महिला आणि मुलांना सुरक्षित रहाता यावे यासाठी कायद्याचे कवच - यशवंत भंडारे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 4 January 2020

महिला आणि मुलांना सुरक्षित रहाता यावे यासाठी कायद्याचे कवच - यशवंत भंडारे


महिला आणि मुलांना सुरक्षित रहाता यावे यासाठी कायद्याचे कवच
- यशवंत भंडारे

लातूर : महिला आणि मुलांना सुरक्षित रहाता यावे , त्यांना निर्भेळपणे सर्वत्र वावरता यावे , आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रामुख्याने डिजिटल तंत्रज्ञान , सायबर  सुरक्षा त्यांना मिळावी ,त्यांचे कोणत्याही स्वरूपात शोषण होऊ नये आदी कारणासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध कायदे केले आहेत .त्यामुळे महिला आणि मुलांना कायद्याचे सुरक्षा कवचच प्राप्त झाले आहे ,असे प्रतिसाद येथील  विभागीय माहिती उपसंचालक यशवंत भंडारे यांनी आज येथे केल.

         जिल्हा पोलिस दल, कॉक्सीट कॉलेज व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विदयामाने कॉक्सीट कॉलेजमध्ये आयोजित  “सायबर सेफ वूमन” बाबतच्या कार्यशाळेत श्री . भंडारे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून  महापौर विक्रांत गोजमगुंडे, रॉयल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.एम.आर. पाटील,विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक यशवंत भंडारे, बाल विकास समितीच्या अध्यक्ष उमा व्यास, कॉक्सीटचे प्राचार्य नितीश झुल्पे, सायबर चे पोलिस निरीक्षक नानासाहेब उबाळे अदि मान्यवर उपस्थित होते.


       यावेळी अध्यक्षीय समारोप करतांना  श्री .  सांगळे  म्हणाले की, प्रत्येक महिलेने सायबर साक्षर असणे ही काळाची गरज आहे. शासनाने व पोलिस विभागाने महिला सुरक्षितेच्या दृष्टीने उपलब्ध केलेल्या वेबसाईट, मोबाईल ॲप, हेल्पलाईन क्रमाकांवर पीडित महिला व त्यांच्या नातेवाईकांनी तक्रारी दिल्या पाहीजेत. अशा तक्रारी आल्यास पोलिस विभागामार्फत तात्काळ प्रतिसाद दिला जातो, असे त्यांनी सांगितले त्याकरिता महिला व विद्यार्थींनींनी आपल्या मोबाईलमध्ये सुरक्षाविषयक शासनाने उपलब्ध् केलेले हेल्पलाईन क्रमांक, तसेच ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन ही  त्यांनी केले.

          प्रत्येक महिला व बालक सुरक्षित राहिला पाहिजे. याकरिता पोलिस प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे.परंतु सध्याच्या अधुनिक जगात प्रत्येकाने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन सायबर सुरक्षितता बाळगावी. तसेच अन्याय झालेला असेल तर त्याबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे तक्रारी द्याव्यात जेणेकरून गुन्हेगारांवर अंकुश ठेवता येईल ,  असे मत  महापौर विक्रांत गोजमगुंडे  यांनी व्यक्त केले . तसेच लातूर शहर व जिल्हा पोलिस विभागाच्या चांगल्या कामांमुळे सुरक्षित असल्याचे ही त्यांनी सांगितले.

            उपसंचालक श्री . भंडारे म्हणाले , महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचा हक्क उपलब्ध् करुन दिला. त्यामुळे महिला शिक्षित होत असल्या तरी त्या सुरक्षित नाहीत कारण स्त्रीया व बालकांचे शोषण मोठया प्रमाणावर होते. शासनाकडून महिला व बाल संरक्षणाचे अनेक कठोर कायदे करण्यात आलेल आहेत. महिलांना त्याकरिता विविध सुविधा ही उपलब्ध  केलेल्या आहेत. महिलांनी ही स्वत:हून  सजगता ठेवावी. त्याप्रमाणेच इतरांच्या स्पर्शाची भाषा महिला व बालकांना समजल्यास अधिक सुरक्षित राहता येईल कारण आपणास चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श नेमका कळतो . याबाबत पालकांनी आणि शिक्षकांनी माहिती दिल्यास  मुलांना स्वसंरक्षण करता येईल  , असेही  उपसंचालाक भंडारे यांनी स्पष्ट केले. तसेच प्रसार माध्यमांनी ही अत्याचार पिडित महिला व बालकांची ओळख प्रसिध्द  होणार नाही याची दक्षता घ्यावी असे त्यांनी आवाहनही   केले.

            बालकल्याण समितीच्या अध्यक्षा श्रीमती व्यास यांनी महिला सायबर सुरक्षे बाबत विदयार्थीनीशी संवाद साधला. मुलींना चांगले -वाईट गोष्टीचे ज्ञान असले पाहिजे. त्यामुळे त्यांची फसवणूक होऊ शकत नाही, याची  काल्पनीक उदाहरणासह माहिती त्यांनी देऊन विद्यार्थिनींना  सुरक्षेचे महत्व सांगितले.  तसेच अन्याय झाल्यास तो सहन  न करता अन्यायाला वाचा फोडली पाहिजे , असे प्रतिदान त्यांनी केले.

          प्रारंभी क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. सायबर सेलच्या  सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपाली गीते यांनी सायबर सेफ वूमन कार्यशाळा आयोजनाच्या मागचा  उद्देश प्रस्ताविकामध्ये सांगितला.


           मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सायबर सेफ वुमेन मोहिमेबाबतचा व्हिडिओ  संदेश कार्यशाळेत दाखवण्यात आला. या संदेशात श्री ठाकरे यांनी काळ बदलतोय जग पुढे जात आहे त्याबरोबरच गुन्हेगार विश्व ही बदलत आहे. डिजिटल युगाचे फायदे व उणिवाही आहेत. गुन्हेगारी विश्व आपले रूप बदलत आहे. नवे माध्यम म्हणून सायबर गुन्हेगारीकडे हे विश्व आले आहे. यामध्ये महिला व बालकांना लैंगिक अत्याचारासाठी शिकार बनवले जात आहे म्हणूनच महाराष्ट्र शासनाने महिला व बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर सेफ वुमेन मोहीम सुरू केलेली आहे, आपण ही या मोहिमेला सहकार्य करावे व आपल्या माता बालकांना सुरक्षित ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचाही सायबर सेफ वूमन बाबतचा व्हिडिओ संदेश कार्यशाळेत उपस्थितांना दाखविण्यात आला.

               यावेळी कॉक्सीट कॅालेजचे प्राचार्य झुल्पे यांनी सायबर सुरक्षेबाबत सर्व बेसिक माहिती सादरीकरणाद्ववारे दिली. तर पोलिस निरीक्षक उबाळे यांनी महिला सुरक्षा व सायबर कायदे याबाबतचे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस कॉक्सीट कॉलेज मधील विदयार्थीनी, महिला पोलिस स्वंयसेवी संस्थांच्या महिला प्रतिनिधी, पत्रकार व नागरिक मोठया संस्थेने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती गायकवाड यांनी केले तर आभार जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Pages