भिमाची आज्ञा मोडू नका सांगणारा गायक : कृष्णा शिंदे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 4 August 2021

भिमाची आज्ञा मोडू नका सांगणारा गायक : कृष्णा शिंदे

 


        समाज एकसंघ झाला तरच डॉ.बाबसाहेब आंबेडकरांच स्वप्न पूर्ण होईल.म्हणून अनेक कवी गीतकार गायक व जलसेकारांनी प्रबोधन केले असून हे काम सातत्याने सुरूच आहे.महाराष्ट्रातील प्रख्यात पार्श्वगायक कृष्णा शिंदे यांनी सुद्धा त्यांच्या काळात सामाजिक परिवर्तनासाठी अनेक कार्यक्रम करून प्रबोधनात्मक गीते सादर केली आहेत.कृष्णा शिंदे असे एकमेव गायक होते की, ज्यांच्या आवाजात BBC रेडिओ वरून सकाळी-सकाळी....

      बद्ध गौतम का गौतम का !

      संदेस जग को सुनाऐ !

  हा बुद्धाचा संदेश सांगणारं गीत संबंध भारत भरातील लोक ऐकायचे.असा महागायक तमाम आंबेडकरी समाजाला सांगत होता......!

        बाबांच्या लाडक्या मुलांनो घर हे सोडू नका !

        भिमाची आज्ञा मोडू नका !!धृ!!

        काडी-काडी जोडून-जोडून घरटे हे बनविले !

        पित्या परी सांभाळीले अन हक्क मिळवूनी दिले!

        घट ज्ञानाचे स्वाधीन केले घट ते सोडू नका !!१!!

        परिश्रमाची शर्थ करुनी संघटना घडविली !

        समतेच्या सागरी विषमता कायमची बुडविली !

        ममतेचे अन बंधुत्वाचे नाते तोडू नका !!२!!

        नागपूरच्या दिक्षाभुवर केली होती प्रतिज्ञा !

        स्मरणी असुद्या धम्माचरण शील करुणा प्रज्ञा !

        शिखर यशाचे चढणारांना मागे ओढू नका !!३!!

             या गीताद्वारे कृष्णा शिंदे यांनी सर्व समाजबांधवांना भिमाची आज्ञा मोडू नका असे सूचित केले आहे.साध्या,सोप्या समजेल अशा भाषेत हा समतेचा रथ पुढे घेवून जाण्यास प्रेरित केले आहे. कृष्णा शिंदे हे बहुजन समाजा पैकी मराठा समाजातील परिवर्तनवादी विचार श्रेणीचे होते.त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवतावादी विचार अंगिकारून एका-पेक्षा एक सरस अशी पोवाडे,बुद्ध-भीम गीते गायिली असून प्रभावीपणे प्रबोधनाचे काम केले आहे.

विचार किती ही चांगला असला तरी,जो पर्येंत  तो विचार माणूस आचरणात आणत नाही तो पर्येंत त्याचा काही ही उपयोग होत नाही.म्हणून कवी गौतम सूत्रावे यांचे पुढील गीत कृष्णा शिंदे यांच्या आवाजात रेकॉर्डिंग झालेले आहे.

        आचारावीन विचार वाया व्यर्थ असे ते ज्ञान !

        बोध हा बुद्धाचा तू जाण !!धृ!!

      पंचशील अन प्रज्ञा करुणा मनुज्यांचे हे भूषण जाना !

        त्रिशरणाला सत्य जीवनी आहे,आजस्थान !!१!!

       आष्टमार्ग हे अतीव सुंदर अनुपम आहे या अवनीवर!

        मर्म जाणुनी या मार्गाचे साधावे निर्वाण !!२!!

   जीव तेवढे समान अन सारे,मनी असावा भाव असारे !

   त्या जीवांचे दुःख हरावे सेवा हिच महान !!३!!

              वामनदादा कार्डकाचे " भीमा तुझ्या महुला जावून काल आलो!"हे गीतही शिंदे आपल्या खास आवाजात गात असत.गीत पुढील प्रमाणे आहे.

           भीमा तुझ्या महुला जावून काल आलो!

           तू जन्मल्या ठिकाणी राहून काल आलो!!धृ!!

           त्या रांगलास जेथे तेथेच मान झुकली !

           ती धूळ मी कपाळी,लावून काल आलो!!१!!

           आई तुझी भिमाई सातारलाच गेली !

           तेथे ही दोन अश्रू,वाहून काल आलो !!२!!

           जावून दूर देशी तू आणली शिदोरी !

           मी त्यातलीच काही,खावून काल आलो!!३!!

           दिल्लीतला खजिना तू वाटणार होता !

           तेथे तुझेच पाणी,दावून कल आलो !!४!!

           दीक्षाभूमी सभोती हर्षाने दाटलेली !

           नागाची नाग नगरी,पाहून काल आलो!!५!!

           ते जाळणार होते मी टाळणार होतो !

           वामन सहित तेथे,जावून काल आलो !!६!!

              अशी एका-पेक्षा एक कृष्णा शिंदेंनी सुरेल आवाजात गीते गाऊन प्रबोधनाचे काम सुरूच ठेवले होते.

तशी कृष्णा शिंदे साहेबांची व माझी ओळख ही आंबेडकरी गायक म्हणूनच.लहानपणापासून HMV रेकॉर्ड कंपनीने रेकॉर्ड केलेली ग्रामोफोनच्या तबकडीवर लागणारी त्यांची गाणी ऐकत असे.खूपच प्रेरणादायी गाणी असायची.मला त्या वेळी असं कधी वाटलंच नाही की,भविष्यात त्यांच्या सोबत काम करण्याची संघी मिळेल.गीतकार अमर रामटेके यांनी लिहिलेली व मी संगीतबद्ध केलेली "महासूर्य"कॅसेट 1996 ला प्रिझम रेकॉर्ड कंपनीने प्रकाशित केली.त्यात माझ्या संगीत दिग्दर्शनाखाली महेंद्र कपूर,उत्तरा केळकर,शकुंतला जाधव यांनी जी गीते गायली त्यात कृष्णा शिंदे यांनी"पत्रकार बाबासाहेब"हे एक गीत गायले आहे.गीत पुढील प्रमाणे आहे.गीतकार अमर रामटेके आहेत.

              लेखणीच्या तलवारीने,केला महा प्रहार !

              होते पत्रकार,बाबा खंदे पत्रकार !!धृ!!

            दलितांच्या या प्राणासाठी काढिले त्यांनी जनता!

              लेखणी होती त्या मर्दाची तिचेच आम्ही वारस !

           परंपरांना आग लावली दिला आम्हा आधार !!१!!

              बहिष्कृत नव्हता भारत होता तो नवभारत !

              होते रुढींचे शत्रू नव संस्कृतीचे नायक !

           परंपरांना आग लावली दिला आम्हा आधार !!२!!

            रेकॉर्डिंगच्या निमित्ताने कृष्णा शिंदे यांच्या सोबत मला आठ-दहा दिवस रहाता आले.त्यांना व त्यांच्या गीतांना समजून घेता आलं.कलावंत व माणूस म्हणून शिंदे साहेब खूप मोठं व्यक्तिमत्व होते.त्यांचे संगीत क्षेत्रातील काम पाहून मी खूप प्रभावित झालो.नांदेडला निघतांना त्यांना विनंती केली.आपण एकदा नांदेडला या. कोणतेही कारण न सांगता लगेच त्यांनी होकार दिला.22 जानेवारी 1997 रोजी नांदेडच्या कलामंदिर मध्ये कृष्णा शिंदे साहेबांचा मी जाहीर सत्कार ठेवला होता.

 प्रा.रविचंद्र हडसनकर,राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा.डॉ.आर.डी.साबळे,सरोज जाधव,लोकमतचे ज्ञानेश्वर खंदारे आदी मान्यवरांच्या हस्ते व नांदेडकरांच्या उपस्थितीत भव्य सत्कार सोहळा पार पडला.शिंदे साहेबांनी कृतज्ञता व्यक्त केली.आणि सभागृहाला गीत गायनातून उत्तर दिल....!

  हे संपूर्ण शरीर माझं छत्रपती शिवाजी महाराज आहे!

 यातील येणारा-जाणारा श्वास माझे बाबाबसाहेब आहेत!

असे म्हणताच,खचा-खच भरलेल्या सभागृहातील नागरिकांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.तो प्रसंग आज ही जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो.

कृष्णा शिंदे यांच्या कार्यक्रमाची सांगता भैरवीतील डॉ.बाबासाहेबांच्या महानिर्वाण गीताने व्हायची....!ते गाजलेले गीत असे होते.....!

      पहा मरणाने टाकला डाव रे !

      भीमरायाने सोडियेले गाव !!

      बुद्धीचे भांडार हरपले दैवत दलितांचे !

      अन्यायाशी झुंजत जगले जीवन विराचे !

      साऱ्या दुनियेत गाजले नाव रे !!१!!

            भीमरायाने सोडियेले गाव......!!

            कृष्णा शिंदे आज आपल्यात नसले तरी त्यांच्या प्रेरणादायी बुद्ध-भीमगीत गायनाने सदैव आपल्या सोबत आहेत.असा महागायक पुन्हा होणे नाही.

                     - सदाशिव गच्चे        .

No comments:

Post a Comment

Pages