दिनांक 14 : जीवन जगण्याची प्रेरणा देणारे अष्टपैलू व्यक्तीमत्त्व म्हणजे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या विचारांचा जागर करत समाजोपयोगासाठी प्रत्येकाने स्वत:च्या कार्याप्रती प्रामाणिक राहून जनसेवेचे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात जिल्हाधिकारी चव्हाण बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण आणि विवेकानंद महाविद्यालयाचे प्रा. अनिल लहाने यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता, गती आणण्यासाठी प्रत्येकाने सकारात्मकपणे पुढाकार घ्यावा. अष्टपैलू व्यक्तीमत्त्व असलेल्या डॉ. बाबासाहेबांनी सर्वच् क्षेत्राला स्पर्श करत देशासाठी महान असे कार्य केलेले आहे, ज्यामध्ये जलसंधारण, पाणी व्यवस्थापन, पर्यावरण, पंचायत राज व्यवस्था, कायदे आदींचा उल्लेख करता येईल. आपल्या देशाचा सर्व कारभार त्यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानानुसार चालतो, यातूनच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतुलनीय कार्याची प्रचिती आपणास येते. म्हणून प्रत्येकाने डॉ. बाबासाहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन वाचनाला प्राधान्य देत आपापल्या कार्याला परिपूर्ण करण्यासाठी आग्रही रहावे, त्यासोबतच कामाप्रती प्रामाणिकता असावी, असेही जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले. प्रा. लहाने यांनी डॉ. बाबासाहेबांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकतानाच त्यांच्या अंगी असलेल्या जिद्द, सोबत, शिक्षणाची गोडी आणि चारित्र्य संपन्नता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक घटनांचा ऊहापोह देखील त्यांनी आपल्या व्याख्यानातून करताना प्रत्येकाने बाबासाहेबांचे विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवावेत, असे आवाहन केले. महामानव केवळ व्यक्ती नसून विचार असल्याचेही ते म्हणाले. जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी संघटना, जिल्हा वाहन चालक संघटना, जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा तलाठी संघ, जिल्हा कोतवाल कर्मचारी संघटनांचे सर्व पदाधिकारी, सदस्य, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थिती होती. यावेळी संघटनेचे श्री.जराड, महेंद्र गिरगे, सूर्यवंशी यांनीही विचार व्यक्त केले. सुरूवातीला डॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी चव्हाण यांनी अभिवादन केले. तसेच उपस्थित सर्वांनीही डॉ. बाबासाहेबांचा प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप त्रिभूवन यांनी केले. आभार श्रीमती मनोरे यांनी मानले.
Thursday, 14 April 2022
जीवन जगण्याची प्रेरणा म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
Tags
# मराठवाडा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
मराठवाडा
Labels:
मराठवाडा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment