नांदेड दि. 25 :- नांदेड जिल्ह्यात लम्पी बाधित पशुधनाची संख्या (गाय वर्ग) 100 एवढी झाली असून जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणावर अधिक भर दिला आहे. रविवार दिनांक 25 रोजी संपूर्ण जिल्हाभर लसीकरणावर नियोजनबद्ध भर देऊन 59 हजार 870 एवढ्या पशुधनाचे लसीकरण करण्यात आले. आजवर जिल्ह्यात एकुण 2 लाख 1 हजार 615 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे.
लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छता, पशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर किटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.
आजच्या घडिला नांदेड जिल्ह्यातील 21 गावे लम्पी बाधित आहेत. या 21 गावातील एकुण गाय वर्ग पशुधन हे 10 हजार 266 एवढे आहे. यातील 100 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या 5 किमी परिघातील गावांची संख्या 141 एवढी आहे. एकुण गावे 162 झाली आहेत. या बाधित 21 गावांच्या 5 किमी परिघातील 162 गावातील (बाधित 21 गावांसह) एकुण पशुधन संख्या ही 59 हजार 138 एवढी आहे. लम्पीमुळे मृत पशुधनाची संख्या 5 एवढी झाली आहे. उपलब्ध लसमात्रा 2 लाख 60 हजार एवढी असून पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशुची स्वच्छता, गोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment