पीक विमा परताव्यासाठी केवळ एक हजार 613 शेतकर्‍यांचे अर्ज किनवट तालुक्यातील स्थिती : सर्वाधिक दावे सोयाबीनचे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 31 July 2021

पीक विमा परताव्यासाठी केवळ एक हजार 613 शेतकर्‍यांचे अर्ज किनवट तालुक्यातील स्थिती : सर्वाधिक दावे सोयाबीनचे

किनवट, दि.31 : पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत स्थानिक आपत्तीमुळे (अतिवृष्टी) झालेल्या पीक नुकसानीबद्दल विमा परतावा मिळावा यासाठी, किनवट तालुक्यातील  308 शेतकर्‍यांनी ऑफलाईन तर 1 हजार 305 शेतकर्‍यांनी ऑनलाईन अर्जाद्वारे विमा कंपनीस पीक नुकसानीची माहिती (इंटीमेशन) 72 तासाच्या आत  कळविली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.


   किनवट तालुक्याच्या सातही मंडळात बुधवार (दि.21) रोजी धुवांधार अतिवृष्टी होऊन नदी व ओढ्यांसह पैनगंगेच्या पुरामुळे तिरावरील शेतात पाणी घुसून कापूस,सोयबीन, तूर,मूग, उडीद, ज्वारी या पिकांचे अतोनात नुकसान झाले. काही ठिकाणी जमीन खरडून गेली. सर्वाधिक पाऊस जलधारा मंडळात तब्बल 207.5 मि.मी.झाला. त्यापाठोपाठ इस्लापूर(175.8मि.मी.) व शिवणी(174मि.मी.) मंडळात झाला. या तडाख्याचा सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसल्याचे शेतकर्‍यांकडून कळाले.


       पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत टोल फ्री क्रमांक, ऑनलाईन कंपनीच्या मेल आयडी वर अथवा क्राप इन्शुरन्स अ‍ॅपद्वारे तक्रार दाखल करण्याची सुविधा  केवळ 1,305 अर्ज आल्याने किनवट तालुक्यात तरी कुचकामी ठरत असल्याचे दिसते. गतवर्षीपासून नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये इफ्को टोकीयो जनरल इन्शुरन्स कंपनीकडे विम्याचे काम दिलेले आहे. नियमानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांचे पीक नुकसान झाल्यास पूर्वी 48 तासाच्या आत त्यांनी विमा कंपनीस माहिती देणे आवश्यक होते; परंतु, दुर्गम भागात राहणार्‍या शेतकर्‍यांना हा अवधी अपुरा पडू लागल्याने ही सुविधा 72 तासांपर्यंत वाढविण्यात आली. मात्र मागच्या अतिवृष्टीनंतरही पावसाचे थैमान चालूच होते. त्यामुळे तक्रारीसाठी ही 72 तासांची सवलतही अपूर्ण पडत आहे.  नुकसानग्रस्त शेतकर्‍यांशी बोलल्यानंतर कळाले की, ग्रामीण भागात त्यावेळी वीज नव्हती, अनेकांना याविषयीचा संदेश वेळेवर मिळाला नाही, कंपनीचा टोल फ्री क्रमांक लागत नव्हता, अ‍ॅपवर दावा दाखल करतांना अनेक अडचणी आल्यात, काही शेतकर्‍यांचा शेतातील पिकांमध्ये साचलेले  पाणी काढण्यात वेळ गेल्यामुळे, ते वेळेत अर्ज करून शकले नाहीत. तालुक्यातील  पीक विमा काढलेल्या शेकडो शेतकर्‍यांपैकी अनेकांचे नुकसान होऊनही ऑनलाईन केवळ 1 हजार 305 तर प्रत्यक्ष विमा प्रतिनिधीकडे येऊन लेखी अर्ज केलेल्या शेतकर्‍यांची संख्या फक्त 308 आहे. यावरूनच शेतकर्‍यांना आलेल्या अडचणी खर्‍या होत्या, त्यामुळेच अनेक हानीग्रस्त शेतकर्‍यांना  विमा परताव्यासाठी अर्ज वेळेच्या आत करता आला नसल्याचे कळते. यावरील उपाय म्हणून अनेक आपद्ग्रस्त शेतकर्‍यांनी हा 72 तासाच्या आत अर्ज करण्याचा जाचक नियम बदलावा अशी मागणी केली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांना शेतकर्‍यांच्या अडचणी लक्षात आल्यामुळे, त्यांनी नुकसानीची सूचना (इंटिमेशन) देण्यासाठी शेतकर्‍यांना 72 तासांची सक्ती विमा कंपन्यांना करता येणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्याचे कळते.


     विविध गावच्या शेतकर्‍यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधीस प्रत्यक्ष भेटून दिलेल्या अर्जांचा तपशील : पार्डी बु. 58, बोधडी बु. 11, प्रधानसांगवी. 15,  कोपरा 09, भुलजा  13, येंदा 07, बुधवारपेठ  03, चिखली बु. 38, कणकी 06, किनवट 17, दिंगडी मंगाबोडी  18, नागझरी 13, शिवणी 03,चिखली (ई) 28, जलधारा 02, सावरगाव तांडा  04, इस्लापूर 02, परोटी 03, मारेगाव खालचे  58 असे एकूण 308 अर्ज वरील गावातून ऑफलाईन प्राप्त झालेत.

No comments:

Post a Comment

Pages