किनवट, दि.26 (प्रतिनिधी) : किनवट तालुक्याला यंदाच्या (2022) खरीप हंगामासाठी रासायनिक खतांच्या विविध ग्रेडचा 15 हजार 812 मे.टन खतसाठा मंजूर झाला आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी दिली.
किनवट तालुक्यातील खरीप हंगामातील रासायनिक खतांचा वापर सरासरी 20 हजार मे.टन च्या आसपास आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी तालुका कृषी कार्यालयाकडून रासायनिक खतांच्या विविध ग्रेडच्या 20 हजार 538 मे.टन खतांची मागणी किनवट तालुक्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्यांकडे करण्यात आली होती. परंतु, कृषी आयुक्तालयाकडून जिल्हापातळीवरसुद्धा मागणीच्या तुलनेत कमीच खतांसाठी मंजूरी देण्यात आली. त्यात किनवट तालुक्यासाठी खतांच्या विविध ग्रेडचा 15 हजार 812 मे.टन खतसाठा मंजूर करण्यात आलेला आहे. यंदा सर्वच ग्रेडच्या खतांच्या मागणीच्या तुलनेत कमी साठा मंजूर करण्यात आला आहे.
किनवट तालुक्यातील खरीप हंगामासाठी मागणी करण्यात आलेला विविध ग्रेडचा खतसाठा मेट्रिक टनमध्ये पुढीलप्रमाणे असून, मंजूर झालेली खतांची मात्रा पुढील कंसात दर्शविलेली आहे.
युरीया (नत्र) 5,842(4,955 ), डीएपी (डायअमोनियम फॉस्फेट) 3,670 (2,920), एमओपी (पोटॅश) 1,423(1,377), कॉम्प्लेक्स एनपीके (संयुक्त खते) 6,419(4,639), अमोनियम सल्फेट 487 (निरंक), सिंगल सुपर फॉस्फेट (स्फुरद) 2,696 (1,921).
गतवर्षीपासूनच खतांच्या किमतीत मोठी वाढ झालेली आहे. परंतु, शासनाने यंदा अनुदानात वाढ केलेली नाही. त्यामुळे काही कंपन्यांनी डीएपी व एमओपी (पोटॅश) या खतांच्या दरामध्ये वाढ केलेली आहे. डीएपी खताच्या दरात 150 रु. पोटॅशमध्ये 700 रुपये तर संयुक्त खतांच्या विविध प्रकारात 225 ते 320 रुपयांपर्यंत वाढ झालेली आहे. जागतिक बाजारात कच्च्या मालाचे दर वाढल्यानंतर केंद्र सरकारने डीएपी खताच्या अनुदानात 700 रुपये वाढ करून 1200 रु.केले होते. मात्र सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खतांच्या दरात पुन्हा वाढ झालेली असल्यामुळे, याचा फटका शेतकर्यांना बसत आहे. खतांचा आयातखर्च वाढतच असल्यामुळे कंपन्या अजूनही दरवाढ करू शकतात अशी चर्चा आहे. त्यामुळे सरकारने खतांच्या अनुदानात वाढ करणे गरजेचे असल्याचे मत याविषयातील जाणकार व्यक्त करीत आहेत.
“ जागतिक स्तरावर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे खतांची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून शेतकर्यांनी रासायनिक खतांचा वापर पिकांसाठी योग्य प्रमाणात उपलब्ध होईल, अशा रितीने करावा. सोबतच पेरणी करतेवेळेस बीज प्रक्रियेकरिता जीवाणू संवर्धकाचा वापर आवर्जुन करावा.”
बालाजी मुंडे, तालुका कृषी अधिकारी, किनवट.
No comments:
Post a Comment