बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांवर अन्याय, सामाजिक न्याय खात्याच्या विरोधात साखळी उपोषण सुरू - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 24 December 2021

बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांवर अन्याय, सामाजिक न्याय खात्याच्या विरोधात साखळी उपोषण सुरू

परळी  :    डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे  ( बार्टीच्या ) विद्यार्थ्यांवर फेलोशिप देण्यात अन्याय केला जात असून युजीसीच्या नियमानुसार एम. फिल करणाऱ्यांना सतत पाच वर्षे पीएच.डी साठी फेलोशिप देण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक न्याय विभागाच्या विरोधात राज्यातील विद्यार्थ्यांनी परळी उपविभागीय कार्यालयासमोर आज दिनांक  24 डिसेंबर पासून साखळी उपोषण सुरू केले आहे. 

सारथी आणि महाज्योतीच्या मुलांना फेलोशिप मिळते मग आमच्यावरच अन्याय का? अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. 

     डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्या माध्यमातून देण्यात येणारी अधिछात्रवृत्ती 2018 एम.फिल ते पीएचडी पाच वर्षांसाठी नियमित करण्यात यावी याकरिता परळी वैजनाथ येथे साखळी उपोषण करण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत.   

      सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे यांचे गाव असल्याने आम्ही परळीत आंदोलन करत असल्याचे हे विद्यार्थी सांगत आहेत.


विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उपरोक्त विषयी विनंती करण्यात येते की, आम्ही महाराष्ट्राच्या विविध विद्यापीठातील एम. फिल. अभ्यासक्रमाचे संशोधक विद्यार्थी असुन राज्य सरकारची अंगीकृत संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) च्या माध्यमातुन सामाजिक न्याय विभागाच्या (वतीने देण्यात येणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF – 2018) धारक विद्यार्थी आहोत. विद्यापीठ अनुदान आयोग भारत सरकारच्या नियमाप्रमाणे एम.फिल. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना सलग पाच वर्षे पीएच. डी. पर्यंत फेलोशिप देण्यात येते. परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) च्या माध्यमातुन देण्यात येणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर

राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF – 2018) मात्र एम.फिल. या अभ्यासक्रमासाठी दोनच वर्षे दिली जात आहे.

     शिवाय पीएच.डी. साठी सलग अधिछात्रवृत्ती देण्यापासुन वंचित ठेवत असल्याने अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. मागील अनेक वर्षापासुन आम्ही सदरील मागणीचा लोकशाही मार्गाने पाठपुरावा करत आहोत. परंतु आमच्यावरील अन्याय दूर होत नसल्याने सामाजिक न्याय विभागाचे व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तथा न्याय मिळण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदार संघातील व गावातील शासकीय कार्यालय मा. उपविभागीय अधिकारी कार्यालय परळी वै. जि.बीड या कार्यालया समोर दि.24/12/2021 रोजी पासुन समस्त गरजवंत विद्यार्थी साखळी उपोषणास बसत आहोत असे म्हटले आहे.

   या आंदोलनात नारायण खरात, अक्षय जाधव, अमोल घुगे, भगवान चोपडे, भिमराव वाघमारे, संदीप तुपसमुद्रे, श्रद्धा सिरसाट, दीक्षा ढगे, सारिका दळवी, अनिता शिंदे, उषा इंगळे, सविता गंगावणे, सुनील वाघमारे, मीनाक्षी वकेकर, छाया सौंदरमल, अरुणा सपकाळ, अमोल शिंदे, सिद्धार्थ कांबळे, रामेश्वर गोरे, अमोल चोपडे, प्रमिता भोजने, विशाखा रगडे, सिद्धांत सोनवणे ,किरण तुरेराव यांच्यासह अनेक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे साखळी उपोषण चालूच राहील असे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.



No comments:

Post a Comment

Pages