कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेची प्रतिबंधात्मक उपाययोजना
किनवट : कोरोना बाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून घाबरुन जाऊ नये, शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन मुख्याधिकारी नीलेश सुंकेवार,आरोग्य निरीक्षक चंद्रकांत दुधारे यांनी नुकतेच केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील पालिकेने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही पालिकेने केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने प्रभागनिहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.सबंध शहरात कोरोनाबाबत जनजागृती होण्यासाठी ध्वनीक्षेपकाद्वारे सूचना तसेच हस्तपत्रके वाटण्यात येत आहेत.मुख्यरस्ते,गर्दीच्या ठिकाणी कोरोनाची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना याची माहिती दर्शविणारे डिजिटल बॅनर्स लावण्यात आले आहेत. शिवाय,सर्व प्रभागांतील नाले सफाईवर विशेष लक्ष देऊन नाल्यांत किटकनाशक पावडर व धूर फवारणी करण्यात येत आहे.दिवसातून दोन वेळा सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता,घनकचरा व्यवस्थापन कामाला अधिक गती देण्याची सूचना संबंधितांना देण्यात आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व महाविद्यालये, शाळा, अंगणवाड्या,बालवाड्या, खासगी शिकवण्या,चित्रपटगृह, आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले.शहरालगत असलेल्या गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात संशयित रुग्णांकरीता विशेष कक्ष स्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले. शहरातील सर्वच डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांच्या मार्गदर्शक सूचना जाणून घेण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment