तरुणांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उद्योजक निर्माण अभियान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 24 July 2021

तरुणांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उद्योजक निर्माण अभियान

नांदेड : तरुणांना त्यांच्या मनातील उद्योग व्यवसाय उभा करण्यात मदत करण्यासाठी आता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुढे सरसावली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या संकल्पनेतून आणि प्रदेश सरचिटणीस तुषार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यासह नांदेडात हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर यांनी दिली. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत काही दिवसांपूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाची घोषणा करण्यात केली आहे. अभियानांतर्गत उद्योग- व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांची नोंदणी करण्यात येणार असून त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांची व अनुदानांची माहिती देण्यात येणार आहे. 


दरम्यान, तरुणांना जो उद्योग-व्यवसाय उभा करायचा आहे. त्याबाबत तज्ञाचे मार्गदर्शन, उद्योग-व्यवसायाच्या प्रत्यक्ष क्षेत्र भेटी, प्रकल्प अहवाल, भांडवल उभारणीचे पर्याय, यंत्र सामुग्री आणि पायाभूत सुविधा उभारणी याबाबतचे मार्गदर्शन आणि सहकार्य राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 


या उपक्रमाच्या माध्यमातून येणाऱ्या वर्षभरात किमान ५०० उद्योजक तयार करण्याचा मानस प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी व्यक्त केला असून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,  मराठवाडा विभागाचे अध्यक्ष कदम, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे श्रीकांत मांजरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबविणार असून जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages