कोरोना सारख्या संकटावर मात करण्यासाठी शेतक-यांना भक्कम मदतीची गरज -काॅ. शंकर सिडाम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 8 April 2020

कोरोना सारख्या संकटावर मात करण्यासाठी शेतक-यांना भक्कम मदतीची गरज -काॅ. शंकर सिडाम


कोरोना सारख्या संकटावर मात करण्यासाठी शेतक-यांना भक्कम मदतीची गरज -काॅ. शंकर सिडाम



         जगाला विळखा घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोनाचा ज्या गतीने आणि पद्धतीने प्रसार होतो ते पाहता देश समुदाय संसर्गाच्या तिस-या फेजमध्ये जाऊ नये यासाठी लॉकडाऊन अपरिहार्य होते. देश लॉकडाऊन होण्यापूर्वीच आपण महाराष्ट्रात लॉकडाऊन केला या दक्षतेबद्दल राज्य सरकारचे  अभिनंदन. सर्वांनी घरात राहून या लॉकडाऊनला सहकार्य करणे आवश्यक आहे. किसान सभा यासाठी आपल्या प्रयत्नांना संपूर्ण पाठिंबा देत आहे. सहकार्य करत आहे.
     कोरोनाच्या साथीचे देशावर दूरगामी परिणाम होणार आहेत. कोरोना पूर्वीचे देश व नंतरचे देश यात मोठा फरक असणार आहे. देशाचे ‘आग्रह व प्राधान्य’ बदलणारी ही साथ आहे. नफ्याचे  डोंगर उभे करत असताना जो प्रचंड विध्वंस आपण आपल्या पर्यावरणाचा, जीवसृष्टीचा, निसर्गाचा, जीवनमूल्य आणि जीवनशैलीचा केला, याबाबत मुलभूत विचार करायला लावणारी ही साथ आहे. आपण असे केले नाही, तर कदाचित कोरोना ही पुढील असंख्य विध्वंसक संकटाच्या मालिकेची सुरुवात असणार आहे. कोरोना ‘पूर्वसूचना’ आहे. निसर्गाने दिलेली ‘चेतावणी’ आहे. कोरोना नंतरचे जग, ही चेतावणी नक्कीच गांभीर्याने घेईल. विशेषतः महाराष्ट्राचे सरकार व महाराष्ट्रातील जनता ही चेतावणी गांभीर्याने घेईल, आगामी काळात विकासाची धोरणे आखताना या अनुभवाच्या प्रकाशात धोरणे आखली जातील. कॉर्पोरेट व शहरी विकासाचा अतिरेकी एकारलेपणा टाळून ग्रामीण भाग, शेती, पर्यावरण, जैववैविध्य, माणुसकी, मानवी मूल्य याबाबत मुलभूत विचार करून आगामी काळात धोरणे ठरविली जातील, अशी आशा किसान सभा करत आहे.

कोरोना साथीचा अत्यंत वाईट परिणाम देशाच्या  अर्थव्यवस्थेवर होणार आहे. केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट धार्जिण्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था अगोदरच संकटात आहे. बहुसंख्य भारतीयांची वस्तू व सेवा खरेदी करण्याची क्षमता (क्रयशक्ती) क्षीण झाली आहे. लॉकडाऊनमुळे ती आणखी क्षीण होणार आहे. देश यामुळे महामंदीच्या खाईत ढकलला जाणार आहे. कोरोना प्रतिबंधाचे उपाय करत असताना, या महामंदीतून मार्ग काढण्यासाठी आत्तापासूनच पावले टाकण्याची आवश्यकता आहे. शेती वाचविण्यावर यासाठी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. देशाची याकाळात अन्नाची गरज भागविण्यासाठी सुद्धा ते आवश्यक आहे. त्याचप्रमाणे
कोरोनामुळे तालुक्यातीले शेतक-यांवर मोठे संकट कोसळले आहे. सरकारने शेतीमालाची वाहतूक लॉकडाऊनमधून वगळली आहे. प्रत्यक्षात मात्र भाजीपाला, फळे, पशुखाद्य, चारा  व धान्य वाहतुकीमध्ये शेतक-यांना अडचणी येत आहेत.  शेतमाल व भाजपाला शेतकरयाला कडुन कवडीमोल भावाने विकावा लागतो आहे तर ग्राहकाला चड्या भावाने खरेदी करावी लागत असल्याने हि तफावत दुर करणे व शेतक-यांच्या या संबंधीच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
कोणतीही पूर्वसूचना व पूर्वतयारी न करता अचानक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. किमान जगभर मृत्यूचे तांडव सुरू असताना तरी असे अपेक्षित नव्हते. स्थलांतरीत  मजूर, स्थानिक श्रमिक व ऊसतोडणी कामगारांचे यामुळे अतोनात हाल झाले. लेकराबाळांसह त्यांना शेकडो किलोमीटर उपाशीपोटी उन्हातान्हात पायी चालत गावांकडे निघावे लागले.  तालुका स्तरावर निवारा, अन्न व आरोग्य सुविधा पुरवून या मजुरांची काळजी घेणे गरजेचे आहे.
आपली सार्वजनिक  वितरण व्यवस्था (रेशन) कमकुवत असल्यामुळे आज सरकारने जाहीर केलेले रेशन अद्यापही अनेक गरजूंपर्यंत आपण पोहचवू शकलेलो नाही. रेशन तथा केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजना तातडीने गरजूंपर्यंत पोहचतील अशी व्यवस्था सरकारने करावी. तसेच आगामी काळात सार्वजनिक वितरण व्यवस्था खूप जास्त मजबूत करणे गरजेचे आहे असे अखिल भारतीय किसान सभा   नांदेड जिल्हा सचिव काॅ.शंकर सिडाम व माहुर तालुका सचिव काॅ. राजकुमार पडलवार यांनी बोलताना वयक्त  आहे.

No comments:

Post a Comment

Pages