राज्यसभा निवडणूक : शिवसेनेला धक्का देत भाजपचे धनंजय महाडिक विजयी..! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 10 June 2022

राज्यसभा निवडणूक : शिवसेनेला धक्का देत भाजपचे धनंजय महाडिक विजयी..!

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. मविआची ९ मते फुटली आहेत. भाजपच्या धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला .शिवसेनेचे संजय राऊत, काँग्रेसचे इमरान प्रताप गढी, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे हे पहिल्या फेरीतच विजयी झाले आहे.


पहिल्या पसंतीची संजय पवार यांना ३३ आणि धनंजय महाडिक यांना २७ मते मिळाली आहेत. त्यामुळे दुसऱ्या फेरीमध्ये हा निर्णय गेला आहे. पहिल्या फेरीमध्ये भाजपचे पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना ४८-४८ मते मिळाली आहेत. त्यामुळे त्यांच्या मताचा फायचा हा धनंजय महाडिक यांना झाला. दुसऱ्या फेरीची मतमोजणीत ते विजयी झाले. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस होती. भाजपने आपली खेळी यशस्वी करत आपला सहावा उमेदवार निवडून आणला.


त्यासाठी एक- एक मत महत्त्वाचे होते. अशात आता शिवसेनेला धक्का बसला होता. आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. त्याचवेळी यशोमती ठाकुर, जितेंद्र आव्हाड व भाजपचे मुनगंटीवार आणि रवी राणा यांचे मत वैध ठरवण्यात आले.


या निर्णयानंतर वैध आणि अवैध मते मोजण्यात आली. त्यामध्ये २८४ मते वैध ठरली होती. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला होता. त्यानंतर झालेल्या मत मोजणीत आघाडीचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. दुसऱ्या फेरीमध्ये संजय पवार विजयी होतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला होता.

तब्बल ६ तासांच्या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर अखेरीस आक्षेप घेण्यात आलेल्या ५ मतांपैकी केवळ शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आले आहे. घडी न घालता मतपत्रिका बाहेर आणणे, आपल्या पक्ष प्रतोदासह मतपत्रिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतोदाला दाखविणे हे भाजपचे आक्षेप निवडणूक आयोगाने मान्य केले, असून त्यांचे मत बाद ठरविण्यात आले होते.  

दरम्यान धनंजय महाडिक यांच्या कोल्हापूर येथील कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. रात्रभर कार्यकर्ते टी व्ही समोर बसून निकालाचा कल पाहत होते.

No comments:

Post a Comment

Pages