कोविड 19 अर्थात कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असून अमेरिका, स्पेन, इटली, चीन यासारख्या अनेक देशांमध्ये मृत्यूने तांडव घातले आहे. भारतातही गेल्या काही आठवड्यांपासून रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून कोरोना बाधित रुग्णांचा आकडा १ लाखांपेक्षा जास्त झाला आहे. अश्या परिस्थितीत केंद्र व राज्य सरकार यांच्या योग्य नियोजनामुळे परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. सलग चार वेळा लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे कारोनाचा संसर्ग टाळण्यात मोठ्या प्रमाणात यश आले आहे परंतु या लोक डाऊन मुळे हातावर पोट असलेल्या अनेक रिक्षा व टॅक्सी चालक, नाका कामगार, घरकाम करणाऱ्या महिला, तसेच रोज मोलमजुरी करून जगणाऱ्या मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत. कोणत्याही प्रकारचे सेविंग अथवा बँक बॅलन्स नसलेल्या अशा वर्गाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होत असताना अनेक लोकप्रतिनिधी मदतीला येत नसल्याचे चित्र दिसत आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये भुकेल्या पोटाची भूक जाणणारा नेता लोकांच्या मदतीला धावून आला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष नामदार डॉ. रामदास आठवले.
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून म्हणजे गेले पंचावन्न दिवस रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार डॉ. रामदास आठवले यांनी त्यांच्या वांद्र्यातील संविधान या निवासस्थानी शेकडो गरजू लोकांसाठी दोन वेळेच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. ते स्वतः या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन उपाशीतापाशी असलेल्या लोकांना जेवण पुरवत आहे. रोज शेकडो गरजू लोक नामदार आठवले यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या अनेक कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करून अश्या गंभीर प्रसंगात मदतीचा हात दिला आहे. पक्षातील गोरगरीब कार्यकर्त्यांना अन्नधान्याचे वाटप केले तसेच रिपब्लिकन पक्षातील नेत्यांना गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहन नामदार रामदास आठवले यांनी केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरात गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू आणि जेवण देण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामुळे अनेक कलावंत वर्षभर उदरनिर्वाह करतात परंतु यंदा लॉक डाऊन मुळे जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द झाल्यामुळे अनेक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली असताना नामदार आठवले यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक कलावंतांना अन्नधान्य घरपोच करून मदतीचा हात दिला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सिंधुदुर्ग येथील आपल्या गावी परत जात असताना पोलिसांनी अडवल्यामुळे मुंबईत अडकलेल्या धूमधडाका या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री ऐश्वर्या राणे यांना १५ एप्रिल पासून आपल्या घरात आसरा देऊन नामदार आठवले यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे. संपूर्ण आठवले परिवार स्वतःच्या कुटुंबातील सदस्यप्रमाणे या ज्येष्ठ अभिनेत्रीला वागणूक देत असून लॉक डाऊन संपल्यानंतर त्यांना सिंधुदुर्ग येथे घर घेऊन देण्यासाठी प्रयत्न देखील नामदार आठवले करणार आहेत.
माझ्या समाजातील बांधव संकटात आहे अश्या प्रसंगी पक्षीय भेदभाव न करता वंचित बहुजन आघाडीच्या दहिसर येथील शांती नगरच्या एका कार्यकर्त्याचा मुलगा बँगलोर येथे उपचार घेत असल्यामुळे त्या कार्यकर्त्याने नामदार आठवले यांच्याकडे मदत मागितली असता त्या कार्यकर्त्याच्या मुलाला नामदार आठवले यांनी ऑनलाइन पैसे पाठवून दिले तसेच दहिसर येथील रिपब्लिकन पक्षाच्या तालुकाध्यक्षांना फोन करून त्या वंचित आघाडीच्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन मदत करण्याचे आदेश दिले. देशभरातून अनेक नागरिकांचे मदतीसाठी नामदार आठवले यांना फोन येतात आणि ते त्या व्यक्तीला शक्य ती मदत करत आहेत.
कारोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे संकटात असलेल्या लोकांना गरीब गरजूंना भोजनदान, अन्नधान्यासह विविध स्तरावर सतत मदत गरिबांची मानवसेवा व सामाजिक सेवा करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांची वर्ल्ड रेकॉर्ड स्टार 2020 ही डिक्शनरी प्रकाशित करून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांची लंडन च्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ने कोरोना विरुद्ध लढणारे मानवतेचे मानवसेवेचे जागतिक दीपस्तंभ म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड स्टार 2020 या बहुमानासाठी निवड करण्यात आली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत लॉकडाऊन च्या काळात उत्कृष्ट समाजसेवा केल्याबबद्दल भारतात राजकीय नेते व लोकप्रतिनिधी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांची वर्ल्ड रेकॉर्ड बुक तर्फे स्टार 2020 या बहुमानासाठी सर्वप्रथम निवड झाली आहे. याबाबत चे ऑनलाइन प्रमाणपत्र वर्ल्ड रेकॉर्ड बुक तर्फे पाठविण्यात आले आहे.
फेब्रुवारी महिन्यात चीन मध्ये कोरोना विषाणू ने थैमान घातले असताना तिथल्या लोकांचे सांत्वन करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी गो कोरोना गो अशी प्रतीकात्मक घोषणा दिली. त्या घोषणेनंतर भारतातील रिकामटेकड्या सोशल मीडिया वीरांनी रामदास आठवले यांना ट्रोल केले. काहींनी तर अश्लील टीका करत कमरे खालच्या शिव्या ही दिल्या. परंतु गेली चार दशके रामदास आठवले नावाची ही व्यक्ती संकटात असलेल्यांच्या नेहमीच मदतीला धावले आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आंबेडकरी चळवळीमध्ये काम करण्याचे वेड त्यांना लागलं. पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरताना अनेकदा परिस्थिती हलाखीची असल्यामुळे उपाशी पोटी काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यामुळे भूक काय असते याची जाणीव त्या काळचा पॅंथर चळवळीतील कार्यकर्ता आणि आजच्या केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना आहे. याच जाणिवेतून अनेक कुटुंबांच्या चुली पेटवण्याचे काम रामदास आठवले हे सातत्याने करत आहे. त्यामुळे टीकाकारांना विनंती आहे टीका करत असताना आपण ज्या व्यक्तीवर टीका करत आहोत त्या व्यक्तीच्या कामाचा आढावाही घेणे गरजेचे आहे आणि एखाद्यावर टीका करत असताना आपण त्या लायक आहोत का याची चाचपणीही करणे गरजेचे आहे. आज रक्ताचे नातलग सुद्धा कोणाच्या मदतीला येत नाहीत परंतु कोणताही नात नसतानाही, ओळख नसतानाही नामदार आठवले हजारो लोकांना मदत करत आहेत. फक्त माणूस नाही तर पशुपक्षांचे सुद्धा पोट भरण्याचे काम नामदार रामदास आठवले करत आहे.
-सचिन दत्तु कटारे
नवी मुंबई
Sunday, 24 May 2020
मानवतेचा दीपस्तंभ. - सचिन दत्तू कटारे
Tags
# प्रासंगिक लेख
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
प्रासंगिक लेख
Labels:
प्रासंगिक लेख
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.




No comments:
Post a Comment