? कोणी वंदे मातरम नाही म्हटले म्हणून त्याला देशद्रोही घोषित करून आम्ही मोकळे होतो. पण येथे शासन, प्रशासनातील, न्यायमंडळ आणि पत्रकारितेतील प्रत्येक जण आपली भूमिका योग्य रीतीने पार पाडत नाही. त्याला का देशद्रोही घोषित करत नाही. कारण देशात राहून देशाच्या विकासाचे काम न करता स्वतःचे खिसे भरण्याचे काम हे सर्व करत असतात. मग या पावलो-पावली भेटणाऱ्या देशद्रोह्यांचं काय ? धर्मावरून देशद्रोह्यांचे विशेषण देणाऱ्यांनो सांभाळा जरा स्वतःला या गुलामी शिक्षण व्यवस्थेच्या संस्कारातून बाहेर या व स्वत गुलाममुक्त जीवन जगा. समतेच्या बड्या बड्या बाता ठोकणारा येथे स्वतः आपल्या वरिष्ठांचा गुलाम असतो. मग एक गुलाम दुसऱ्या गुलामाला गुलामीतून मुक्त कसा करेल ?
प्रजासत्ताक दिनी तुम्हाला तुमच्या कार्याचे भान तुम्हाला द्यावं लागतं म्हणजे तुमची अजूनही वैचारिक गुलामी संपली नाही. ती आधी नष्ट करून घ्या. मगच देशभक्तीच्या गप्पा मारा.
- जी.संदीप (नांदेड)
9552803980
No comments:
Post a Comment