किनवट तालुक्यात आतापर्यंत झाले 27.77 टक्के लसीकरण ; ग्रामीण व आदिवासींमध्ये लसीकरणाविषयी गैरसमजुती : प्रशासनाद्वारे केले जातेय प्रबोधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 31 August 2021

किनवट तालुक्यात आतापर्यंत झाले 27.77 टक्के लसीकरण ; ग्रामीण व आदिवासींमध्ये लसीकरणाविषयी गैरसमजुती : प्रशासनाद्वारे केले जातेय प्रबोधन

किनवट, दि.31 : शहरासह किनवट तालुक्यातील एकूण  1 लाख 81 हजार 368 व्यक्तींना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. लसीकरणास सुरूवात झाल्यापासून आतापर्यंत 50 हजार 376 व्यक्तींना पहिला डोस तर 16 हजार 323 व्यक्तींना लसीचा दुसरा डोस देण्यात आला असून, तालुक्यात उद्दिष्टाच्या 27.77 टक्के लसीकरण  झालेले आहे.


       गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात 25 जानेवारी 2021 रोजी  कोविडची लस उपलब्ध झाल्यानंतर आ.भीमराव केराम यांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधिकार्‍यांना देण्यात आली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, नर्स आदी जवळपास 177 आरोग्य कर्मचारी  आणि  आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सर्व एएनएम व एमपीडब्लू अशा सुमारे 1 हजार 400 फ्रंटलाईन वर्कर्स, दुसर्‍या टप्प्यात 60 वर्षावरील ज्येष्ट नागरीक व 45 वर्षावरील गंभीर आजार असणारे, तिसर्‍या टप्प्यात 45 वर्षावरील सर्व व्यक्ती, चौथ्या टप्प्यात 30 वर्षावरील सर्व व्यक्ती तर पाचव्या टप्प्यात 18 वर्षावरील सर्व व्यक्तींचे लसीकरण सुरू करण्यात आले.


     किनवट तालुक्यातील 18 ते 44 वयोगटातील 1 लाख 05 हजार 798 व्यक्तींचे तर 45 वर्षावरील   75 हजार 570  व्यक्ती  मिळून एकूण 1 लाख 81 हजार 368 व्यक्तींच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. तालुका आरोग्य विभागामार्फत तालुक्यातील 68 विविध ठिकाणी कोविड व्हॅक्सीन सेंटर (केंद्र) सुरू असून,  उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा व ग्रामीण रुग्णालय मांडवी येथेही लसीकरण करणे सुरू आहे. या सर्वांचे मिळून आतापर्यंत हेल्थवर्कस(एचसीडब्लू)1 हजार 658, फ्रंटलाईन वर्कर्स(एफएलडब्लू) 2 हजार 262, अठरा वर्षावरील व्यक्ती 18 हजार 009 तर 45 वर्षावरील 28 हजार 447 असे एकूण 50 हजार 376 व्यक्तींना (कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सीन मिळून) कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तसेच लसीचा दुसरा डोस दिलेल्या एकूण 16 हजार 323 व्यक्तींमध्ये 459 हेल्थवर्कर , 910 फ्रंटलाईन वर्कर्स , 18 ते 44 वयोगटातील 2 हजार 117 तर 45 वर्षावरील सर्व व्यक्तींमध्ये 12 हजार 837 जणांचा समावेश आहे.


         मधील काळात कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सीन लसीचा तुटवडा असल्यामुळे लसीकरणाची गती मंदावली होती. ही लस टोचून घेण्यात मध्यमवर्गीय, सेवानिवृत्त नोकरदार, व्यावसायिक व सुशिक्षित समाज घटकांतील नागरिक पुढे सरसावल्याचे दिसून आले. मात्र, कष्टकरी व गोरगरीब समुदायातील नागरिक अजूनही निडरपणे लस घेण्यासाठी केंद्रात येत नसल्याचे वास्तव आहे. ग्रामीण भागातील अशिक्षित नागरिक अन् विशेषत: आदिवासी व आदीम कोलाम जमातीतील ग्रामस्थांमध्ये कोरोना महामारीविषयी बर्‍याच गैरसमजुती असून, काही अफवांचाही त्यांच्यावर परिणाम झालेला दिसतो. कष्टाची कामे करणार्‍यांना कोरोना होत नाही, कोरोना श्रीमंतांचा आजार आहे, घरगुती उपचाराने कोरोना बरा होतो, लस घेतल्याने पुन्हा प्रकृती बिघडते, जुने आजार पुन्हा वाढू शकतात, लस घेऊनही  लोकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे, त्यामुळे लस घेऊन काही फायदा नाही, अशा अनेक गैरसमजुती त्यांच्या मानसीकतेत असल्यामुळे, त्या वर्गातील बरेच लोक  लस घेण्यास पुढाकार घेत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार,स्वत: आ.भीमराव केराम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय मुरमुरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.उत्तम धुमाळे आदींनी दुर्गम भागातील आदिवासी पाड्या-गुड्यावर जाऊन त्यांचे प्रबोधन केल्यामुळे, बराच फरक पडून अनेकांचे लसीकरण झाले. शिवाय एलईडी वॉल व्हॅनद्वारे सुद्धा गोंडी,बंजारा आदी भाषेतील गीतातून आणि पथनाट्यातूनही मिडिया समन्वयक उत्तम कानिंदे यांनी त्यांच्या संचाद्वारे उत्तम जनजागृती केल्यामुळेही बर्‍यापैकी लसीकरण झाले. सुरुवातीस दोन डोस मधील अंतर 28 दिवसाचे होते; संशोधनाअंती ते 84 दिवसाचे केल्यामुळेही दुसरा डोस घेण्यास वेळ लागत आहे.

No comments:

Post a Comment

Pages