रमाई : महासूर्याची सावली - यशवन्त भंडारे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 6 February 2022

रमाई : महासूर्याची सावली - यशवन्त भंडारे



रमाईचा ७ फेब्रवारी १८९८ रोजी जन्म झाला तर  २७ मे १९३५ रोजी मृत्यू , या अवघ्या ३७ वर्षाच्या जीवन प्रवासात त्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या महासूर्याच्या सावली झाली...  स्वत: जळत जळत या मातेने या मातेनं बाबासाहेबांवर मायेची सावली धरली... "कोट्यावधी" उपेक्षितांच्या त्या आई झाल्या ... रत्नागिरी जिल्ह्यातील वनंदगावर येथे रमाईंचा  जन्म झाला ... त्यांच्या आईचं नाव रुक्मिनी तर पित्याचं नाव भिकु धोत्रे होतं ... त्यांना अक्का आणि गौरी या दोन बहिणी तर, शंकर हा लहान भाऊ होता... त्यांचे वडील दाभोळ बंदरावर हमालीचं काम करत असतं ... 


 वयाच्या नवव्या वर्षी  म्हणजे १९०७ मध्ये त्यांचा विवाह डाँ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भीमराव आंबेडकर यांच्याशी झाला ... रमाई यांचा  स्वभाव मितभाषी, दृढनिश्चयी आणि स्वाभिमानी होता ... त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनाचा पूर्वभाग अत्यंत काबाड कष्टात, हाल अपेष्टात काढला ... पती परदेशी असता हाल अपेष्टात काढूनही त्यांनी कधी कुरकुर केली नाही किंवा कधी तोंडा वाटे कठोर शब्द काढले  नाहीत ... वेळ प्रसंगी त्यांनी शेणाच्या गोवऱ्या ही थापल्या ... कष्ट केले पण   समाधानी राहून मनाचं औदार्य दाखवत  शुद्ध चारित्र्य राखून त्यांनी एक वेगळी   प्रतिमा निर्माण केली ... 


रमाई म्हणजे शालीनता आणि विनम्रतेच्या मुर्तीमंत उदाहरण होत्या... अडचणीशी दोनहात करत रमाई यांनी आयुष्यभर पतीच्या सुरक्षितेची काळजी वाहिली... बाबासाहेब  युगाला नवा आशय आणि नवी दिशा देण्यात गुंतलेले असताना ... बाबासाहेबांच्या  कृती नि उक्तीनि देशात चक्री वादळे उठत असताना ...बाबासाहेबांच्या   वाणीतून प्रस्थापित सामाजिक व्यवस्था बदलण्यासाठी  लाव्हा ओसंडत असताना ... इकडे रमाई दरिद्राशी एकटीनं भांडत होत्या ... 


रमाई यांना लाभलेल्या  37 वर्षांच्या आयुष्यापैकी  28 वर्ष त्यांनी बाबासाहेबांचा संसार उभा करण्यासाठी आयुष्य वाचलं ... या काळात सासऱ्याचा मृत्यू, नवऱ्याच्या मोठ्या भावाचा मृत्यू आणि गंगाधर, रमेश, इंदू आणि राजरत्न या मुलांचे मृत्यू त्यांनी  पाहिले ... त्या आधी त्यांनी आई -- वडीलांचे मृत्यू पाहिले होते... रमाई यांना या मृत्यूनी दमवलं ... कष्टानं  थकवलं होतं ... बाबासाहेबांच्या काळजीनं  त्याचं काळीज कुरतडलं जात होतं ...


रमाई बाबासाहेबांच्या धगधगत्या जीवनातील आगीतील  चांदणं झाल्या... त्यांनी या धगधगत्या अग्नीत जळण्यातच  गौरव मानला... बाबसाहेबांसारख्या युग प्रवर्तकाचा हात या देशात समग्र पपरिवर्तनासाठी  देशातील क्रांतीची कलमं लिहत असताना रमाई यांनी  त्यावेळी कुटूंबाची चिंता बाबसाहेबापर्यंत  पोचून दिली नाही ... बाबासाहेब आपल्या उपेक्षितांच्या कल्याणाच्या मिशनपासून  विचलीत होऊ नयेत म्हणून रमाईनं आपल्या आयुष्याला चूड लावली...  या त्यांच्या कृतिशील जगण्यातून देशातील कोट्यवधी उपेक्षितांच्या मातृत्वाची महानता त्यांना लाभली ...  


रमाई यांना लिहता -- वाचता येत होतं ...

त्यांनी एकदा बाबासाहेबांना पत्र लिहून

 "बायका माझ्या गरिबीची काशी चेष्टा करतात. माझ्या अंगावर सोन्याच्या एकही दागिना नाही म्हणून हिनवतात " असं सांगितलं  होतं ...  

    

त्यावर बाबासाहेबांनी रमाई यांना

 पत्र  पाठवून  सांगितलं होतं ..

 " रामू कोणालाही मिळाला नसेल असा दागिना कदाचित तुला मिळेल...!  अशा कोट्यावधी लोकांच्या गळ्यातला तुच एक दिवस दागिना होशील...  रामू ,  माणसाला दुःख मोठं करतात ... सुखं  माणसाला मोठ करत नाहीत...ज्यांना मोठं  व्हायच असतं  ते लोक दुखाचे आभार मानतात...  रमा , या दुखाचे तू आभार मान...  ही दुःखं  तुला उजेडात घेऊन जातील..." 

बाबासाहेबांचं हे म्हणणं 

 रमाईंना पटलं होतं ... 


रमाई यांना  १९१३ ते १९२७ या काळात चार मुलगे आणि  एक मुलगी असे पाच अपत्ये झाली... त्यातील यशवंत ऊर्फ भय्यासाहेब  तेवढेच वाचले ... बाबासाहेब आंबेडकरांना  संतती सौख्य लाभलं नाही ... त्यामुळं ते कधी कधी खूप व्यथित होतं असतं ... 


महाड सत्याग्रहानंतर रायगडवर उद्भवलेल्या जीवघेण्या प्रसंगानंतर रमाबाई यांना बाबासाहेबांची फार चिंता वाटे... साहेब घरी येईपर्यत त्यांच्या जीवात जीव राहत नसे... रमाई यांचं  मन विशाल होतं ... त्या प्रेमळ होत्या... त्या कष्टाळू होत्या...  स्वत: च्या मनाला कष्ट देत होत्या... परंतु  दुसऱ्याचं मन दुखवत नसतं ... बाबासाहेबांवर आणि त्यांच्या शिक्षणावर त्यांचं जीवापाड प्रेम होतं .... 


प्रदीर्घ आजारानं त्यांची २७ मे १९३५ रोजी जीवन ज्योत मावळली... सिद्धार्थ गौतमाच्या जीवनात जे अनमोल स्थान यशोधरेला होतं ... सिद्धार्थासाठी यशोधरा जशी चंदनासारखी झिजल्या  ... रमाईसुद्धा डाँ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी अहोरात्र झिजल्या ...  रमाई यांच्या आधारामुळं  डाँ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समाजासाठी देऊ शकले... समाजाला स्वाभिमानानं जीवन जगण्याची शिकवण दिली...रमाई यांच्या अंत:करणाचा चांगुलपणा... त्यांच्या मनाचा उथासपणा ... त्यांच्या चरित्र्याचा निष्कलंकपणा हे बाबासाहेबांना लढण्याचं बळ देत असे ...


                                - यशवन्त भंडारे 

                                 

No comments:

Post a Comment

Pages