पंजाब, हरियाणामधील यात्रेकरुंचा प्रवासाचा मार्ग मोकळा. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 23 April 2020

पंजाब, हरियाणामधील यात्रेकरुंचा प्रवासाचा मार्ग मोकळा.

पंजाब, हरियाणामधील यात्रेकरुंचा प्रवासाचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली संमती, खासदार हेमंत पाटील व आमदार बालाजी कल्याणकर यांनी केला सातत्याने पाठपुरावा
किनवट : हल्ला मोहल्ला या पारंपारिक उत्सवासाठी पंजाब, हरियाणामधून आलेल्या व नांदेड येथे गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या चार हजार यात्रेकरुंच्या प्रवासाचा मार्ग मोकळा झाला असून, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि नांदेड उत्तरचे शिवसेना आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आज त्यांच्या प्रवासाचा मार्ग मोकळा झाला असून, उद्या ते ट्रॅव्हल्सव्दारे रवाना होणार आहेत.
     खासदार हेमंत पाटील आणि आमदार बालाजी कल्याणकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हल्ला महल्ला या पारंपारिक उत्सवासाठी पंजाब आणि हरियाणा येथून मोठ्या प्रमाणात यात्रेकरु आले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांना त्यांच्या गावी परतता येत नव्हते. याबाबत आम्ही दोघांनीही सातत्याने एक दिवसाआड राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे त्यांच्या प्रवासासंदर्भात व त्यांना त्यांच्या गावी प्रस्थान करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, यासाठी पाठपुरावा केला होता. याबाबतचे निवेदन देखील त्यांना पाठवून दूरध्वनीवर त्यांच्याशी सातत्याने बोलणेही चालू होते, आज अखेर या मागणीला यश आले असून, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या प्रवासाची परवानगी देवून त्यांच्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्वतः लंगर साहिब गुरुव्दाराचे बाबा बलविंदरसिंघजी यांनी देखील आमच्याकडे मागणी करुन मुख्यमंत्र्यांना याबाबत अवगत करा, अशी मागणी केली होती. अखेर ३० दिवसानंतर या मागणीला यश आले असून, उद्या हे यात्रेकरु विशेष ट्रॅव्हल्सव्दारे आपल्या गावी रवाना होणार आहेत.
     आज या संदर्भातील आनंदाची बातमी घेवून स्वतः खासदार हेमंत पाटील आणि आमदार बालाजी कल्याणकर यांनी संत बाबा बलविंदरसिंघजी व यात्रेकरुंची भेट घेवून त्यांना मुख्यमंत्र्यांचा निरोप पोहचता केला. ही बातमी ऐकताच संत बाबा बलविंदरसिंघजी यांनी आनंद व्यक्त केला असून, यात्रेकरुंनी देखील समाधान व्यक्त केले आहे. लंगर साहिब गुरुव्दाराच्या वतीने गेल्या महिनाभरापासून नांदेड शहर व परिसरातील अडवून पडलेल्या नागरिकांना तसेच गोरगरीबांना मोठ्या प्रमाणात अन्नदान करुन नांदेडकरांची सेवा केल्याबद्दल खासदार हेमंत पाटील आणि आमदार बालाजी कल्याणकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. आपल्या सेवेमुळे नांदेड व परिसरातील गोरगरीबांना जागेवरच अन्न उपलब्ध झाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले.
     एकंदरच प्रशासनाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना यश आले असले तरी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी खासदार हेमंत पाटील व आमदार बालाजी कल्याणकर यांच्या पाठपुराव्यानंतर त्यांना प्रवासाची परवानगी मिळवून दिली आहे. याबाबत गेल्या महिनाभरात या दोघांनीही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता हे विशेष.

No comments:

Post a Comment

Pages