किनवटमध्ये बैलपोळा उत्साहात साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 28 August 2022

किनवटमध्ये बैलपोळा उत्साहात साजरा

किनवट, दि.28,(प्रतिनिधी) :  बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी किनवट शहरासह तालुक्यातील  विविध गावांत बैलपोळ्याचा  सण आनंद व उत्साहात साजरा करण्यात आला.


   पोळ्याच्या पूर्वसंध्येला बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकल्यानंतर  खांदामळणी केली जाते. बैलांच्या खांद्यावर वर्षभर ओझे असते म्हणून तो खांदा मळला जातो. पोळ्याच्या दिवशी दोन्ही बैलांना स्वच्छ धुऊन, त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घातले गेले. आपली बैलं सर्वांमध्ये उठून दिसावीत म्हणून प्रत्येक शेतकरी आपापल्या ऐपतीप्रमाणे आपल्या बैलांना असा साजशृंगार करतात. गावाच्या सीमेजवळ (आखर) किंवा मंदिराजवल एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. गावातील सर्व बैलजोड्या वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत तिथे एकत्र आणल्या जातात. या वेळेस ‘झडत्या’ (पोळ्याची गीते)म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, ‘मानवाईक’(ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील, श्रीमंत, जमीनदार) यांच्यातर्फे तोरण तोडले गेल्यानंतर पोळा ‘फुटतो’. पुढे बैलं गावातील मारुतीच्या वा महादेवाच्या देवळात नेण्यात येतात.  किनवट येथे शेतकर्‍यांनी मारुतीच्या मंदिरात बैलांबरोबर सामूहिक पूजन करून प्रदक्षिणा घालीत यंदा शेतात चांगले उत्पन्न निघू देत अशी प्रार्थना केली. त्यानंतर  त्यांना घरी घेऊन गेल्यानंतर घरातील सुवासिनींनी बैलांची विधिवत पूजन करून त्यांना ओवाळण्यात आल्यानंतर,आपल्या सर्जा-राजाला  गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखविला गेला. त्यासोबत काही लोक त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान मांडतात.  यावेळी घरी बैलं घेऊन येणार्‍यास ‘बोजारा’ (पैसे) देण्यात येतात. या दिवशी गावातील इतर घरातूनही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते. शेतकर्‍याला औक्षण करून त्याला नारळ दिले जाते तर बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते. महाराष्ट्रातील काही गावामध्ये या दिवशी बैलांच्या शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जातो. ज्या शेतकर्‍याचा बैल पोळा फोडेल म्हणजेच शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते व शेतकर्‍याच्या डोक्यावर मानाचा फेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो.


 आधुनिक शेती व यांत्रिकीकरणामुळे किनवट शहरात बैलांची संख्या पूर्वीपेक्षा कमी झालेली दिसली. यंदा ओल्या दुष्काळाचे सावट असतांनाही शेतकर्‍यांनी केवळ परंपराच टिकवली नाही तर आपला उत्साह ही दाखवून दिला. गेली दोन वर्ष कोरोनामुळे हा सण साजराही करता आलेला नव्हता. यंदा मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने उधार-उसणवार करून का होईना शेतकर्‍यांकडून मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात आपल्या जिव्हाळ्याचा बैलपोळा सण साजरा करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Pages