डॉ. आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा बसवण्याची व पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्याची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 8 March 2022

डॉ. आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा बसवण्याची व पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्याची मागणी

किनवट,दि.८ : शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नवीन पूर्णाकृती पुतळा उभारून परिसराचे सुशोभिकरण करावे अन्यथा पंधरा दिवसानंतर समस्त आंबेडकरवादी नागरिकांच्या वतीने  आंदोलन करण्याचा इशारा नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना निवेदनाद्वारे आज(ता.८) देण्यात आला आहे.

     निवेदनात नमूद केले आहे की, शहरातील मुख्य मार्गावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा आहे. परंतु, मागील अनेक वर्षापासून या पुतळ्याचे सुशोभीकरण केले नसल्याने पुतळ्यासह परिसराची अवस्था बिकट बनली आहे. पुतळ्याच्या सभोवताली अतिक्रमण वाढले असून आवाराच्या भिंतीला तसेच पुतळ्याच्या पायथ्याला भेगा पडल्या आहेत.आंबेडकर अनुयायी दरवर्षी अशाच अवस्थेत या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम साजरे करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व परिसराचे सुशोभीकरण करावे यासाठी आंबेडकरवादी नागरिकांच्या वतीने यापूर्वी अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर नगरपरिषदेने नवीन पुतळा उभारणी संदर्भात सभागृहात ठराव पास केला, मात्र, ठरावाच्या अनुषंगाने कित्येक वर्षे लोटली, तरी कार्यवाही झाली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नवीन पूर्णाकृती पुतळा उभारून सुशोभीकरण करण्यास नगरपालिका जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असून या पुतळ्याकडे नगरपालिका जातीय द्वेषभावनेतून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. नगरपरिषदेने पंधरा दिवसात नवीन पुतळा उभारण्या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी अशी समस्त आंबेडकरवादी नागरिकांची मागणी आहे. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास नागरिकांच्या वतीने नगरपालिके विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर राहुल कापसे, अ‍ॅड.सम्राट सर्पे, अभय नगराळे, सम्राट कावळे, दया पाटील, मारुती मुनेश्वर, राहुल गिमेकर, सचिन कावळे, निखील कावळे, विशाल हलवले सुबोध परेकर यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages