सैन्यदलाच्या मताधिकारासाठी प्रशासन कटीबद्ध -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 15 January 2021

सैन्यदलाच्या मताधिकारासाठी प्रशासन कटीबद्ध -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद, दिनांक 15 : राष्ट्राच्या सुरक्षिततेची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणाऱ्या सैन्यदलास कर्तव्य पार पाडत असतानाच मतदानाचाही अधिकार बजावता यावा यासाठी प्रशासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे केले.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने छावणी परिसरातील कमांडर कार्यालय येथे 15 जानेवारी लष्कर दिन तसेच 25 जानेवारी रोजी असणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिवस यानिमित्ताने सैन्यदलातील मतदारांना मतदार नोंदणी, मतदान कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यासंदर्भात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते. यावेळी ब्रिगेडीयर उपिन्दर सिंघ आनन्द, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांच्यासह सैन्यदलाचे अधिकारी, सैनिक, संबंधित उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, आज लष्कर दिन आहे. हा दिवस म्हणजे शौर्याप्रती आदर व्यक्त करण्याचा, प्रेरणा घेण्याचा दिवस आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता खडतर कष्ट घेत सैनिक आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी ज्या हिमतीने आपले कर्तव्य पार पाडत असतात ते निश्चितच प्रत्येक नागरीकाला स्फुर्ती देणारे आहे. ज्याप्रमाणे देशाच्या सुरक्षिततेत लष्कराचे महत्च आहे. त्याचप्रमाणे लोकशाहीला बळकट करण्यासाठी निवडणूक, मतदान प्रक्रिया या बाबी महत्वपूर्ण आहे. निवडणूक आयोगाने लोकशाही सक्षम करणारी निवडणूक प्रक्रिया अधिक मजबूत होण्याच्या दृष्टीने प्रत्येक मतदाराचा मतदान प्रक्रियेत सहभाग यावर प्राधान्याने भर दिलेला आहे. त्यादृष्टीने सर्वांनी आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावला पाहिजे. सैनिकांनाही आपले कर्तव्य पार पाडत असताना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सर्व्हिस व्होटरची सुविधा आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचा लाभ घेऊन सर्व सैनिकांनीही आपला मतदान हक्क बजवावा, यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य जिल्हा प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येईल, असे श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

 तसेच सैनिकांकडून संघ भावना, शिस्त, वेळ आणि कामाचे अचूक नियोजन या गोष्टी आत्मसात करण्यासारख्या आहेत. प्रत्येकाला या गुणांचा उपयोग करून आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात उत्तम वाटचाल करणे शक्य असल्याचेही श्री. चव्हाण यावेळी म्हणाले.

ब्रिगेडीयर उपिन्दर सिंघ म्हणाले, ज्या पद्धतीने राष्ट्राच्या सुरक्षेसाठी लष्कर तत्पर, सतर्क असते त्याच पद्धतीने कोविड विषाणू विरोधात लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासन, त्यांची सर्व यंत्रणा गेल्या वर्षभरापासून सतर्कतेने सज्ज आहे. त्यामुळेच या आरोग्य आपत्तीचा यशस्वी सामना करत संसर्ग नियंत्रणात ठेवण्याचे आव्हानात्मक काम प्रशासन यशस्वीपणे पार पाडत आहे. त्यांची ही कामगिरी निश्चितच अभिनंदनीय असल्याचे सांगून श्री. सिंघ यांनी जिल्हा प्रशासन आणि सैन्य प्रशासन परस्पर सहकार्याने उत्तम काम करेल. तसेच मतदान प्रक्रियेत सर्व सैनिक आपला मतदानाचा हक्क बजावण्याच्या दृष्टीने निश्चितच निवडणूक आयोग, जिल्हा प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांचा उपयोग करतील, असेही श्री. सिंघ म्हणाले. 

यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात दोन जणांना मतदान ओळखपत्र देण्यात आले. तसेच श्रीमती धानोरकर यांनी पीपीटीव्दारा सैन्यदलातील मतदार व त्यांचे कुटुंबियांनी मतदान नोंदणी, मतदान कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून सर्व्हिस वोटिंगबाबत माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Pages