किनवट तालुक्यातील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव ; अतिवृष्टीमुळे बेजार शेतकर्‍यांना शिफारसीनुसार उपाययोजनेचा सल्ला - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 2 September 2021

किनवट तालुक्यातील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव ; अतिवृष्टीमुळे बेजार शेतकर्‍यांना शिफारसीनुसार उपाययोजनेचा सल्ला

किनवट, दि.02 :  किनवट तालुक्यातील कापूस हे वाढीच्या अवस्थेत असून, काही भागात कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. पीक संरक्षणार्थ तालुका कृषी विभागाने सांगितलेल्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी केले आहे.


         मराठवाड्यातील कापूस हे महत्वाचे नगदी पीक आहे. किनवट तालुक्यातील कापूस पिकाच्या लागवडीचे सरासरी क्षेत्र 48 हजार 593 हेक्टर असून, यंदा 41 हजार 564 क्षेत्रावर कापसाची लागवड झालेली आहे. गत तीन महिन्यातील कधी अतिवृष्टी तर कधी दीर्घ खंडामुळे सर्वच पिके ही कधी चिबडणे तर कधी कोमेजणे या अवस्थेतून गेलेली आहेत. सध्या कपाशी हे पाती, फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. जूनमध्ये लवकर लागवड केलेल्या कपाशीतील बोंड हे परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत. सध्या वातावरणात बरेच बदल घडून येत असून, कधी तापमानात वाढ तर कधी सलग पाच-सहा दिवस पावसाचे वातावरण राहात आहे. अशा हवामान बदलामुळे बर्‍याच भागामध्ये पातेगळ झालेले आढळून येत आहे. मावा,तुडतुडे व फुलकिडे या पानातील रसशोषण करणार्‍या किडींचा प्रादुर्भाव मागे झाला होता. त्याचा बंदोबस्त शेतकर्‍यांनी केला नाही तोच आता बर्‍याच भागात गुलाबी बोंडअळी दिसून येत आहे.


  बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी  2002 पासून बीटी जनुक असलेल्या वाणांचा वापर शेतकर्‍यांनी सुरू केला. परंतु सध्या बोंडअळीचा प्रभाव बीटी कपाशीवरही दिसून येत आहे. वेळेवर उपाययोजना केल्यास बोंड अळीच्या प्रादुर्भावापासून होणारे संभाव्य नुकसान कमी करता येईल, असे तालुका कृषी विभागाचे म्हणणे आहे. मात्र, कुठल्याही रासायनिक कीटकनाशकांची फवारणी बोंडअळीवर संपूर्णत: नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत असल्याचे बर्‍याच शेतकर्‍यांनी आपला अनुभव असल्याचे सांगितले.


बोंडअळीमध्ये ठिपक्याची बोंडअळी, अमेरिकन बोंडअळी व गुलाबी अथवा शेंदरी बोंडअळी असे तीन प्रकार आहेत. साधारणत: कापसाची लागवड झाल्यानंतर 30 ते 65 दिवसात ठिपक्याच्या बोंडअळीचा, 45 ते 85 दिवसात अमेरिकन बोंडअळीचा तर 75 ते 110 दिवसात रोटरी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. डोक्यावर काळपट भाग असलेली 18 ते 19 मिमी लांबीची ही गुलाबी बोंडअळी सर्वात जास्त विध्वंसक असून, ही कोवळी फुले, फळे यात बारीक छिद्र पाडून आत  शिरून विष्ठेने ते छिद्र बंद करते. त्यामुळे फुले पूर्णत: उमलत नाहीत आणि उघडलेल्या बोंडावर डाग दिसतात.


  “बोंडअळीच्या नियंत्रणासाठी तालुका कृषी कार्यालयाने पुढील उपाय योजना सुचविलेल्या आहेत.   कपाशीला पाते लागण्यास सुरुवात झाल्यानंतर हेक्टरी 5 कामगंध सापळे कपाशी पिकामध्ये लावावे. शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून नत्र खतांचा संतुलित वापर करावा. कपाशीला पाती लागल्यानंतर 7 ते 8 वेळा पिकांमध्ये दर 10  दिवसानंतर ट्रायकोकार्ड एकरी 3 या प्रमाणात लावावे म्हणजे बोंडांचा अंडी अवस्थेत नायनाट होईल. फुलाच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीग्रस्त फुले नष्ट करावीत. रासायनिक नियंत्रणामध्ये फेनवलरेट 20 टक्के ईसी 10 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10 मिली किंवा  लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5% ईसी 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, अशी शिफारस कृषी खात्याने केली आहे.”

No comments:

Post a Comment

Pages