किनवट, दि.25 : फेसबुक अकाउंटवर मैत्री करुन एका शिक्षिकेस 5 हजार अमेरिकन पाउंड वाढदिवसानिमित्त भेट देण्याच्या बहाण्याने दोन भामट्यांनी सुमारे 4 लाख 26 हजार रुपयाला गंडविले. या प्रकरणी मांडवी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अज्ञात महिला व एका पुरुष भामट्याने संगनमताने किनवट तालुक्याच्या उमरी बाजार येथील जिल्हा परिषद शाळेतील 46 वर्षीय शिक्षिकेच्या फेसबुक अकाउंटवर ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवून त्यांच्याशी मैत्री केली. आम्ही अमेरिकेत राहातो, अशी बतावणी केली. अल्पावधीतच सदर शिक्षिकेचा विश्वास संपादन करून ‘त्या’ शिक्षिकेच्या वाढदिवसानिमित्त 5 हजार अमेरिकन पाउंड भेट म्हणून पाठवू, असे आमिष दाखविले. त्यानंतर दि.10 मे पूर्वी त्या भामट्यांनी शिक्षिकेस आम्ही बक्षिसाचे पार्सल पाठवले आहे. करापोटी काही रक्कम आमच्या खात्यात जमा करा, असे सांगितले. सदर शिक्षिकेने त्या भामट्यांवर विश्वास ठेवत दि.10 ते 13 मे दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सारखणी शाखेतून तब्बल 4 लाख 26 हजार रुपये भामट्यांच्या खात्यावर पाठवले. आठवडा लोटला, तरी बक्षिसाचे पार्सल आले नसल्याने, आपली फसगत झाल्याचे त्या शिक्षिकेच्या लक्षात आले. या प्रकरणी शिक्षिकेने मांडवी पोलिसांत एरिक एडवर्ड आणि 7042874978 क्रमांकाचा सिमकार्ड वापरणारी महिला या दोघांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा क्रमांक 52/2021 कलम 420, 34 भारतीय दंड संहितेनुसार दाखल केला आहे. भामट्यांचा शोध सुरु असल्याची माहिती मांडवी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दुर्गादास मल्हारी यांनी दिली.
No comments:
Post a Comment