सागीतस्कराचा वनकर्मचार्‍यांवर तलवारीने हल्ला; आरोपी जेरबंद सुमारे 87 हजाराचा मुद्देमाल जप्त - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 12 March 2021

सागीतस्कराचा वनकर्मचार्‍यांवर तलवारीने हल्ला; आरोपी जेरबंद सुमारे 87 हजाराचा मुद्देमाल जप्त

 किनवट,  (प्रतिनिधी) : वनविभागाच्या पथकाने सागवान तस्करी करणार्‍या वाहनाला अडविले असता, त्यातील तस्कराने तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही, वनकर्मचार्‍यांनी  धाडसाने त्यास जेरबंद केले. चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. वाहनासह अवैध सागवान नग धरून जवळपास 87 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही घटना घोगरवाडी मार्गावर बुधवार (दि.10) च्या मध्यरात्रीनंतर सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडली.


     सागवान तस्करी होणार असल्याची गुप्त खबर वनविभागास  मिळाल्यावरून  घोगरवाडी ते किनवट मार्गावरील पुलाजवळ  बुधवारी रात्री दहा पासून दबा धरून बसल्यानंतर रात्री साडे-बाराच्या सुमारास टाटा एसीई एम.एच.22 एन 1858 या क्रमाकांच्या वाहनाबद्दल संशय आल्यावरून वनपथकाने त्यास अडवून तपासले असता, त्यात अवैध कटसाईज सागवानाचे नग आढळून आले. दरम्यान वाहनात लपलेला सराईत सागीतस्कर शेख अक्रम शेख सरदार  (वय 42 वर्षे,रा.बिलालनगर, गोकुंदा)  याने जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडील लोखंडी तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वन कर्मचार्‍यांनी धाडस करून त्यास पकडले. मात्र, अंधाराचा फायदा घेत चालक  फरार झाला. 0.3382 घनमिटर भरलेले आठ कटसाईज सागवान नगाची बाजारभावाप्रमाणे 21 हजार 065 रुपये किंमत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 60 हजाराचे वाहन, लोखंडी तलवार, आरोपीचा विवो कंपनीचा मोबाईल असे सर्व मिळून जवळपास 87 हजार 465 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वनरक्षक घोगरवाडी यांनी 11 मार्च 2021 रोजी नोंदविलेल्या वनगुन्हा क्र. 02/2021 अन्वये भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26(1) एफ.डी.41(1),(2),52(2),26(4),65(ए),74,69,77,42 व महाराष्ट्र वन नियमावली 2014 चे कलम 31,82,83 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.


       सदर मोहीम यशस्वी करणार्‍या पथकात वनविभागाचे सहाय्यक संरक्षक एम.आर.शेख, वनपरिक्षेत्र अधिकारी के.एन.खंदारे, वनपाल के.जी.गायकवाड, माझळकर, एस.एन.सांगळे, वनरक्षक डोईफोडे, अरुण चुक्कलवार, संतोष गायाळ, गजानन कापसे, कुलदीप मुळे, सुनिल खामकर, पी.के.माहुरे, एस.वैद्य, वाहनचालक आवळे व भुतनर आदी वनकर्मचार्‍यांचा सहभाग होता.

No comments:

Post a Comment

Pages