रयतेचे राजे छत्रपती शिवाजी - प्रा.दगडू भरकड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 18 February 2022

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी - प्रा.दगडू भरकड


अठरा पगड जातीतील व मुस्लीम  मावळ्यांना सोबत घेऊन बहुजनांच्या स्वातंत्र्यासाठी , समतेसाठी ,न्यायासाठी ,मानवतावादी विचारांने स्वराज्य स्थापन करणारे छ. शिवरायांचे गुरु राजमाता जिजाऊ व वारकरी संप्रदायातील विज्ञानवादी संत तुकाराम महाराज होते .मुघलशाही ,आदिलशाही ,कुतुबशाही ,बरिदशाही ,निजामशाही ,इंग्रज ,फ्रेंच ,डच , पोर्तुगीज यांच्या व प्रस्थापित मनुवादी व्यवस्थेच्या सर्व प्रकारच्या शोषणातून ,गुलामगिरीतून ,गोर-गरीब ,शेतकरी ,कष्टकरी , स्ञियांना मुक्त करण्यासाठी , न्याय व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी स्वातंत्र्याचे आंदोलन उभारले  .त्यांचा लढा कोणत्याही जाती ,धर्माच्या विरोधात नव्होता तर तो मानवजातीच्या कल्याणासाठी होता . आपली रोजगार हमी योजना पिढ्यांपिढ्या चालावी .सामाजिक ,राजकीय ,आर्थिक ,धार्मिक ,शैक्षणिक ,सांस्कृतिक क्षेत्रात आपलीच मक्तेदारी असावी .यासाठी आपल्या सोईचा इतिहास लिहिला . राईचा पर्वत केला आणि पर्वताची राई केली .मध्ययुगीन कालखंडात सर्वच राज्यकर्त्यांसोबत ब्राम्हण होते .त्यांना शासनकर्ते कोण आहेत याचे काही देणेघेणे नव्होते .आपल्याला शासनात योग्य वाटा मिळाला ,पैसा मिळाला म्हणजे ते चांगले आणि ज्यांनी सत्याचा ,न्यायाचा मार्ग स्विकारला ते वाईट अशी त्यांची विचारधारा होती . मनुस्मृती सहिंतेप्रमाणे बहुजनास शिक्षणाचा अधिकार नसल्याने रामदास ,दादूकोंडदेव गुरू आम्हाला सांगितले ,लिहून ठेवले .अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला , शाहिस्तेखानाची बोटे तोडली , आग्रा येथे कैदेत असताना औरंगजेब बादशहाच्या हातावर तुरी देऊन पसार झाले .ऐवढाच मर्यादित इतिहास सांगून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो .छञपती शिवरायांनी स्वराज्यात शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला व गवताच्या काडीलाही हात लावायचा नाही .शेतकऱ्यांची फणसाची ,आंब्याची झाडे शेतकऱ्यांच्या परवानगी शिवाय तोडायचे नाही .कारण शेतकऱ्यांनी झाडाची काळजी आपल्या मुला प्रमाणे केलेली असते .लढाईच्या वेळेस पिकाची नुकसान होणार नाही ,घोड्यासाठी चारा लागल्यास मोबदला देऊन घ्यावा .शेतकऱ्यांना कर्ज देणारा ,नापिकी झाल्यास कर्ज माफ करणारा ,बियाणे ,खते औजारे देणारा रयतेची काळजी घेणारा ,लोकल्याणकारी  राजा छञपती शिवराय होते .

स्वराज्यातीलच नव्हेतर परराज्यातील स्ञियांचा आदर-सन्मान करणारे ,कोणी बदअमल केल्यास हात-पाय तोडून चौरंगा करणारे ,संत तुकाराम महाराजांच्या शिकवणी प्रमाणे परस्ञी माते समान मानत होते .छञपती शिवरायांनी मुस्लिम मावळ्यासाठी मस्जिद बांधली ,कुराणाची प्रत मिळाली तेव्हा आदरपूर्वक मुस्लिम मावळ्यास दिली .सैन्यात सरसेनापती नुरखान बेग ,वकील काझी हैदर ,अंगरक्षक सिद्दी इब्राहीम ,आरमार प्रमुख दर्या सारंग ,दौलतखान ,तोफखाना प्रमुख इब्राहिमखान , अफजलखान दगा फटका करणार आहे हे सांगणारा व वाघनखे बनवून देणारा रणदुल्लाखानाचा मुलगा रुस्तमेजमान ,आग्रा येथे सोबत असलेला मदारी मेहतर ,छञपती शिवरायांचे पहिले चिञ काढणारा मीर महमद , 1668 साली राजा हा किताब देणारा औरंगजेब बादशहा ,सातशे पठाण मावळ्यांची फौज होती हे सर्वधर्मसमभाव विचारांचे छञपती शिवाजी राजे होते .361गडकिल्ले बांधले-जिंकले कधी मुहूर्त बघितला नाही .अंधश्रद्धा बाळगली नाही .गडकिल्याचे बांधकाम करत असताना देवाची मुर्ती सापडली तेव्हा ती वितळवून त्याचा उपयोग शेतकरी व स्वराज्यासाठी केला हे विज्ञानवादी विचारांचे शिवराय सांगितले जात नाहीत .छञपती शिवराय निर्व्यसनी होते .आयुष्यात कोणतेही व्यसन केले नाही याचा आदर्श आजच्या तरुणांनी  घेतला पाहिजे .आमच्या इतिहास संशोधकानी खरा इतिहास समोर आणला त्या इतिहासाची पेरणी करण्याचे काम आपले आहे .

मनुवाद्दांनी आमच्या महापुरुषांचे कार्यकर्तृत्व संकुचित ,मर्यादित केले .त्यांना जाती-धर्मात बंदिस्त केले .आज आपणही स्वताला पुरोगामी ,अभ्यासक म्हणवून घेणारे त्यांचेच काम करत आहोत .महापुरुषांची जयंती जाती-धर्मानुसार करत आहोत . असे करणे हे महापुरुषांच्या विचार आणि कार्याच्या विरोधात आहे . दाढी-मिशा वाढवणे ,कपाळावर आडवे कुंकू लावणे ,कानात बाळी घालणे ,दोन चाकी ,चार चाकी गाडीवर राजे ,छञपती ,बघतोस काय मुजरा कर ,राजांचा फोटो लावणे ,जयंतीच्या दिवशी जयघोष करणे केवळ असे केल्याने आपण अनुयायी किंवा वारसदार ठरणार नाही . छञपती शिवरायांचे विचार सदैव आपल्यात असले पाहीजे .छञपती शिवाजी राजांची जयंती ही मनामनात ,घराघरातच नव्हे तर सदैव विचार आणि कृतीत असले पाहीजे .आपण बोलण्यापुरतेच त्यांचे वारसदार आहोत कृती माञ विरोधात करतो हे थांबविले पाहिजे .आज आपण स्वताला अभ्यासक ,प्रचार-प्रसारक समजतो पण कृती माञ विरोधात करतो .या छञपती शिवाजी राजांच्या जयंती निमित्त आपण त्यांचे विचार सदैव कृतीत आणल्यासच खऱ्या अर्थाने जयंती निमित्त अभिवादन ठरेल .


-प्रा.दगडू भरकड 

मराठा सेवा संघ , किनवट

No comments:

Post a Comment

Pages