भारतीय सार्वजनिक आरोग्य सेवेच्या महामेरू क्रांतिसूर्य सावित्रीबाई फुले ! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 3 January 2021

भारतीय सार्वजनिक आरोग्य सेवेच्या महामेरू क्रांतिसूर्य सावित्रीबाई फुले !


१८९६- ९७ चा काळ, देशभरात प्लेग नी थैमान घातलेलं.तो काळ असा की रुग्णसेवा सुद्धा जात पाहून केली जायची. तथाकथित खालच्या जातीतल्या लोकांना इथेही उपेक्षाच. डॉक्टर बनायचं म्हणजे इंग्रज सरकारचीच मेडिकल कॉलेजेस फक्त उपलब्ध आणि तिथे सर्वजातीतल्या रुग्णांवर उपचार व्हायचा.खालच्या जातीतल्यांना हात लावावा लागेल म्हणून कित्येक ब्राम्हण्यग्रस्त ब्राम्हण डॉक्टर होण्यास नकार द्यायचे. अश्या वेळेला फुले दाम्पत्यांनी आपल्या दत्तक पुत्राला डॉक्टर बनवलं. १८९६ मध्ये डॉ.यशवंत परदेशात रुग्णसेवा देत होते. इकडे पुण्यात प्लेगची साथ, हजारोंच्या संख्येने लोक मरत होते. सावित्रीबाई फुले एकट्या होत्या.जोतीरावांचा १८९० मध्ये मृत्यू झालेला आणि डॉ.यशवंत परदेशात. पुण्यात रुग्णांचे हाल होते. खालच्या जातीच्या रुग्णांचे तर विचारायलाच नको.अश्या बिकट प्रसंगी सावित्रीबाईंनी रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. डॉ.यशवंतला परदेशातून बोलवून घेतलं.टिळकां सारखे पुण्याचे राजकीय नेते जेव्हा गाव सोडून जात होते तेव्हा सावित्रीबाई आणि डॉ.यशवंत यांनी हडपसर मध्ये तात्पुरतं रुग्णालय स्वखर्चाने उघडलं आणि रुग्णसेवा सुरू केली,अर्थातच रुग्णाच्या जाती धर्माचा विचार न करता. डॉ.यशवंत उपचार करायचे आणि आई सावित्री शुश्रूषा.

एक दिवशी सावित्रीबाईंना कळलं की पुण्यातल्या मुंढवा मधल्या एका वस्ती मध्ये साथ खूप पसरली आहे,लोक मेलेत, पण तिथे झोपडीत १० वर्ष्याचा एक मुलगा आहे ज्याला प्लेगची लागण झाली आहे आणि तो उपचाराविना तिथेच आहे. महार जातीतला तो असल्याने कुणी त्याला हात लावायला तयार नाही.पांडुरंग बाबाजी गायकवाड त्याचं नाव. सावित्रीबाई त्या वस्तीत गेल्या.त्या १० वर्ष्याच्या मुलाला कडेवर घेऊन मुंढवा ते हडपसर पायी आल्या. डॉ.यशवंत यांनी त्या मुलाचे उपचार केला. त्याला कडे वर आणल्यामुळे सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली. पांडुरंग तर वाचला पण सावित्रीबाईंचा प्लेग मुळे मृत्यू झाला.  सावित्रीमाई नंतर ही डॉ.यशवंत रुग्णसेवा देत होते. त्यांचा ही मृत्यू १९०५ मध्ये रुग्णांवर उपचार करताना प्लेग मुळे झाला.


आज शंभर वर्ष्याहुन अधिक काळ झाला.. आज कोरोना आहे.. आज कितीही जग समोर गेलं असलं तरी महामारीच्या काळात भेदभाव..माणसा माणसाला दूर करण्याची वृत्ती मात्र कायम आहे.

अश्या वेळी क्रांतिसूर्य सावित्रीबाईंच महान कार्य सार्वजनिक आरोग्य सेवे मध्ये सामाजिक बांधिलकीचं महामेरू ठरतं.


क्रांतिसूर्य सावित्रीबाई फुले यांच्या विचार आणि कार्याला जयंती दिनी शत शत अभिवादन !


- डॉ.रेवत

No comments:

Post a Comment

Pages