छत्रपती शिवाजी : परधर्मसहिष्णू आणि स्वधर्मपरिवर्तक - डॉ. दिलीप चव्हाण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 18 February 2022

छत्रपती शिवाजी : परधर्मसहिष्णू आणि स्वधर्मपरिवर्तक - डॉ. दिलीप चव्हाण



इतिहासलेखन हे इतिहासकारांच्या हितसंबंधांनी प्रभावित असते. भारतातील पारंपरिक इतिहासकारांचे हितसंबंध हे भारतातील विषमतेवर आधारलेल्या जातीसमाजातील सामाजिक संघर्ष लपविण्यात होते. असे सामाजिक संघर्ष लपविण्यासाठी त्यांनी खोटा इतिहास रचण्याची भूमिका घेतली. उदाहरणार्थ, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी असे लिहिले की, गौतम बुद्धांचे ध्येय हे “उपनिषदांचा विचार लोकांमध्ये नेणे”, हे होते आणि बुद्धांचा धर्म हा “अभिजनांचा धर्म” होता. राधाकृष्णन् यांना बुद्धांच्या सामाजिक संघर्षास बगल द्यायची होती. त्यासाठी त्यांनी बौद्धकालीन इतिहासाचे खोटे चित्र पुढे आणले.


भारताच्या मध्ययुगीन इतिहासाच्या बाबतीतदेखील असेच घडले. हा इतिहास धार्मिक स्वरूपाचा – म्हणजे हिंदू-मुस्लिम संघर्षाचा – होता, अशी बतावणी बखरी, पोवाडे, चरित्रलेखन यांच्या माध्यमातून करण्यात आली. अशा लेखनाचा प्रभाव इतिहासलेखनावर असल्यामुळे मध्ययुगीन सामाजिक जीवन, शेतीसारख्या उत्पादनाच्या रितीभाती, लोकजीवन, स्त्रीजीवन, व्यापार यांविषयीच्या इतिहासलेखनाकडे दुर्लक्ष झाले. “समाजजीवन हे बदलते असते आणि धर्म हा स्थायी असतो”, असे राधाकृष्णन् यांनी मानून प्रत्यक्ष समाजजीवनापेक्षा धर्माला मोठे स्थान दिले. भारतीय जनजीवन हे मुख्यत: धार्मिकच होते, असा विचार यातून पुढे गेला. राधाकृष्णन् यांच्यासारख्या धार्मिक इतिहासकारांचा गडद असा प्रभाव भारतीय इतिहासलेखनावर राहिला.


मध्ययुगीन भारतीय समाजजीवन हे धार्मिक सौहार्दाचे राहिले. उदाहरणार्थ, मध्ययुगात वारकरी चळवळीत मुस्लिम संतांचे योगदान मोठे होते. या काळात शेख महंमद हे एक महत्त्वाचे संत होते. त्यांचे गुरु चांद बोधले हे हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले साधू होते; तर चांद बोधले यांचे गुरू राजे महंमद (शेख महंमदांचे वडील) हे होते. पारंपरिक गुरु परंपरा ही “स्वयातीचा पाहीजे गुरु” (दासबोध ५.२.६४) असा आग्रह धरणारी होती. रामदास स्वामींनी “गुरु तों सकळांसी ब्राह्मण| जऱ्हीं तो जाला क्रियाहीन||” (दासबोध ५.१.६) हा विचार प्रसृत केला होता. या पार्श्वभूमीवर बहुजन समाजात वर्णअहंकार नाकारणारा “वर्ण अभिमान विसरली याती| एकमेका लोटांगणी जाती||” हाच तुकोबांचा विचार अधिक प्रभावी राहिला. 


शिवाजी महाराजांच्या घरातही अशीच समन्वयवादी गुरुपरंपरा होती. महाराजांचे आजोबा मालोजी यांचे गुरु (मुर्शिद) शेख महंमद होते. शहाजी राजेदेखील शेख महंमदांना गुरु मानीत. शेख महंमद यांच्यावर सूफी, वारकरी, दत्त आणि नाथ या संप्रदायांचा प्रभाव होता. त्यांचा श्रीगोंद्यात ‘मठ’ / ‘समाधी मंदिर’ आहे. शेख महंमदांचे मराठी साहित्याला योगदान मोठे आहे. शिवाजी महाराजांना हा वारसा साक्षात कुटुंबात मिळाला होता.


शिवाजी महाराजांचे  परधर्मविषयक धोरण हे उदार होते. परजातीय वा परधर्मीय व्यक्तीस गुरु करू नये, या संकुचित भूमिकेचा त्यांनी स्वीकार केला नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी येथील याकूत बाबा हे महाराजांचे एक गुरु होते, हे इतिहासकारांनी नोंदविले आहे.


शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या भेटीला अकारण धार्मिक रंग दिला गेलेला आहे. पारंपारिक इतिहासकारांनी असे जाणीवपूर्वक केले. वस्तुस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी आहे. ही भेट पूर्णपणे राजकीय स्वरूपाची होती. उदाहरणार्थ, कवींद्र परमानंद यांच्या “शिवभारत” या काव्यात शिवाजी आणि अफजलखान या दोघांच्या अंगरक्षकांची नावे दिलेली आहेत. शिवाजी महाराजांचे अंगरक्षकांमध्ये इतरांव्यतिरिक्त सिद्धी इब्राहीम हे होते; तर अफजलखानांच्या अंगरक्षकांमध्ये इतरांव्यतिरिक्त शंकराजी मोहिते हे होते. जदुनाथ सरकार यांच्या मते, गोपीनाथ व कृष्णाजी हे दोघे अफजल खानांसोबत होते. शिवाजी महाराजांनी इस्लामी रितिरिवाजाप्रमाणे अफजलखानाच्या मृतदेहाचे दफन केले व तेथे त्यांची कबर बांधली.  पं. महादेवशास्त्री जोशी यांनी यासंबंधी असे नोंदविलेले आहे : “प्रतापगडावर प्रेक्षणीय काय आहे? म्हणून कोणी विचारले तर अफजलखानाची कबर असेल असेच तर द्यावे लागेल.” मुलुखगिरीवर असताना सैनिकांनी कोणत्याही मशिदीला इजा पोहोचवू नये, अशा सूचना महाराजांनी सैनिकांना दिल्या होत्या. महाराजांच्या हाती जर पवित्र कुराणाची प्रत तर ते त्या प्रतीचा आदर करीत व मुस्लिम सैनिकाला ती सुपूर्त करीत.  “सैनिकी धुमश्चक्रीच्या काळात मुस्लिम स्त्रिया अथवा बालकं हाती लागली तर शिवाजी त्यांना सन्मानाची वागणूक देत असे.”, असे खाफी खान यांनी नोंदविले. 


अफजलखानांविषयी बरेचसे गैरसमज निर्माण करण्यात पारंपरिक इतिहासकारांनी यश मिळविलेले आहे. खानाच्या सैन्यात अनेक मराठे सरदार होते, हे विसरून चालणार नाही. रोहीलखोऱ्याचा देशमुख खंडोजी खोपडे हा शिवाजीचा शत्रू अफजलखानांकडे आला आणि शिवाजी महाराजांना पकडून देतो, असे त्याने खानांस सांगितले. खानांनी त्यास सोबत घेतले होते. अफजलखानांनी  तुळजापूर आणि पंढरपूर येथील मंदिरे पाडली, असा आरोप करण्यात येतो. तथापि, त्याला काही पुरावा नाही, असे मत सेतुमाधवराव पगडी यांनी नोंदविले आहे. त्यांच्या मते, तुळजापूर हे गाव अफजलखानांच्या वाटेवरच नव्हते. या धुमश्चक्रीत शिवाजी महाराजांवर कृष्णाजी कुलकर्णी यांनी हल्ला केला. तेव्हा, महाराजांना कृष्णाजीला ठार मारावे लागले होते. 


इतिहासकारांनी शिवाजी महाराजांची ‘हिंदूरक्षक’, ‘मुस्लिमविरोधी’ अशी प्रतिमा निर्माण केली आहे. आजच्या धर्मांधांप्रमाणे महाराजांनी परधर्मद्वेषाचे राजकारण केले नाही. त्यांनी कोणत्याही धार्मिक स्थळाला इजा पोहोचविली नाही. अगदी शत्रूच्या प्रांतातही नाही. उलट, ख्रिस्ती मिशनऱ्यांना त्यांनी संरक्षण दिले. कर्मठ धर्ममार्तंडांच्या विरोधात जाऊन स्वधर्मियांच्या स्वेच्छेने केलेल्या स्वधर्मातील पुनरागमाला पाठिंबा दिला. स्वधर्माच्या अनिष्ट रूपाची चाहूल लागताच वर्णव्यवस्था आणि स्त्रीला दासी संबोधणाऱ्या धर्माला आयुष्यभर महाराज कवटाळून बसले नाही. त्यांनी वर्णविरोध आणि स्त्रीसमता स्वीकारणाऱ्या शाक्त धर्माचा मार्ग निवडला. महाराजांचा दुसरा शाक्त राज्यभिषेक या मन्वंतराचे द्योतक आहे.        

 

शिवकाळाचा इतिहास राजकीय स्वरूपाचा असला तरी तो धार्मिक परिभाषेत मांडला गेला. शिवकालीन सत्तासंघर्ष हा राजकीय स्वरूपाचा होता; सामाजिक संघर्ष हा जातीय पातळीवर सुप्तावस्थेत होता; तर धार्मिक वातावरण परस्परसौहार्दतेचे होते. आज मात्र आपण बिकट परिस्थितीत आहोत. महाराजांनी परधर्मद्वेष केला नाही, परधर्मीय धर्मस्थळाला इजा पोहचविली नाही आणि परधर्मीय स्त्रीचा उपमर्द केला नाही. आज मात्र परधर्मद्वेष शिकविला जातोय. परधर्मीय स्त्रियांना लक्ष्य केले जाते आहे.


भारताबाबतचे विविध अहवाल हे मांडताहेत की, भारतात धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच होतोय. शिवाजी महाराजांचा ‘उदोउदो’ करणाऱ्यांकडून हे केले जातेय. असे करताना शिवाजी महाराजांना वेठीस धरले जाते आहे, हे व्यथित करणारे आहे.


-दिलीप चव्हाण, नांदेड                                                                                                                              dilipchavan@gmail.com  



No comments:

Post a Comment

Pages