वादळशी झुंजायला शिकविणारे व्यक्तिमत्व : डॉ. हेमंत कार्ले - गंगाधर ढवळे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 13 July 2021

वादळशी झुंजायला शिकविणारे व्यक्तिमत्व : डॉ. हेमंत कार्ले - गंगाधर ढवळे

 


मानवी स्वभाव हा व्यक्तिशः वेगवेगळ्या प्रकारचा असतो. तो प्रत्येकाचा वेगळा असतोच परंतु क्वचितच दोन व्यक्तींतील स्वभाव गुणधर्मात काही साम्य असू शकते. ते कधी कधी कमालीचेही असू शकते. सामाजिक जीवनात वावरताना अनेक लोकांना आपण अनुभवतो. त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतो. मोजक्याच काही लोकांचे स्वभाव मूलतः मैत्रीपूर्ण असतात. ते दोन लोकांतील जिव्हाळ्याचे संबंध जाणतात. मैत्रेय भावना विकसित करतात. ती नैसर्गिकरीत्या निर्माण होत असली तरीही त्याच्या मूळाशी स्नेहबंधाचे एक ‌कारण असते. मैत्रीचे हे आदीबंध बदलत्या स्वभावातही निर्माण होत असतात. म्हणून जात्याच ज्यांचा स्वभाव मैत्रेय आहे अशा लोकांचे प्रतलही मोठे असते. गणिताच्या गणनप्रक्रियेत ते मावत नाहीत. म्हणूनच त्यांची गणना ही अत्यंत वेगळ्या अर्थाने आपण करतो; जिथे त्याआधीच पोहोचलेले असतात. ज्या साधनासंबंधाने त्यांचा उल्लेख करतो असे भावबंध त्यांच्याच इभ्रतीला शोभून दिसतात. त्यांना जीवनाचे प्रयोजन तथा मर्म उमगलेले असते. आपले जीवन डोळ्यांना ढापणं लावून अगदी खुशालचेंडूसारखे उड्या मारत जगणारे अनेक आहेत. परंतु इतरांना आपल्याला मिळालेल्या मानवी जीवनाचा अर्थ सांगून खरे जीवन जगणारे आणि इतरांना जगायला लावणारे लोक आपल्या सभोवती अगदी थोडेच असतात.  डॉ. हेमंत कार्ले हे त्यापैकीच एक आहेत. 



                    अगदी  धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनाला कोरोनासारख्या महामारीने पूर्णतः बदलून टाकले आहे. जगण्याचे संदर्भच यामुळे बदलले गेले आहेत. डॉ. कार्ले यांच्या भूमिका मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वापासून ढळल्या नाहीत. कोणत्याही संकटाशी भिडण्याची त्यांची बालपणापासूनची निर्भिड वृत्ती अत्यंत भयभिततेच्या क्षणोक्षणीही सतत एका योद्ध्यासारखीच राहिलेली आहे. पिसाळलेल्या परिस्थितीची त्यांनी केलेली सूर्यसमीक्षा अजूनही तेजस्वीच आहे. बालपण गरिबीत गेलेले असले तरी या गरिबीला त्यांनी स्वतःवर स्वार होऊ दिले नाही. अनुकुलतेपेक्षा प्रतिकूलतेला ते हळूवारपणे वेधून घेतात. प्रत्यक्षात जगण्याचे आणि जगण्याच्या कोलाहलाचे प्रबंध ते मूलांना शिकवितात. ते शिक्षक आहेत म्हणूनच नव्हे तर काळोखावर मात करीत जाणाऱ्या उजेडाचा अभ्यासक्रमच त्यांनी तयार केला आहे. हे आपणास अतिशयोक्तीयुक्त वाटू शकेल परंतु ते अगदी सत्य आहे. हे त्यांच्या जवळच्या लोकांना प्रत्यही अनुभवास येते. या लोकांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू माहिती आहेत. म्हणूनच तावून सुलाखून घेतलेला हा त्यांचा मित्र परिवार त्यांच्या शब्दाला तोलून धरतो. ही त्यांनीच निर्माण केलेल्या वर्तुळाची सौंदर्यपूर्ण परिभाषा आहे. त्यांच्या विचारांत तरळत असलेली तत्वज्ञाने ही मैत्रीच्या सौंदर्याचीच शब्दभाषा आहे. या काळजापासून त्या काळजापर्यंत पोहोचणारी ही बोलीभाषा आहे.  



           काल, रविवारी अनेक दिवसांपासून उन्हाळ्याच्या झळा पेरीत जाणारा पाऊस यथेच्छ कोसळला. मी मात्र हा पाऊस ओसरीत बसून अनुभवला. तो जसजसा कोसळत राहिला तसतसा मी अस्वस्थ होत होतो. माझ्या अस्वस्थ होण्याची कारणे वेगळी आहेत. ती फक्त माझ्याशीच संबंधित आहेत. मात्र याआधीही मी जेव्हा अस्वस्थ होत असे किंवा अस्वस्थता आगतिकतेत रुपांतरीत होत असे तेंव्हा ते 'काही काळजी करू नका' असे ते नेहमी म्हणत आणि तीव्रतेने मनोबल वाढवत. हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यच आहे. अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संसदेने नांदेड शहरात डिसेंबर २०१७ मध्ये आयोजित केलेल्या पहिल्या आंबेडकरी विचारवेध संमेलनाचे ते मुख्य संयोजक होते. हे संमेलन ऐतिहासिक झाले त्यासाठी ते किमयागार ठरले. यावेळी  सबंध संमेलन यशस्वी होईपर्यंत काही काळजी करण्याचे कारण नाही असे बजावत असत. त्यांच्या अंगी असलेल्या सद्गुणांची त्यावेळी प्रचिती आलीच परंतु अवघडाला सोपे कसे बनवावे हा वस्तुपाठच अनेकांनी अनुभवला. अनेक विद्यार्थ्यांना घडवित असतांना त्यांनी कोणताही दुजाभाव बाळगला नाही. ते सतत योग्य प्रतिमांचे, प्रतिभांचे, गुणवत्तेचे, जीवनदृष्टांताचे, खडतर मार्गावरुन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या प्रवासाचे उन्नयन करीत असतात. ते कमजोर प्रवृत्तींचा निषेधच करीत आले आहेत. अडथळे निर्माण करणाऱ्या महानुभावांना यशस्वीतेचे दर्शन घडवित आले आहेत. असंमजस वातावरणातील भित्र्या छत्र्यांना वादळाशी झुंजण्याचे बळ ते देत आले आहेत. 



              डॉ. कार्ले हे राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक आहेत. त्यांचे विद्यार्थ्यांसाठीचे अनेक प्रकल्प वाखाणण्याजोगे आहेत. शैक्षणिक वर्तुळावर त्यांची पक्की मांड आहे. शिक्षकांच्या चळवळीतही त्यांनी आत्तापर्यंत आपली कणखर भूमिका निभावली आहे. अथांग पसरलेला समुद्र पाहून भितीपोटी किनाऱ्यावरच थांबणाऱ्यांपैकी ते नक्कीच नाहीत. त्यांच्यावर एकाचवेळी गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मार्क्सच्या विचारांचा प्रभाव आहे. तरीसुद्धा ते कोणत्याही तत्वांची सरमिसळ करीत नाहीत. ते नेमकेपणाने आपली भूमिका स्पष्ट करतात. उसतोड कामगारांच्या मुलांसाठी शिक्षण हा त्यांचा प्रबंधाचा विषय होता. ही मांडणीही त्यांनी शैक्षणिक चळवळीशी पोषक असणाऱ्या विचारसरणीवर आधारित केली असल्याचे आपणास दिसते. धम्मक्रांतीनंतरही जात धर्माचा प्रखर पगडा असणाऱ्या समाजव्यवस्थेत राहून एका योद्ध्याप्रमाणे ते षड्डू ठोकून उभे राहिले. आंतरजातीय विवाह करून जातनिर्मुलनाच्या आंबेडकरी सोहळ्यात सहभागी झाले. हा धम्माचा धर्माशी आणि अंतर्गत जात संस्कृतीशीही मोठाच काळ दिलेला लढा होता. स्वत:च्या हिंमतीवर शून्यातून विश्व निर्माण करण्याची ही साहसमय चळवळ होती. संघर्षमय जीवनातून ते आज यशस्वी झालेले आहेत. दुःखाला सुखनैव क्षणांची झालर लावण्यात ते यशस्वी झाले आहेत. विचारांच्या साधनसंपत्तीचे ते दायाद बनले आहेत. अनेक तळहातांच्या मुठीत त्यांनी उद्याच्या उज्ज्वलतेचा आराखडा बंदिस्त केला आहे. ती मूठ उघडून काय करायचे हे मात्र त्या हातांवरच अवलंबून आहे.



             डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय माणसाच्या अखिल कल्याणाची भूमिका घेतली. विचारांचा वारसा म्हणून केवळ प्रचार आणि प्रसार करीत फिरणार्‍या बोलघेवड्या लोकांच्या कालखंडात बाबासाहेब जगणारी एक पिढी उदयाला येत होती. त्या पिढीने बोधीवृक्षाच्या पिंपळपानांतून होणार्‍या पहाटेचा सुर्योदय जगण्याच्या कणाकणांत भरुन घेतला होता. प्रस्थापित आंबेडकरी अनुयायांची तत्कालीन भूमिका फारशी प्रगल्भ नव्हती. ते आश्चर्याचेच औदार्य दाखवित होते आणि दुसरीकडे सूर्यसंस्कारी पिढी आंबेडकरी क्रांतीकारी पावले टाकीत होती. या पावलांनी जातीपातीच्या क्षुल्लक  भिंती पार ओलांडल्या होत्या. या युद्धानंतर जन्माला येणारी नवनवेन्मेषशाली चौथी पिढी अनेक बुद्धीवादी स्थित्यंतराचा परिपाक ठरली. एकदा आमच्या धम्मसंगिनी पंचफुला यांनी या क्षणांचे सौंदर्यात रुपांतर करायचे ठरविले. आयु. संगिता कार्ले या बुद्धवादी सौंदर्य ल्यालेल्या त्यागस्विनीच्या वाढदिवसाचा विलक्षण आनंद देणारा एक क्षण टिपला. त्याला द्विगुणित करणार्‍या डॉ. अनार्या कार्ले यांच्या एम. डी. मेडिसिन या उच्चविद्या प्रांतात प्रवेशणाऱ्या नवायुष्याला सुगंधित मंगल सदिच्छांनी कामनांकित केले. त्यामुळे या पाच फुलांच्या एकत्व सुवासिक समुदायाचा अभिमानच वाटावा याचे कारण म्हणजे डॉ. हेमंत कार्ले आणि संगिता कार्ले या द्वयींचे भावनाप्रधान स्नेहसंबंध. या बंधांचे मातृपितृतुल्य आदिबंधही बाबासाहेबांच्या विचारांचे विश्वसौंदर्य प्रस्थापित करण्याचे एक कारण आहे. या कुटुबांच्या आणि आज डॉ. कार्ले यांच्या वाढदिवसानिमित्त दीर्घायुषी आणि यशस्वी प्रवासास लक्ष लक्ष  मंगल सदिच्छांचे  पुष्पगुच्छ अर्पण करतो आणि थांबतो.

   - गंगाधर ढवळे, नांदेड.

No comments:

Post a Comment

Pages