किनवट,(प्रतिनीधी) : तालुक्यात 25 जून पासून सुरू झालेल्या कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत अद्ययावत तंत्रज्ञान व कृषीविषयक अत्याधुनिक माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविली जात आहे. या अनुषंगाने मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहाय्यकांमार्फत येत्या 01 जुलैपर्यंत ग्राम कृषी विकास समितीच्या बैठका विविध गावात घेऊन गावातील शेतीचे नियोजन कसे करावे, याबाबत तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी दिली.
खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत संपूर्ण राज्यात दि.25 जून ते 01 जुलै 2022 या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर किनवट तालुका कृषी विभागातर्फे सर्व अधिकारी व कर्मचारी आपापल्या कार्यक्षेत्राच्या गावांमध्ये शेतीशाळा,चर्चासत्रे, प्रात्यक्षिके आदी उपक्रमांसोबतच शिवारफेरीद्वारे शेतकर्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
या कृषी संजीवनी सप्ताहातील शनिवार(दि.25)रोजी विविध पिकांचा प्रसार, मुल्यसाखळी बळकटीकरण दिन, कापूस व सोयाबीनसाठी उत्पादकता वाढ, भात व कडधान्य लागवडीचा प्रसार, बीजप्रक्रिया, वाण निवड, अतिघन कापूस लागवड आणि ‘बीबीएफ’लागवडीची प्रात्यक्षिके, कीड व रोग नियंत्रण जागृती या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
रविवार(दि.26) रोजी पौष्टिक तृणधान्य दिनानिमित्त ज्वारी,बाजरी,नाचणी,वरई लागवडीचे तंत्रज्ञान व त्यांचे आहारातील महत्व, पौष्टिक तृणधान्याच्या प्रक्रिया, मुल्यवर्धन, प्रक्रिया केंद्रांना भेटी देण्यात आल्या. सोमवार(दि.27) रोजी महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिनानिमित्त महिला शेतकर्यांसाठी चर्चासत्रे, परिसंवाद, कौशल्य विकास आधारीत प्रशिक्षण, यंत्रसामुग्रीची माहिती, प्रक्रिया व सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मंगळवार (दि.28) रोजी खत बचत दिनानिमित्त जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापरासाठी जागृती, विविध सरळ खते, सूक्ष्म मूलद्रव्ये, विद्राव्य खतांचा वापरासाठी प्रबोधन व खताच्या अतिवापरामुळे होणार्या दुष्परिणामाबाबत माहिती दिली गेली. बुधवार (दि.29) रोजी प्रगतिशील शेतकरी संवाद दिवस अंतर्गत रिसोर्स बँक मधील शेतकर्यांचा रिसोर्स पर्सन म्हणून आमंत्रित करून त्यांनी अवलंबिलेले तंत्रज्ञान इतर शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल व यशोगाथा कार्यशाळेचे आयोजन करून, समूह माध्यमातून यशोगाथांची माहिती शेतकर्यांना दिली जाईल. गुरूवार (दि.30) रोजी शेतीपूरक व्यवसाय तंत्रज्ञान दिवसांतर्गत पारंपरिक शेतीला उत्तम जोडधंधा म्हणून फलोत्पादन, संरक्षित शेती, भाजीपाला व फुलशेती, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, रेशीम,मधुमक्षिकापालन, सहकार, खादी या विषयांची माहिती शेतकर्यांना दिली जाणार आहे. शुक्रवार दि.01 जुलै रोजी कृषीदिनाचे औचित्य साधून कृषी संजीवनी सप्ताहाची सांगता केली जाणार आहे.
“किनवट तालुक्यातील शेतकर्यांनी ‘कृषीं संजीवनी सप्ताह’ निमित्त दि.25 जून ते 01 जुलै दरम्यान होणार्या गावबैठकींमध्ये सध्याची पिक परिस्थिती, हवामान, कीड व रोग नियंत्रण, बीजप्रक्रिया, बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारा पेरणी आदींविषयी गावस्तरावर मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी या मार्गदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा. या माहितीचा उपयोग करून शेतात प्रगत तंत्रज्ञान वापरल्यास पिकवाढीसाठी ते नक्कीच उपयुक्त ठरेल.”
- बालाजी मुंडे. तालुका कृषी अधिकारी, किनवट
No comments:
Post a Comment