विशेष लेख: मायेचा निवारा...आणि माणुसकीची प्रचिती... किनवट प्रशासन करतय 74 परप्रांतीय नागरिकांची अन्न-वस्त्र-निवाऱ्याची सोय... - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 9 April 2020

विशेष लेख: मायेचा निवारा...आणि माणुसकीची प्रचिती... किनवट प्रशासन करतय 74 परप्रांतीय नागरिकांची अन्न-वस्त्र-निवाऱ्याची सोय...

विशेष लेख:

मायेचा निवारा...आणि माणुसकीची प्रचिती... किनवट प्रशासन करतय 74 परप्रांतीय नागरिकांची अन्न-वस्त्र-निवाऱ्याची सोय...



कोरोना विषाणू संसर्गा पासून बचाव व्हावा म्हणून देशभरात जाहीर झालेल्या लॉक डाउन नंतर अनेक लोक रोजगारासाठी इतर राज्यातून महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याच्या किनवटमध्ये अडकलेले होते. या अवस्थेत जिल्हाबंदी आणि राज्याच्या सीमाभाग प्रवेशासाठी बंद झाल्याने या नागरिकांची राहण्याची व जेवणाची सोय किनवटचे सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केली.



किनवटमध्ये दोन निवारा गृहांमध्ये सोय केली असून यामध्ये इतर राज्यातून एकूण 73 व्यक्तीची संख्या आहे. शिवाजी मंगल कार्यालयात राजस्थान मधील 36 व गुजरात मधील 2 तसेच दुसऱ्या निवारा गृह हे शासकीय आश्रम शाळांमध्ये तयार केले असून 33 नागरिकांची सोय यामध्ये करण्यात आली आहे. ठिकाणी राजस्थान मधील दोन, बिहार मधील 7, उत्तर प्रदेश मधील तीन आणि मध्यप्रदेश मधील 21 अशा विविध राज्यातील नागरिकांची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. या दोनही निवारा गृहांमध्ये नागरिकांना दोन वेळचे जेवण, चहा-नाश्ता तसेच स्वयंसेवी संस्थांकडून फळे पुरवण्यात येतात. त्याचप्रमाणे दिनचर्यामध्ये सकाळी योगाचे प्रशिक्षण वर्ग दररोज घेतले जातात. या नागरिकाना मास्कचे वाटप करण्यात आले असून त्यांच्या दोन्ही निवारागृहच्या ठिकाणी फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण केले आहे.

व्यक्तींना मानसिक आधार मिळावा म्हणून प्रशिक्षीत समुपदेशकांमार्फत त्यांचे समुपदेशनही केले जात आहे. जेणेकरुन त्यांच्यामध्ये एकलेपणाची भावना येऊ नये तसेच मनोरंजनाची सुविधा म्हणून टीव्ही बघण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. या 73 जणांची प्रत्येकांची आरोग्य तपासणी केली असून आरोग्याच्या बाबतीतही किनवट प्रशासन जागरुकतेने व आस्थेने लोकांना काळजी घेत आहे. त्याचबरोबर सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी देखील त्यांच्या सेवेत तत्पर आहेत.

या नागरिकांपैकी मोहम्मद शकील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले की, "सर्व व्यवस्था उत्तम केली असून आमची खूप छान काळजी घेतली जाते, स्वच्छतेच्या बाबतीत आरोग्य तपासणी करुन आमच्या आरोग्याची काळजी घेतली जाते."

माणूस कितीही बदलला, प्रगत झाला तरी माणसातील माणूसपणाची संवेदना आजही जागृत आहे. तीच संवेदना घेऊन नांदेड जिल्हा प्रशासनाअंतर्गत किनवट प्रशासनानी या नागरिकांची ज्याप्रकारे मायेने आणि आपुलकीने व्यवस्था केली, यावरुन असे म्हणता येईल की प्रशासनाचा मानवी चेहरा संवेदना जपत जबाबदारीने काम करते आहे आणि गरजूंना मायेचा निवारा व माणुसकीची प्रचितीच देत आहे.

- मीरा ढास,प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी नांदेड

No comments:

Post a Comment

Pages