आंबेडकरी विचारवंतांनी समाज जोडण्याचे काम करावे - प्रा. प्रकाश भुतांगे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 26 October 2020

आंबेडकरी विचारवंतांनी समाज जोडण्याचे काम करावे - प्रा. प्रकाश भुतांगे

 
धम्मचक्र प्रवर्तन दिन : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आॅनलाईन साजरा

नांदेड - विविध वैचारिक आणि राजकीय संकल्पनांच्या पार्श्वभूमीवर समाजात जे गट तट निर्माण झालेले आहेत त्यांच्यात वैचारिक समेट घडवून आणण्याची जबाबदारी आंबेडकरी विचारवंतांवर असून समाजाला एक करण्यासाठी पुढाकार घ्यावा, आंबेडकरी समाजाला जोडण्याचे काम करावे अशी अपेक्षा बपेरा, तुमसर येथील आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक प्रा. प्रकाश भुतांगे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी फेसबुक या सोशल मीडियावर आंबेडकरी साहित्य, संस्कृती आणि विचार या समुहात धम्मचक्र प्रवर्तन : १४ आॅक्टोबर की विजयादशमी या विषयावर त्यांनी आपली भूमिका मांडली. दलित, विद्रोही, पुरोगामी, आंबेडकरी, आंबेडकरवादी असे वैचारिक आणि रिपब्लिकन, बहुजन, अल्पसंख्याक, सेक्युलर असे काही राजकीय गट कार्यरत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक आॅनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या चर्चासत्राचे समन्वयक म्हणून येथील समीक्षक तथा समुहाचे नियामक गंगाधर ढवळे यांनी या चर्चासत्राचे आयोजन केले होते. 

          आंबेडकरी साहित्य संस्कृती आणि विचार या समुहाच्या नियामक मंडळाच्या वतीने आयोजित चर्चासत्रात शेगाव येथून सहभाग घेतांना प्रवीण खरात म्हणाले की, समाजात गैरसमज पसरविणे बंद करून अशोका विजयादशमी ह्याच दिवशी 'धम्मचक्र प्रवर्तनदिन मानावा व साजरा करावा. जे लोक समाजाला चुकीची दिशा दाखवत असतील तर अशा लोकांना महत्व देऊ नये. हे लोक राजकारण आणि समाजसुधारणा या नावाखाली समाजात मुद्दाम दुफळी माजवित आहेत. ही भूमिका मांडतांना त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे काही महत्त्वपूर्ण संदर्भ दिले. तसेच ज्यांना माहित नाही त्यांना याबाबत माहिती देणे आवश्यक आहे. आपापल्या पक्ष, संघटनांच्या माध्यमातून या दोन्ही दिवशी काही ढोंगी पुढारी राजकारण करतात. अशा लोकांना आंबेडकरी समुहाने कणखरपणे विरोध केला पाहिजे असेही खरात म्हणाले. 


    आंबेडकरी समाजात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दोन मतप्रवाह आहेत. ऐतिहासिक नोंद करणारी धम्मक्रांती म्हणून १४ आॅक्टोबर या दिवसाकडे पाहिले जाते. पण काही तिथीप्रमाणे दसऱ्याच्या दिवशीच हा दिवस मानतात. तसेच दीक्षाभूमीवर लाखो बौद्ध अनुयायी विजयादशमीलाच एकत्र येतात.  यासाठी हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. राज्यभरातून या चर्चासत्रात योगेश शामकुंवर, प्रकाश कांबळे, संदीप भालमोडे, गोकुळ पाटील, आकाश पोहरकर, समाधान कांबळे, क्रिष्णा मानकर, लक्ष्मण ठमके, यश शेंडे, राजेश भगत, बालाजी कांबळे, भीमराव गाडेकर, प्रदिप खंदारे, बुद्धप्रकाश गोपनारायण, सागर कदम, अरुण कुवर, प्रसन्न वानखेडे, विनय सूर्यवंशी आदी चर्चकांनी सहभाग घेतला. या चर्चासत्राच्या नियोजनासाठी समुहाचे प्रशासक प्रशांत वंजारे, नियामक मंडळाचे अनुपम वसाटे, जयबुद्ध लोहकरे, किशोर चहांदे, नवीन साधू, राजेश जुनगरे, विशाल डाके यांनी पुढाकार घेतला होता.

No comments:

Post a Comment

Pages