नाशिक,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे
महाकवी लोकशाहीर वामनदादा कर्डक यांचा जन्मशताब्दी सोहळा सांस्कृतिक कार्यक्रमाने नाशिक येथे साजरा करण्यात येणार आहे. आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत आंबेडकरी चळवळीतले महाकवी, लोकशाहीर वामनदादा कर्डक यांना मंगळवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता 'वादळवारा' एक सांस्कृतिक जलसा या अभिनव कार्यक्रमाद्वारे संगीतमय आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. आंबेडकरी चळवळीतले सुप्रसिद्ध गायक गीतकार आणि संगीतकार विष्णू शिंदे यांचे या कार्यक्रमात गायन होणार आहे. "वादळवारा" एक सांस्कृतिक जलसा या कार्यक्रमात गायक विष्णु शिंदे यांना त्यांचा संगीत संच साथसंगत करणार आहे. नाशिकच्या शालिमार चौकामधील परशुराम साईखेडकर नाट्यगृहात होणाऱ्या या अभिनव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नांदेड येथील प्रसिद्ध निवेदक प्राचार्य डॉ. विकास कदम हे करणार आहेत. कोवीड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या संदर्भातील शासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करून हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला असून या कार्यक्रमाचे दूरदृष्य प्रणालीद्वारे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या फेसबुक आणि यूट्यूब चैनल वरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.
No comments:
Post a Comment