किनवट,दि.१५ (प्रतिनिधी) : गोकुंदा ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाड्या अंतर्गत अमृत आहार वाटपाबाबत घेण्यात आलेला खोटा ठराव रद्द करून, तो मागील ठरावानुसार आहार वाटपाचे काम पूर्ववत महिला बचत गटांकडे सोपवावा, अशी मागणी तेथील ग्रामपंचायत सदस्यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकार्यांकडे केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गोकुंदा ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेले डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार वाटपाचे काम दि.16 फेबु्रवारी 2020 रोजी घेतलेल्या ग्रामसभेत निवड झालेल्या बचतगटांकडे होता. 30 जानेवारी 2021 रोजी झालेल्या मासिक सभेमध्ये आमच्यापैकी कांही ग्रा.पं.सदस्य उपस्थित असतांनाही, आम्हाला डावलून महिला बचतगटांतर्फे अमृत आहार वाटपाबाबतचा पूर्वीचा ठराव रद्द करण्यात आला असल्याचे नंतर आम्हाला कळाले. आमच्या अनुपस्थितीत घेतलेला हा ठराव कुणाच्या तरी स्वार्थासाठी असल्यामुळे तो रद्द करण्यात येऊन, पूर्वी वाटप करणार्या महिला बचत गटांकडेच आहार वाटपाचे काम सोपविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याच संदर्भात काही स्तनदा मातांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकार्यांकडे अर्ज करून यापूर्वी अमृत आहार वाटप करणार्या बचतगटांच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. सोबत म्हटले आहे की, सुरुवातीस अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून केल्या जाणार्या अमृत आहाराचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्यामुळे आणि आहार वाटपात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा अनेक तक्रारी आल्यामुळेच, शासनाच्या निर्देशानुसार गोकुंदा ग्रा.पं.च्या कक्षेतील अंगणवाड्यामध्ये स्थानिक बचतगटांमार्फत अमृत आहार वाटप करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला होता. आहार वाटप करणार्या बचतगटांचे अध्यक्ष व सदस्य लाभार्थ्यांच्या घरी जाऊन, आहाराच्या दर्जा व वाटपाबाबत माहिती घेत होते. त्यामुळे त्यांच्या कामाबद्दल आम्ही समाधानी असल्यामुळे, दुसर्या यंत्रणेला आहार वाटप देण्याऐवजी पूर्वीच्या महिला बचतगटांकडेच आहार वाटपाचे काम द्यावे, अशी मागणी केलेली आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याकडेही पाठविण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment