जवान गणेश गावंडे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार साश्रुनयनांनी दिला आखेरचा निरोप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 23 December 2020

जवान गणेश गावंडे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार साश्रुनयनांनी दिला आखेरचा निरोप

 

   जालना,  दि. 23 : भोकरदन तालुक्यातील भिवपुर येथील रहिवाशी असलेले व सैन्यदलामध्ये पुणे येथे कार्यरत असलेले जवान गणेश संतोष गावंडे (38 वर्ष) यांचे ऱ्हदयविकाराच्या झटक्याने दि. 21 डिसेंबर, 2020 रोजी पुणे येथे निधन झाले होते.  त्यांच्या पार्थिवावर दि. 23 डिसेंबर रोजी भोकरदन तालुक्यातील भिवपुर या त्यांच्या मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.   यावेळी भिवपुर येथील ग्रामस्थ व उपस्थितांनी साश्रुनयनांनी गणेश गावंडे  यांना अखेरचा निरोप दिला.

       दि. 23 डिसेंबर रोजी त्यांचे पार्थिव भिवपुर या त्यांच्या गावी  आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर वाहनातून पार्थिव अंत्यसंस्कार स्थळी आणण्यात आले. दरम्यान गावातून पार्थिव वाहनातून आणत असताना गावकऱ्यांनी सामाजिक अंतराचे पालन करीत जवानाच्या पार्थिवावर पुष्प वर्षाव केला. अंत्यसंस्कार स्थळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, गावचे सरपंच खंडू रामराव जाधव, जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमती आशाताई पांडे, उपविभागीय अधिकारी श्रीमती अंजली कानडे, पोलीस निरीक्षक छत्रभुज काकडे, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील  श्री काकडे, श्री सोनवणे, बबन शिंदे, श्री गायकवाड यांनी शहीद जवानाच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

       शहीद जवान यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी पुष्पा गावंडे व मुले  कार्तिक व यश तसेच तीन भाऊ एवढा आप्त परीवार आहे. जवान गणेश गावंडे हे 2005 मध्ये  101 टीए मराठा बटायलियनमध्ये भरती झाले होते.  त्यांच्या चितेला मोठा मुलगा कार्तिक याने चिताग्नी दिला. तेव्हा उपस्थितांना अश्रू अनावर झाले. गावातून पार्थिव आणतांना भिवपुर येथील आसंमत शहीद जवान अमर रहे… गणेश गावंडे  अमर रहे… या घोषणांनी निनादून गेला. यावेळी पोलीस दलाच्या जवानांनी बंदुकीच्या तीन फ़ैरी हवेत झाडून मानवंदना दिली.


No comments:

Post a Comment

Pages