तथागत बुद्धांच्या जीवनात आषाढ पौर्णिमेला घडलेल्या चार महत्त्वाच्या घटना - महेंद्र नरवाडे,बौद्धाचार्य - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 23 July 2021

तथागत बुद्धांच्या जीवनात आषाढ पौर्णिमेला घडलेल्या चार महत्त्वाच्या घटना - महेंद्र नरवाडे,बौद्धाचार्य

         आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा तीन महिन्याचा  वर्षावास कालावधी.भिक्खु या कालावधीत विहारात राहून उपासक,उपासिकांना धम्मदेसना देतात.या वर्षावासाचा प्रारंभ आषाढ पौर्णिमेला होतो.या प्रसंगी आषाढ पौर्णिमेला तथागत बुद्धांच्या जीवनात कोणत्या महत्वाच्या घटना घडल्या हे जाणून घेण्यास आपणास निश्चितच आवडेल. त्या महत्वाच्या घटना पुढील प्रमाणे आहेत.

1) पहिली घटना-आषाढ पौर्णिमेला महाराणी महामायेने रात्री एक स्वप्न पाहिलं-महामायेने आषाढी पौर्णिमेच्या रात्री गाढ झोपेत असताना एक स्वप्न पाहिलं .ते स्वप्न सकाळी उठल्यावर महाराजा शुद्धोदनास महामायेने सांगितले.राजा शुद्धोधनाने आपल्या दरबारात काही स्वप्न तज्ञाला  शास्त्रींना दरबारात बोलाऊन स्वप्नांचा अर्थ विचारला . शास्त्रीनी सुखद बातमी सांगितली की, महाराज आपल्या घरी एक राजपुत्र जन्माला येणार आहे.महाराणीला या आषाढी पौर्णिमेला गर्भधारणा झाली.म्हणुन या पौर्णिमेस 'गर्भमंगल दिन 'असेही म्हणतात.

2)दुसरी घटना म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा गृहत्याग-

       रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलिय हे दोघेही आपापल्या शेतीकरिता वापरीत असत .सुगीच्या हंगामात या नदीचे पाणी कोणी प्रथम घ्यावे? व किती घ्यावे? यावरुन वाद होत होता.हा वाद मिटविण्यासाठी शाक्य संघाने युद्धाचा उपयोग करावा हा निर्णय शाक्य सभेत घेतला. या निर्णयाला सिद्धार्थ गौतमाने विरोध दर्शविला.संघाचा आदेश मोडला म्हणून शाक्य संघाने शिक्षेसाठी सिद्धार्थासमोर तीन पर्याय ठेवण्यात आले.

1.सैन्यात दाखल होवून युद्धामध्ये सामील  होणे.

2.देहांत शासन स्वीकारणे किंवा देशत्याग करणे.

3.कुटुंबाच्या सर्व मालमत्तेची जप्ती आणि सामाजिक बहिष्कारास राजी होणे.

   यापैकी दुसरा पर्याय सिद्धार्थाने मान्य केला.यातील पहिली शिक्षा देहांत शासन त्यांनी मान्य केली नाही कारण ती शिक्षा देशद्रोही गंभीरअपराधासाठी होती.राहिला पर्याय देश त्यागाचा .हा पर्याय त्यांनी स्वखुशीने स्वीकारला.आपल्या कुटुंबाचा निरोप घेऊन वयाच्या 29व्या वर्षी सिद्धार्थाने आषाढी पौर्णिमेला गृहत्याग केला.

3)तिसरी घटना म्हणजेच पंचवग्गीय भिक्खुंची धम्मदिक्षा-

        तथागतास संबोधी प्राप्त झाल्यावर  ते धम्मज्ञान कोणास सांगावे?किंवा कोणास सांगु नये?असा जेंव्हा त्यांना प्रश्न पडला तेंव्हा त्यांना आलारकालामची आठवन झाली परंतु ते मृत्यू पावले होते.त्यानंतर उद्दक रामपुत्ताला सांगावे असे वाटले. आठ दिवसांपूर्वी उद्दक रामपुत्त ही मृत्यू पावल्याचे समजले.नंतर निरंजना नदीकाठी घोर तपश्चर्येच्यावेळी जे पांच शिष्य त्यांचेबरोबर होते .नंतर त्यांना ते सोडून गेले होते.त्यांना सांगावे म्हणून त्यांचा शोध घेतला.

 कौंडिण्य,वप्प,भद्दीय,महानाम व अश्वजित हे ते पाच शिष्य होत.या पांच शिष्यांना सारणाथ येथील मृगदाय वनात  तथागतानी आषाढ पौर्णिमेला प्रथम धम्मोपदेश केला.यालाच प्रथम धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात.

4)चौथी घटना म्हणजे वर्षावास प्रारंभ-

      पावसाळ्याच्या दिवसात कोण्या एका विहारात राहून धम्मोपदेश करणे यालाच वर्षावास म्हणतात.तथागतांनी संघासाठी नियम घालून दिलेला होता की दोन भिक्खुंनी एकत्रितपणे न फिरता, वेगवेगळ्या दिशेने धम्मप्रचार-प्रसार करावयाचा.एका गावी दोन दिवसांपेक्षा अधिक मुक्काम करायचा नाही धम्मची शिकवन देता - देता भिक्षाटन करून चरितार्थ चालवावा.

   तथागतांनी सारनाथ येथील मृगदाय वनात पंचवग्गीय भिक्खुंना  प्रथम धम्मदिक्षा दिली.तो काळ पावसाळ्याचा होता तेव्हा तथागताने साजरा केलेला वर्षावास हा तथागतांचा बौद्ध-धम्माचा प्रथम वर्षावास म्हणून ओळखला जातो तो ही आषाढी पौर्णिमेचा दिवस होता.

             तथागतांनी सुरू केलेला वर्षावास आजतागायत सुरू आहे हे विशेष.अशा या वर्षावासाची सुरुवात आषाढी पौर्णिमेपासून होते व शेवट अश्विन पौर्णिमेला होते.

         - महेंद्र नरवाडे,बौद्धाचार्य

               मो.न.9421768650.

No comments:

Post a Comment

Pages