नांदेड (जिमाका) दि. 20 :- आम्हा शिक्षकांसाठी शाळेची घंटा हीच प्रार्थनेची घंटा आणि विद्यार्थी हे दैवत. कोरोनामुळे मागील आठ महिन्यापासून आमची प्रार्थना थांबली आहे. आठवडयातील काही दिवस आम्ही शाळेत जावून शासनाच्या निर्देशाप्रमाणे कामे सुरु ठेवली आहेत. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी आम्ही आता सारे काही शिकून घेतले आहे. ऑनलाईन वर्गामध्ये एखादी दुर्गा जेव्हा, ‘मॅडम शाळा केव्हा सुरु होते’ ? असा प्रश्न विचारते तेंव्हा गलबलून व्हायला होते. हा काळ आपणच आपली दुर्गा होण्याचा आहे, या शब्दात सहशिक्षिका अपर्णा जाधव यांनी आपल्या भावनांना वाहते केले. त्या येथील शिवाजी प्राथमिक शाळेत सहशिक्षिका आहे.
आठवडयातील काही दिवस गर्दीतून वाट करीत शाळेत पोहचावे लागते. शाळेत असलेल्या 82 विद्यार्थी व विद्यार्थीनींशी संपर्कात असल्याशिवाय आमचे भागत नाही. काही विद्यार्थीनी घरी येण्याचा खूप हट्ट धरतात. शक्य तेंव्हा जमेल तसे त्यांच्या घरी जावून त्याची समजूतही काढावी लागते. त्यांच्याकडून दिलेल्या अभ्यासक्रमांची होमवर्कही पाहीले म्हणजे पुन्हा हे विद्यार्थी तेवढयाच जोमाने घरी बसून अभ्यासाकडे वळतात असा अनुभवही त्यांनी मोकळेपणाने सांगितला.
माझ्या घरी छोटी मुलगी व परिवार आहे. सारे काही सर्वांची काळजी घेवून करावे लागते. शासनाने वेळोवेळी आरोग्याबाबतचे जे निर्देश दिले आहेत त्यांचे काटेकोर पालन आजवर आम्ही करत आलो आहोत. सतत मास्क चेहऱ्यावर ठेवणे, वेळोवेळी हात धुवणे, हात धुवायला जिथे जागा नसेल तिथे सॅनिटायझर वापरणे, कारण नसताना बाहेर न जाणे, सुरक्षित अंतर ठेवणे यामुळे आम्ही सर्व सुरक्षित झालो आहोत. माझे कुटूंब 82 विद्यार्थ्यांसह असल्याने माझी अधिक जबाबदारी असल्याचेही अपर्णा जाधव यांनी सांगून सर्वांच्या आरोग्याचा दृढ संकल्प केला.
No comments:
Post a Comment