स्वारातीम विद्यापीठामध्ये कोरोना संसर्गजन्य आजारांमधील लाळेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळा सुरु - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 22 April 2020

स्वारातीम विद्यापीठामध्ये कोरोना संसर्गजन्य आजारांमधील लाळेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळा सुरु



स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील इंक्य्युबेशन केंद्रांमध्ये कोरोना संसर्ग लाळ तपासणी प्रयोगशाळा आज बुधवार दि.२२ एप्रिल पासून सुरु करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) नुकतीच मान्यता प्राप्त झालेली आहे. सदर प्रयोगशाळा नांदेड विद्यापीठांमध्ये सुरू करण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले आणि जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या अथक परिश्रमातून महाराष्ट्रातील पहिल्या अकृषी विद्यापीठामध्ये सुरु करण्यासाठी यश प्राप्त झाले आहे.

जगभरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढत आहे. या आजारांमध्ये लवकरात लवकर आजाराची नमुने तपासण्यात आली तर त्यावर तेवढ्याच तत्परतेने इलाज करता येतो. याच अनुषंगाने ही प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे. यापूर्वी नांदेड आणि आसपासच्या जिल्ह्यातील लाळेचे नमुने औरंगाबाद आणि पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात येत होते. आता यानंतर येथे ही सुविधा उपलब्ध केल्यामुळे अगदी काही तासात निकाल लागणार आहे. या प्रयोगशाळेतमध्ये प्रतिदिन जवळपास पाचशे नमुन्याच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. या प्रयोगशाळेमध्ये जनुकीय मटेरियलद्वारे व्हायरसचे निदान होणार आहे.

विद्यापीठाच्या इंक्य्युबेशन केंद्रासाठी यापूर्वीच रुसा कडून रु.५ कोटी एवढा निधी मिळाला होता. त्यामुळे अत्याधुनिक अशा उपकरणाची उपलब्धता आहे. याशिवाय प्रयोगशाळेसाठी अजून आवश्यक असलेले उपकरणे व सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रु.५२ लक्ष मंजूर केले आहेत. प्रयोगशाळेसाठी लागणारे अत्याधुनिक उपकरणा रियल टाईम पीसीआर उपलब्ध आहे.

कोरोना हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून या प्रयोगशाळेचा १०० मी अंतरापर्यंत कुणीही येणार नाही यासाठीची पूर्ण उपाययोजना करण्यात येणार आहे. इथे फक्त पूर्ण सुरक्षित कपड्यामध्ये प्रशिक्षित कर्मचार्यांनाच प्रवेश दिल्या जाणार आहे. या प्रयोगशाळेमुळे मराठवाडयातील आणि आजूबाजूच्या राज्यातील जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे.

या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळाचे संचालक डॉ.राजाराम माने, रुसा हर्बोमेडिसिन सेंटरचे समन्वयक डॉ.शैलेश वाढेर, कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे, डॉ.जी.बी.झोरे, डॉ.मनमोहन बजाज, संदीप काळे यांच्यासह त्यांची सर्व टीम दिवसरात्र विशेष परिश्रम घेत आहेत.


No comments:

Post a Comment

Pages