जयंती: संत्या ते संतोष चा मार्ग - उज्वला गणवीर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 23 November 2021

जयंती: संत्या ते संतोष चा मार्ग - उज्वला गणवीर

जयंती हा अनलॉक नंतर सिनेमागृहात आलेला पहिलाच मराठी चित्रपट. चित्रपटाविषयी फारच उत्सुकता होती. जेवढी उत्सुकता होती त्यापेक्षा खूप जास्त या चित्रपटाने विचार दिला. हा चित्रपट  बघतांना सुमार चित्रपट आहे असे अजिबात वाटले नाही. अतिशय दर्जेदार चित्रपट. सर्वांगाने दर्जेदार. या पूर्वी फँड्री, सैराट हे चित्रपट आलेत मात्र ते वेगळ्या धर्तीवर आधारित होते. हा चित्रपट कोणत्याही एक महामानवर आधारित नाही तर समस्त महापुरुषांवर आहे. सर्व महापुरुषांची जयंती अगदी थाटामाटात साजरी केली जाते. मात्र त्यांचे विचार काय, कार्य काय हे जाणून न घेता. जयंती भावनिक होऊन, डोक्यावर घेऊन साजरी करण्यापेक्षा डोक्यात घेऊन साजरी करावी असा मोलाचा संदेश या चित्रपटातून दिला आहे. त्यांचे विचार आचरणात आणून त्यांची जयंती साजरी करावी. कित्येक लोक दारू पिऊन डीजे वाजवून जयंती साजरी करतात. अनेक ठिकाणी जयंतीच्या कार्यक्रमात डीजे नाही म्हणून वादविवाद होतांना आपण बघत आहोत. 

लोकांचा हक्कांचा सण म्हणजे जयंती असे स्वरूप आहे आणि याच मुद्यावर हा चित्रपट बनवला गेला आहे. या चित्रपटात हळुवार प्रेमकथा तर आहेच त्याही पेक्षा तात्त्विकता प्रकर्षाने जाणवली. संत्या नावाच्या गाव गुंडाला केंद्रित करून हा चित्रपट बनवला गेला आहे. आमदारांना महापुरुषांच्या विचारांपेक्षा, शिक्षणापेक्षा त्यांची वोट बँक महत्वाची वाटते म्ह्णून ते समाजोपयोगी कामे ते टाळतात. एक सामान्य शिक्षक ज्याला महापुरुषांचे आचार विचार माहीत आहेत त्यांची मुलांना घडवण्याची धडपड अतिशय वाखाणण्यासारखी आहे. नाऱ्याचा नर करण्याची किमया एक शिक्षकच करू शकतो. अशा शिक्षकांची नितांत गरज आहे. आज युवा वर्ग भरकटलेला आहे त्याला मार्ग शिक्षकच दाखवू शकतो.  नुसते निळे किंवा केशरी शेले  गळ्यात टाकून कोणी महापुरुषांचा अनुयायी होऊ शकत नाही तर (अंध)भक्त निर्माण होऊ शकतो. 

आजच्या तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते त्यांच्या ध्येयापर्यत जिद्दीने पोहोचू शकतात. शिक्षकांनी फक्त शिक्षकी पेशा फक्त पोट भरण्याचे साधन मानू नये तर स्वतःच्या धर्म, जातीपलीकडे जाऊन महापुरुषांचे विचार आणि कार्य विद्यार्थ्यांपर्यत कसे पोहोचतील याचा प्रयत्न करायला हवे. चित्रपटात अतिशय सुंदर शिक्षक साकारला आहे. शिक्षकाची विद्यार्थ्यांप्रती तळमळ दिसून येते. 

राजकारणी आणि भांडवरदार लोक संत्या सारख्या कमी शिकलेल्या टवाळखोर, गावगुंडांना हाताशी धरून स्वतःचे ध्येय साध्य करतात आणि समाजाला एकजूट होण्यापासून कसे दुरावतात याचे यथोचित चित्रण केले गेले. तरुण वर्गाला भरकटवण्याचे काम करतात हे अगदी वास्तविक मांडले.  समाज एकसंघ नसल्यामुळे या समाजातील आया बहिणी सुरक्षित राहत नाहीत. त्यांच्यावर अत्याचार होतात आणि  आरोपी निर्दोष सुटतात. समाजाला आपल्या महिलेवर झालेल्या अत्याचाराची सल पडते ती फक्त तात्पुरती परत पूर्ववत. 

या चित्रपटातील डायलॉग अतिशय अप्रतिम आहेत. गुलामांची भीती नाही वाटत मला हे अगदीच दाद देऊन जाते. अंधमक्तांना उद्देशन म्हंटलेला हा संवाद त्यांना त्यांची लायकी दाखवून जातो. समाजातील कोणावरही अन्याय झाला तर आंबेडकरी समाज आधी लढण्यास समोर येतो यावरचा  डायलॉग  आम्ही बाबासाहेबांची लेकरं आम्ही न्यायासाठी लढतो जात पाहून लढत नाही. अभिमान वाटतो हा संवाद ऐकून. 

डॉ. बाबासाहेबांची जयंती फक्त डीजे वर नाचण्यासाठी आणि दारू पिऊन साजरी करण्याऱ्या रांगड्या संत्याला उद्देशन   साधी जयभीम म्हणायची लायकी नाही तुझी  मनाला चटका लावून जातो. परंतु ही वास्तविकता नाकारता येत नाही. सर्वात जास्त आवडलेला डायलॉग बाबासाहेबांचे विचार परिसासारखे आहेत, ज्याला स्पर्श करणार त्याचे सोने होणार  हे एक obc मास्तरांच्या तोंडी आलेला संवाद अगदीच वाखाणण्यासारखा आहे. डॉ आंबेडकरांच्या विचारांची जास्त गरज आहे. सामाजिक परिवर्तन होऊ शकते. संत्याचा संतोष होऊ शकतो.  एक आदर्श समाज निर्माण होऊ शकतो. असा परिवर्तनशील संदेश हा चित्रपट देतो. 


आजही ओबीसी समाजातील लोकांच्या घरात शिवाजी महाराज चालतात अन्य चालतात मात्र डॉ. बाबासाहेबांचे नावही चालत नाही. या समाजाने हा चित्रपत्र आवर्जून बघावा.

 *नोकरी चालते पण ज्याच्या मूळे नोकरी मिळाली तो नाही चालत* ही आत्या परिस्थिती आहे.  मात्र या चित्रपटाला या वर्गाचा प्रेक्षक फारच अल्प लाभत आहे ही खेदाची बाब आहे.  त्यांनी जर हा चित्रपट बघितला तर त्यांच्या मानसिकतेत नक्कीच बदल होऊ शकेल. 


चित्रपटाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध फारच वेगळे आहेत.  पूर्वार्धात संत्याचा मनमानी तर उत्तरार्धात संतोषने महापुरुषांना वाचून समजून त्याला त्याचे ध्येय गाठण्याची जिद्द व त्यासाठी त्याचे असलेले प्रयत्न प्रेक्षकांना पकडून ठेवतात. एवढ्या सहा वर्षात चार हॉटेल चा मालक होतो आणि त्याच्या कारभारात तो आपल्या समाजातील त्याची मित्र जी भटकत होती त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. तो स्वतःबरोबर त्याच्या मित्रांना म्हणजेच समाजातील लोकांना सुद्धा रोजगार देतो. स्वतःची प्रगती झाली तर स्वतःबरोबर समाजातील तरुणांना  रोजगार समाजाची प्रगती सुद्धा करावी, हेच हा चित्रपट सांगतो. 

या चित्रपटात अगदी वास्तविक चित्रण केलेले आहे. मोठमोठी भारी भरकम डायलॉग नाहीत. साधी सरळ डोक्यात शिरणारे संवाद आहेत. भाषेविषयी कुठेही कमीपणा नाही. *आमची बोली भाषाच शुद्ध भाषा* हे नायकाने केलेला विद्रोहच वाटतो. यात चार गाणी आहेत, चारही अप्रतिम याचे श्रेय गीतकार किर्तीनंद गजभिये यांना जाते. नायक ऋतुराज वानखेडे, नायिका तितिक्षा यांचा हा पहिलाच व्यावसायिक चित्रपट आहे परुंतु याची जाणीव होत नाही. स्वतःच्या भूमिकेला यथोचित न्याय दिला. उद्योजकाची लहानशा भूमिकेत  देश विदेशात ख्याती मिळवलेले कलावंत वि. रा. सरदार यांची भूमिका आहे. आज ते स्वतःची भूमिका असलेला चित्रपट बघायला हयात नाहीत. त्यांची कमी जाणवत आहे. याच चित्रपटाच्या कथानकतेतून प्रेरित होऊन  समाजाच्या प्रगतीसाठी उत्तम प्लॅन तयार केला होता. लॉकडाऊन  निघाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला लागणार असे ध्येय होते. मात्र कोरोनाने त्यांना त्यांचा प्लॅन प्रत्यक्ष आणण्यास वेळच दिला नाही आणि आपल्यातून हिरावून नेले. प्रामाणिक, हुशार, नामवंत आणि जाणीव असलेले वकील नागेश बुरबुरे यांनी रेखाटले. भूमिका लहान मात्र कायम लक्षात राहणारी.  शेवटी माणगाव परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून अशोक सरस्वती बोधी उपस्थित असतात व त्यांच्याच हातून संतोष चा सत्कार होतो. चित्रपटात सर्वच अभिनेते अभिनयात भाव खाऊन जातात. उत्तम दर्जाचा व्यावसायिक चित्रपट आहे. महाराष्ट्रात असे चित्रपट नाहीच बनत मात्र या चित्रपट सृष्टीला नवीन दिशा मिळवून दिली. चित्रपट सृष्टी नेमक्या एकाच वर्गाची मक्तेदारी नाही तर लेखनात अभिनयात, दिगदर्शनात, निर्मितीत, गीतकार, संगीतकार कोणत्याही क्षेत्रात आम्ही कमी नाहीत हे दाखवून दिले. संधी मिळण्याची वाट न बघता संधी उपलब्ध करण्याची ताकत फ़क्त बाबासाहेबांच्या विचारातच आहे हे सिद्ध केले. 

दिगदर्शक शैलेश नरवाडे, निर्माते मिलिंद पाटील यांचे मनःपूर्वक आभार. फक्त जयंती वरूनही समाजाचा कायापालट तेव्हाच होऊ शकतो जेव्हा महापुरुषांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेऊन त्यांचे विचार आचरणात आणल्याने होऊ शकतो. महापुरुष हे कोण्या एक जाती-धर्माचे नाहीत तर ते संपूर्ण मानवजातीचे आहेत. त्यांना स्वतःच्या जातीपूर्त अथवा धर्मपुरता बंदिस्त करता येत नाही. समतावादी राज्य निर्माण करायचे असेल तर एससी, एसटी ओबीसी, मुस्लिम, यांनी एकसंघ होणे आवश्यक आहे. बाबासाहेबांचे विचार  आचरणात अणूनच आपण शासनकर्ती जमात होऊ शकतो असा सरळ संदेश हा चित्रपट देतो. जयंती ही नाचून नाही तर वाचून साजरी व्हावी. सर्वांनी हा चित्रपट बघावा आणि स्वतःच स्वतःची परीक्षा घ्यावी. याच चित्रपटात एक गाण्याचे शब्द आहेत...

घेतली परीक्षा जेव्हा मीच मी स्वतःची

लाज मला येते बाबा माझ्या वर्तनाची

लायकीच नाही माझी तुला वंदण्याची, तुला वंदण्याची


- उज्वला गणवीर

नागपूर


No comments:

Post a Comment

Pages