‘माता रमाई आधारवेल’ नाटकाचे प्रकाशन प्रा. दत्ता भगत यांनी रेखाटलेली रमाई अधिक प्रगल्भ आणि प्रेरणादायी ज्योती बगाटे यांचे प्रतिपादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 27 May 2022

‘माता रमाई आधारवेल’ नाटकाचे प्रकाशन प्रा. दत्ता भगत यांनी रेखाटलेली रमाई अधिक प्रगल्भ आणि प्रेरणादायी ज्योती बगाटे यांचे प्रतिपादन


नांदेड: माता रमाई ह्या केवळ बाबासाहेबांची सावली नव्हत्या तर प्रज्ञावंतच्या प्रेम आणि सहवासाने त्या देखील समंजस झाल्या होत्या. प्रा. दत्ता भगत यांनी नाट्यकृतीतून रेखाटलेली रमाई ही आंबेडकरी कार्यकर्त्यांना समजून घेणारी, त्यांना जीव लावणारी आहे. संकटसमयी कणखरता दाखविणारी नाट्यकृतीतील रमाई अधिक प्रगल्भ आणि प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन अपर कोषागार अधिकारी ज्योती बगाटे यांनी केले.

कल्चरल असोसिएशनच्या वतीने माता रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सुप्रसिद्ध नाटककार तथा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. दत्ता भगत यांनी लिहिलेल्या ‘माता रमाई आधारवेल’ या नाटकाचे अपर कोषागार अधिकारी ज्योती बगाटे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध अनुवादक तथा हिन्दी साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. गणेशराज सोनाळे होते. यावेळी मंचावर सुप्रसिद्ध कवयित्री प्रा. संध्या रंगारी, पुस्तकाचे प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी (निर्मल प्रकाशन) व कल्चरलचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र गोणारकर हे उपस्थित होते.

प्रा. संध्या रंगारी यांनी दत्ता भगत यांच्या नाट्य लेखनाचे मर्म उलगडून सांगतांना नाटकाची शैली आणि त्यातील आशयसंपन्नता यामुळे भगत हे भारतीय पातळीवरचे नाटककार आहेत असे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या यशवंत मनोहर यांच्या भावव्याकुळ भाषा व लेखन शैलीमुळे त्यांनी लिहिलेली रमाई कादंबरी लोकप्रिय ठरली. पण तर्काच्या सेतूने काळाच्या अंतरंगात शिरून रमाईच्या व्यक्तिमत्वाचे लपलेले पैलू दत्ता भगत यांनी नाटकातून उत्कटपणे पुढे आणले आहेत, ते अधिक मोलाचे आहेत.  

प्रा. दत्ता भगत म्हणाले, आजवर मी वास्तवदर्शी नाटके लिहीत आलो पण माता रमाई यांच्या जीवन चरित्राचे उपलब्ध संदर्भ आणि त्याकाळची परिस्थिती लक्षात घेत शक्यता आणि संभाव्यता याच्या आधारे मी माता रमाई यांच्या व्यक्तिमत्त्वावर नाट्यकृती लिहिली आहे, हा इतिहास नाही ही माझी सृजनशील कलाकृती आहे. हे नाटक नाही खरंतर ही संवादिका आहे.

अध्यक्षीय समारोप करतांना हिन्दी साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. गणेशराज सोनाळे म्हणाले, दलित वंचित माय माऊल्यांच्या वाट्याला कष्ट आणि दु:ख आले. असेच दु:ख रमाईच्या वाट्यालाही आले पण त्याची पर्वा न करता त्यांनी बाबासाहेबांना आजन्म जपले. अशा माता रमाईचा आपण सदैव सन्मानच केला पाहिजे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले तर डॉ.गंगाधर सोनकांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमास कल्चरलचे सचिव डॉ. विजयकुमार माहुरे, माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे, माजी शिक्षण संचालक नंदन नांगरे, डॉ. कविता सोनकांबळे  डॉ.आदिनाथ इंगोले, रमेश सोनाळे, प्रा. पंडित सोनाळे, डॉ. रमेश ढगे, डॉ. जे.टी. जाधव, डॉ. मालोजी पाळेकर, इंजि. अनिल लोणे, एस. जे. शिरसे, डॉ. चंद्रशेखर एंगडे आदिसह साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

 


 सुप्रसिद्ध नाटककार प्रा. दत्ता भगत लिखित “माता रमाई आधारवेल” या नाटकाचे प्रकाशन प्रसंगी डावीकडून  प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर, कवयित्री संध्या रंगारी, अपर कोषागार अधिकारी ज्योती बगाटे, प्रा. दत्ता भगत, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी, प्रा. डॉ. गणेशराज सोनाळे.

No comments:

Post a Comment

Pages