"शब्दक्रांती " मधील कविता ह्या जाणिवांना नेणिवेच्या वाटा मुक्त करून देणाऱ्या अभिव्यक्ती -प्रसिद्ध गझलकार मधु बावलकर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 28 July 2021

"शब्दक्रांती " मधील कविता ह्या जाणिवांना नेणिवेच्या वाटा मुक्त करून देणाऱ्या अभिव्यक्ती -प्रसिद्ध गझलकार मधु बावलकर

किनवट : कविंच्या अंतर्मनातील भाव आंदोलने असलेल्या "शब्दक्रांती " मधील कविता ह्या जाणिवांना नेणिवेच्या वाटा मुक्त करून देणाऱ्या अभिव्यक्ती आहेत. तंत्रसूत्राच्या डोहात न तुंबता खळाळून वाहणाऱ्या विचार प्रवाह आहेत. यातील सर्व सृजक नव्या पिढीचे प्रतिनिधी आहेत, असे प्रतिपादन तेलंगणातील प्रसिद्ध गझलकार मधु बावलकर यांनी केले.    

           जेतवन बुद्ध विहार सिद्धार्थनगर येथे स्मृतीशेष नाटककार प्रा. डॉ. अंबादास कांबळे नगरीमध्ये क्रांतीसूर्य प्रतिष्ठानने प्रकाशनासाठी सिद्ध केलेल्या उत्तम कानिंदे व रमेश मुनेश्वर संपादित "शब्दक्रांती " या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ साहित्यिक ऍड. के. के. साबळे, ऍड. मिलिंद सर्पे हे प्रमुख अतिथी उपस्थित होते. त्यांनीही यावेळी विचार मांडले. 

          पुढे बोलतांना बावलकर म्हणाले, "शब्दक्राती " हा काव्यसंग्रह आंबेडकरी काव्यप्रांतात महत्त्वाची भर घालून अभिसरणाच्या प्रक्रियेला गतिमान करणारा आहे. यात प्रतिमांचा सोस नाही अथवा दुःख चव्हाट्यावर मांडण्याचा हव्यास नाही. आपल्या भवतालाचा वेध घेणं अन् अभिव्यक्त होणं हीच खरी या संग्रहातील कवितांची ओळख आहे. यापुढे नुसत्या कोरड्या आरोळ्या ठोकून चालणार नाही तर कृतिशील होण्याची अत्यावश्यकता आहे. असेही ते यावेळी म्हणाले.

         प्रारंभी मान्यवरांनी महानायकांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण केले. सुरेश पाटील यांनी वंदना घेतली व अभिवादन गीत गायले. नुकतेच निधन झालेले स्मृतीशेष नाटककार प्रा. डॉ. अंबादास कांबळे, अनिल शिंदे, चित्रकार प्रा. संजयकुमार बामणीकर व हर्षकुमार नगारे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. 

        उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन व रमेश मुनेश्वर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी आभार मानले. या काव्यसंग्रहास मुखपृष्ठ दिलेले आंतराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार रणजीत वर्मा, रवि जाभाडे व  मिलिंद कंधारे या अतिथी कविंसह या काव्यसंग्रहात सहभागी कवी मारोती काळबांडे, सुमेध घुगरे, प्रा. विनोद कांबळे, राजू कांबळे , परमेश्वर सुर्वे, वंदना तामगाडगे, प्रा. धनराज हलवले, सुरेश शेंडे, राजा तामगाडगे, प्रा. एच.डी. वाठोरे, नंदा नगारे , राजेश पाटील, प्रा. सुबोध सर्पे, प्रतिक्षा ठमके, शीलरत्न पाटील, प्रा. आनंद सरतापे आदींचा ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

           याप्रसंगी उपस्थित असलेले प्रा.रविकांत सर्पे, सुमेध भवरे,सखाराम घुले, धम्मसेवक खंडू मुनेश्वर, साहेबराव वाढवे, बालाजी वाढवे, सुधीर पाटील, शाहीर नरेंद्र दोराटे, तथागत येरेकार, माला नगारे, रोहिनी मुनेश्वर, संजय मरडे, प्रकाश सोनवणे, निवेदक न्यूजचे निवेदक कानिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे संयोजक महेंद्र नरवाडे, रुपेश मुनेश्वर, कामराज माडपेल्लीवार, क्षितीज मुनेश्वर यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages