किनवट तालुक्याची अंतिम पैसेवारी 46.77 टक्के घोषित - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 23 December 2021

किनवट तालुक्याची अंतिम पैसेवारी 46.77 टक्के घोषित


किनवट, दि.23 : तालुक्यातील नजर पैसेवारी 30 सप्टेंबरला तर सुधारीत पैसेवारी 31 ऑक्टोबररोजी महसूल प्रशासनातर्फे जाहीर झाली होती. यानंतर 15 डिसेंबर रोजी किनवट तालुक्याची अंतिम पैसेवारी पन्नास पैशाच्या आत अर्थात 46.77 टक्के घोषित करण्यात आली आहे. यानंतर शेतकर्‍यांना पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षाची प्रतिक्षा आहे.


         खरीप हंगामात पिकाची पैसेवारी शेतकर्‍यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब आहे. ही पैसेवारी 50 च्या आत असेल तर तालुक्यातील शेतकर्‍यांना शासनाकडून काही प्रमाणात सवलती मिळतात. यात जमीन महसूलात सूट, शेतकर्‍यांच्या कर्जाची सक्तीने वसूली न करणे, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, नरेगाच्या टंचाई कामांना प्राधान्य, शेतकर्‍यांच्या पाल्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करणे आदींचा समावेश आहे.


        किनवट तालुक्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषीक्षेत्रावर अवलंबून आहे. तालुक्याचे भौगोलीक क्षेत्र 1 लाख 56 हजार 232.92 हेक्टर आहे. तालुक्यात नऊ महसूली मंडळे असून, 191 गावांसाठी  134 ग्रामपंचायती आहेत. यातील पैकीच्या पैकी म्हणजे 191 गावांची पैसेवारी ही 50 पैशाच्या आत निघालेली आहे.  तालुक्यात खरीप हंगामातील लागवडी खालील क्षेत्र 80 हजार 793 हेक्टर आहे. त्यापैकी पडीक क्षेत्र 1 हजार 681 असून, एकूण पेरणी केलेले क्षेत्र 77 हजार 841 हेक्टर आहे.


    एकूण नऊ महसूल मंडळनिहाय पेरणी केलेले क्षेत्र आणि कंसात घोषित पैसेवारी पुढील प्रमाणे : किनवट 6,485 हेक्टर पेरणी (46.23 पैसेवारी); बोधडी बु. 10,576 (47.00); दहेली 7,318 (45.63); मांडवी 8,112 (47.66); उमरी बाजार 8,596 (47.27); जलधरा 8,914 (45.91); इस्लापूर 11,350 (47.17); शिवणी 8,347 (47.12); सिंदगी मोहपूर 8,143 (47.00). याप्रमाणे सर्व महसूल मंडळातील पैसेवारीच्या बेरजेची सरासरी काढल्यानंतर तालुक्याची एकूण पैसेवारी 46.77 टक्के घोषित झालेली आहे.


     राज्यात निर्माण होणारी टंचाई परिस्थिती आणि त्या अनुषंगाने दुष्काळ जाहीर करणे तसेच विविध उपाययोजना जाहीर करून आणेवारी पद्धतीत बदल करण्याची मागणी केली जात होती. या मागणीनुसार पैसेवारी पद्धतीचा अभ्यास करून बदल करण्याच्या दृष्टीने विभागीय आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या शिफारसी विचारात घेऊन सन्  2015 पासून खरीप हंगामातील पैसेवारी काढण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्यानुसार ग्रामपंचायत हद्दीत लागवडीखालील 80 टक्के क्षेत्रातील पिके ही प्रमुख पिके समजली जातात. त्याच पिकांचा पैसेवारी काढण्यासाठी विचार केल्या जातो. तसेच चालू वर्षाचे उत्पादन काढण्यासाठी प्रत्येक प्रमुख पिकासाठी ग्रामपंचायत घटकनिहाय किमान सहा कापणी प्रयोग जमिनीच्या प्रतवारीनुसार घेण्यात येतात.  पीक कापणी प्रयोगाचे काम करणार्‍या यंत्रणेअंतर्गत महसूलचे मंडळ अधिकारी व तलाठी, जिल्हा परिषदेचे ग्रामसेवक आणि कृषी विभागाचे कृषी सहाय्यक हे कर्मचारी हे कार्य पार पाडतात. पीक पैसेवारी काढण्यासाठी अवलंब केल्याजाणारे सूत्र म्हणजे  पाहणी केलेले हेक्टरी उत्पादन (ग्रामपंचायत) यास प्रमाण हेक्टरी उत्पादन (तालुका) याने भागाकार करून आलेल्या संख्येस 100 ने गुणाकार केल्यानंतर पीक पैसेवारी निघते.  पूर्वी पिकांच्या आणेवारीची पद्धत होती. परंतु,आणा हे चलन मागे पडल्यामुळे व 100 पैशाचा रुपया, ही गोष्ट टक्केवारीशी सुसंगत असल्यामुळे व अल्पशिक्षितांसह, शेतकर्‍यांना सहज समजण्याजोगी असल्यामुळे, ‘पैसेवारी’ ही पद्धत रुढ करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Pages