मुंबई, दि. २२ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पावले उचलली असून राज्यात २५८ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली आहे.
टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये ज्या २५८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे त्यापैकी ८ गुन्हे अदखलपात्र आहेत.
यामध्ये बीड २७, पुणे ग्रामीण २०, मुंबई १७, कोल्हापूर १६, जळगाव १४, सांगली ११, नाशिक ग्रामीण १०, नाशिक शहर १०, जालना ९, सातारा ८, नांदेड ८, परभणी ७, लातूर ७, ठाणे शहर ६, सिंधुदुर्ग ६, बुलढाणा ६, ठाणे ग्रामीण ६, गोंदिया ५, हिंगोली ५, नागपूर शहर ५, नवी मुंबई ५, सोलापूर ग्रामीण ५, अमरावती ४, पुणे शहर ४, सोलापूर शहर ३, रायगड २, धुळे २, वाशिम १,औरंगाबाद १ (एन.सी) यांचा प्रामुख्याने समावेश आहे .
या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले, तेव्हा असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी ११४ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी ९० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी ६ गुन्हे तर ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्याप्रकरणी ४३ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत ५७ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी ३१ आक्षेपार्ह पोस्ट्स टेक डाऊन करण्यात यश आले आहे.
ठाणे ग्रामीण
ठाणे ग्रामीण जिल्ह्यांतर्गत उत्तन सागरी पोलीस स्टेशनमध्ये अजून एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ज्यामुळे ठाणे ग्रामीण जिल्ह्यांतर्गत नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ६ वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने एका कोरोना बाधित व्यक्तीस क्वारंटाईन करण्यासाठी ॲम्ब्युलन्समधून घेऊन जात असतानाचा व्हिडिओ बनवून, सदर व्हिडिओ चुकीच्या माहितीसोबत व्हाट्सअपद्वारे प्रसारित करून, कोरोना महामारीबद्दल चुकीची माहिती देऊन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
गोंदिया
गोंदिया तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे ज्यामुळे आता जिल्ह्यातील नोंदणीकृत गुन्ह्यांची संख्या ५ वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने परिसरातील दुकाने चालू असण्याच्या वेळेबाबत खोटी माहिती पसरवून संबधित जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश चुकीचे आहेत अशा आशयाची पोस्ट्स व्हाट्सअपद्वारे पसरविली होती.
No comments:
Post a Comment