बाबासाहेबांची पत्रकारिता- अरविंद वाघमारे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 19 October 2020

बाबासाहेबांची पत्रकारिता- अरविंद वाघमारे

 


मराठी वृत्तपत्रसृष्टी केवळ एकाच वर्गाची आहे,इतरांना यात प्रवेश नाही अशी एकप्रकारची भावना त्यावेळी होती, परंतु एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्राम्हणेत्तर वृत्तपत्रांनी आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात दलित व अस्पृश्य वृत्तपत्रांनी जो प्रपंच केला तो आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही, मराठी वृत्तपत्रसृष्टीत जर कोणत्या महान व विचारवंत पत्रकाराचे कर्तृत्व दुर्लक्षित केले गेले असेल तर ते अर्थतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकर या विचारवंत पत्रकाराचे.उलट,ज्यांना बाबासाहेबांचा सहवास घडला,ज्यांनी मुलाखती घेतल्या त्यांनी ही त्यांचा पत्रकार म्हणून कधी गौरव केलाच नाही परंतु त्यांच्या पत्रकारितेचीही फारशी दखल घेतली नाही.ज्या काळात बाबासाहेबानी आपल्या वृत्तपत्रांना जन्म दिला त्या काळात भल्या-भल्या पत्रपंडितांनी कातडीबचाव धोरण ठेवले,त्यामुळे नुकसान बाबासाहेबांचे झाले नसून इथल्या मराठी वृत्तपत्रसृष्टीचे झाले.


बाबासाहेबानी मूकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), जनता(१९३०), प्रबुद्ध भारत (१९५६), रोजी सुरु केले,प्रबुद्धभारत स्वतंत्रपणे जन्माला आले नाही तर ते "जनता" चेच रूपांतर होते.ही वृत्तपत्रे सामाजिक व सांस्कृतिक निकडीतून जन्माला आली होती,समाजातील विषमता,सांस्कृतिक अहंकार,नेतृत्वातील विसंवाद,पोखरलेपण आणि अर्थहीनता विशद करून एक नवा समाज घडविण्याची प्रेरणा यामागे होती.बाबासाहेब आपल्या मूकनायक या पत्राच्या पहिल्या अंकात म्हणतात," आम्हाला या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वृत्तपत्रासारखी अन्य भूमीच नाही" (मूकनायक ३१ जानेवारी १९२०)


बाबासाहेबांच्या वृत्तपत्रांनी केवळ अस्पृश्याना व दलितांना जगविण्याचे कार्य केले नाही तर,स्पृश्यांनाही आपल्या समाजद्रोही भूमिका तपासून पाहण्याचे आवाहन वारंवार केले,या आवाहनाच्या मागे संपूर्ण भारतीय समाजाच्या एकात्मतेची,स्वातंत्र्याची व समतेची मागणी होती,वृत्तपत्रे ही नैतिक पायावर उभी असली पाहिजेत अशी त्यांची धारणा होती, परंतु भारतीय वृत्तपत्रसृष्टीकडून ही अपेक्षा करणे चूक होते,अर्थात काही ध्येयवादी मराठी पत्रे होती आणि ती अपवादात्मक मानायला ही हवीत,बाबासाहेबाना वृत्तपत्रांकडे केवळ "धंदा" म्हणून पाहणारी वृत्ती मान्य नव्हती,पुणे येथील न्या.रानडे व्याख्यानमालेत वृत्तपत्रासंबंधी विचार मांडताना बाबासाहेब म्हणाले होते," journalism in india was once a profession,it has now become a trade,it has no more moral function than the manufacture of soap" 


मुकनायकाचे संपादक म्हणून शिर्षभागी बाबासाहेबांचे नाव नसून त्याकाळातील उच्चविद्याविभूषित पांडुरंग नंदराम भटकर या विदर्भातील तरुणाचे नाव असलेतरी,मुकनायकाचे संगोपन,धोरण,अग्रलेख बाबासाहेबांचेच असत,"मूकनायक" तसे अल्पजीवीच ठरले,कारण मुकनायकाचे व्यवस्थापन आणि संपादन या दोन्ही बाबतीत बाबासाहेबांना फारसे समाधान नव्हते,ज्यांच्यावर जबाबदारी टाकली जाते ती माणसे अर्थहीन वाद निर्माण करतात, याचा प्रत्यय बाबासाहेबांना आला होता तसेच त्यांना त्यावेळी परदेशातही जावे लागले, या कारणामुळे मूकनायक अल्पजीवी ठरले, परंतु ज्या पाक्षिक वृत्तपत्रावर त्यांचे संपादक म्हणून नाव होते,आणि ज्या पत्राचा त्यांनी सर्वार्थाने प्रपंच केला ते पत्र होते "बहिष्कृत भारत". या वृत्तपत्राला बाबासाहेबानी खऱ्या अर्थाने जोपासले,बहिष्कृत भारताच्या मागे अन्य वृत्तपत्रांसारखी कोणतीही सुसज्ज यंत्रणा नव्हती,संपादकीय विभाग नव्हता की,वितरणव्यवस्था नव्हती,हे सारे बाबांनाच करावे लागे,आपल्या पत्राला आर्थिक बळ मिळावे म्हणून त्यांनी बहिष्कृत भारत फंडासाठी आवाहन केले,पण त्यांना फारसा प्रतिसाद लाभला नाही,आपले वृत्तपत्र हा व्यवसाय नव्हे तर,समाजप्रबोधन कार्यासाठी स्वीकारलेली जबाबदारी आहे,अशी त्यांची धारणा होती, आणि म्हणूनच, बहिष्कृत भारताचे चोवीस-चोवीस रकाने स्वतःच लिहीणार्या या पत्रकाराने " बहिष्कृत भारताचे ऋण हे लौकिक ऋण नव्हे काय?" या शिर्षकाच्या ३ फेब्रुवारी १९२८ च्या अंकात नमूद केले


ब्रिटिश शासनाने अनेक सुधारणा केल्या,त्यांच्यामुळे अस्पृश्याना शिकता आले,सैन्यात प्रवेश मिळाला हे बाबासाहेबानी जरी मान्य केले असले तरी ब्रिटिशांनीच भारताला गुलाम केले,भारताच्या गुलामगिरीला कारण ब्रिटिश धोरण आहे हे त्यांनी परखडपणे मांडले आहे,भारताचा विचार करता,भारताला ब्रिटिशांनी देहाने गुलाम केले आहे असे उद्गार त्यांनी काढले,आंग्लाई ही एक जळू आहे व ती भारतातील संपत्तीचे शोषण करते (दुःखात सुख,बहिष्कृत भारत,१ जुलै १९२७) असा आरोप त्यांनी केला, इंग्रज सरकार धीमे आहे,"मार्च ऑन करण्याऐवजी होता होईल तो मार्क टाईम करण्याचे अवलक्षण त्यांच्या अंगी अगदी खिळून गेले आहे,व सामाजिक प्रश्न आले की त्यांचे पाय लटके पडतात."( महाड येथील धर्मसंगर व इंग्रज सरकारची जबाबदारी:- बहिष्कृत भारत,६ मे १९२७) असे स्पष्टपणे त्यांनी खडसावले.


धर्मांतरासंबंधी बाबासाहेबानी केलेली मीमांसा लक्षणीय आहे, ते म्हणतात,धर्मांतर हा मौजेचा विषय नाही,हा प्रश्न माणसाच्या जीविताच्या साफल्याचा प्रश्न आहे,जहाज एका बंदरातून दुसऱ्या बंदरात नेण्याकरिता नावाड्याला जेवढी पूर्वतयारी करावी लागते तेवढिच पूर्वतयारी धर्मांतराकरिता करावी लागणार आहे,"(मुक्ती कोण पथे: "जनता" २० जून १९३६) बाबासाहेबानी धर्मांतरासंबंधी दोन दृष्टीने विचार केला होता १.सामाजिक आणि ऐहिक दृष्टीने तर २. धार्मिक आणि तात्विक दृष्टीने.धर्मांतर हे राष्ट्रांतर किंवा वस्त्रांतर नव्हे,अशी त्यांची स्वच्छ भूमिका होती,बाबांनी आपल्या पत्रातून विविध प्रश्नांवर आपले विचार मांडले आहेत त्यात बालविवाह ते सहशिक्षण,सहभोजन, तसेच शेती,शेतकरी,खोतशाहीपर्यंत. या सर्व लेखनाचे सूत्र प्राधान्याने सामाजिक-सांस्कृतिक आणि नवसमाजनिर्मिती हेच आहे.गांधी,नेहरू यांपासून ते हिंदुमहासभा,सत्यशोधक समाज या संदर्भात ही त्यांनी परखड विचार मांडले आहेत,या प्रचंड लिखाणातून त्यांचा अभ्यास,तर्कशुद्धता,परखडपणा,चिकित्सकता यांचा प्रत्यय येतो,तेजस्वी विचारसरणी आणि धारदार भाषा,प्रतिपक्षावर अज्ञान आणि असत्यावर कठोर प्रहार करणारे बाबासाहेब अनेकदा उपरोधिक भाषेचाही उपयोग करतात,यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की,बाबासाहेबानी आपले विचार,भाषेच्या फुलोऱ्यातून मांडलेले नाहीत,लोडाशी टेकून भाषा सजविण्याचा किंवा शृंगारिक शब्दांचा सोस बाळगण्याची हौस त्यांना कदापि नव्हती,त्यांचे सर्व वृत्तपत्रीय लेखन चिंतनशील,मार्मिक आणि कृतीस आवाहन करणारे आहे,बाबासाहेबांचे हे वैचारिक लेखन मराठी निबंध वाङ्मयाचा अलंकारच होय,स्वतःची अशी स्वतंत्र शैली निर्माण करणारे बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीला,लोकजागृतीच्या चळवळीचे भान दिले आहे.

No comments:

Post a Comment

Pages