महाविद्यालये, विद्यापीठांच्या परीक्षा जुलैमध्ये;सप्टेंबरपासून नवे सत्र:युजीसी समितीची शिफारस - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 26 April 2020

महाविद्यालये, विद्यापीठांच्या परीक्षा जुलैमध्ये;सप्टेंबरपासून नवे सत्र:युजीसी समितीची शिफारस



नवी दिल्लीः कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा महाविद्यालये आणि विद्यापीठांचे शैक्षणिक सत्र सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीच्या एका समितीनेच तशी शिफारस केली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे होऊ न शकलेल्या परीक्षा जुलैमध्ये घेण्याची शिफारसही या समितीने केली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील शाळा- महिविद्यालये बंद करण्याचा आदेश दिल्यामुळे शाळा-महाविद्यालये १६ मार्चपासूनच बंद आहेत. तेव्हापासून बंद झालेली महाविद्यालये आणि विद्यापीठे अद्याप उघडलेली नाहीत. त्यामुळे अभ्यासक्रम अपूर्ण आहे आणि परीक्षाही व्हायच्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर परीक्षा आणि नव्या शैक्षणिक सत्राबाबत सूचना करण्यासाठी यूजीसीने एक समिती स्थापन केली होती. या समितीने सप्टेंबरपासून शैक्षणिक सत्राला प्रारंभ करण्याची शिफारस केली आहे. म्हणजेच जवळपास दोन महिने विलंबाने यंदाचे शैक्षणिक सत्र सुरू होईल.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या होऊ न शकलेल्या वार्षिक आणि सेमिस्टरच्या शेवटी होणाऱ्या परीक्षा जुलैमध्ये घेण्यात याव्यात, अशी शिफारसही या समितीने केली आहे. हरियाणा विद्यापीठाचे कुलगुरू आर. सी. कुहाड हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीच्या शिफारशींच्या आधारावरच आता यूजीसी विद्यापीठांच्या परीक्षा आणि अकॅडमिक कॅलेंडरसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना निश्चित करून त्या देशभरातील विद्यापीठांना जारी करेल.

No comments:

Post a Comment

Pages