साठवण तलावात बुडून दोन मुलांचा दुर्देवी मृत्यू - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 1 June 2020

साठवण तलावात बुडून दोन मुलांचा दुर्देवी मृत्यू

किनवट, दि.१:  किनवट शहरापासून उत्तरेस १२ कि.मी. अंतरावर असलेल्या शनिवारपेठ येथील साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (दि.१) दुपारी १ च्या सुमारास घडली.

     या संदर्भात प्राप्त झालेली माहिती अशी की,  प्रचंड उकाड्यामुळे नागरिक त्रस्त होत असतांना, शनिवारपेठ या गावालगत असलेल्या साठवण तलावामध्ये  सोमवारी दुपारी साडेबारा च्या सुमारास चार लहान मुले पोहण्यासाठी गेली होती. त्यातील शनिवारपेठचेच रहिवासी नागनाथ प्रदीप राठोड (वय ९) व  धम्मपाल रणजित सोनकांबळे (वय११) या दोघांनी पोहण्यासाठी पाण्यात सूर मारला. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. त्यांच्या सोबत असलेल्या अन्य दोन मुलांनी सदर प्रकारामुळे घाबरून जाऊन घटनास्थळावरून पळ काढला आणि गावात जाऊन ग्रामस्थांना या घटनेची माहिती दिली. गावकर्‍यांनी घटना स्थळावर तात्काळ धाव घेतली; परंतु, दुर्देवाने तो पर्यंत त्या दोन मुलांचा  मृत्यु झाला होता. तेथील सरपंच शिवराम दत्ता माहुरे यांनी किनवट पोलिसांना या घटनेची खबर दिली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर दोन्ही मुलांचे पार्थिव  शवविच्छेदनासाठी गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. दोन निरागस मुलांच्या मृत्युने शनिवारपेठ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पंचनाम्याच्या वेळी तहसील प्रशासनातर्फे तलाठी के.आर. कदम आणि डी.बी. जोशी घटनास्थळी होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड यांनी मयत मुलांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांचे सांत्वन केले.

No comments:

Post a Comment

Pages