पालकांनी मुलींना धैर्य द्यावे - आमदार भीमराव केराम ; आपल्या कर्तव्यातून काही घरे उजळल्याचा सर्वोच्च आनंद - किर्तीकिरण पुजार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 8 September 2022

पालकांनी मुलींना धैर्य द्यावे - आमदार भीमराव केराम ; आपल्या कर्तव्यातून काही घरे उजळल्याचा सर्वोच्च आनंद - किर्तीकिरण पुजार

नांदेड दि. 8 :- स्वत:च्या उपजत आदिवासी ज्ञानाला जवळ करत या मुलींच्या पालकांनी मनाची घालमेल सांभाळून शाळेत घातले. शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट अंतर्गत या मुली निवासासह बारावी पर्यंत शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सिद्धही झाल्या. पुढे काय हा प्रश्न त्यांच्या समोर होता. सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प संचालक किर्तीकिरण एच. पुजार  यांनी या मुलींच्या मनातील घालमेल ओळखली. 

 

शिक्षणासाठी घरच्या मर्यादा लक्षात घेऊन या मुली जिद्दीने बारावी पर्यंत शिकल्या. पुढील शिक्षणापेक्षा कायदानुसार वय पूर्ण झाले की लागलीच लग्न लावून मोकळे होणे ही जवळपास सर्व आदिवासी पालकांची मानसिकता या मुलींच्या भविष्याला मर्यादा घालणारी आहे. यापेक्षा या मुलींना स्वयंरोजगाराच्यादृष्टिने, त्यांच्या पायावर त्यांना उभे करण्याच्यादृष्टिने दोन वर्षापूर्वी पुजार यांनी टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीशी बोलणे केले. सामाजिक कृतज्ञता आणि तत्परता यासाठी आदर्श मापदंड निर्माण करणाऱ्या टाटा कंपनीने यावर तात्काळ प्रतिसाद देत मुलींच्या निवडीसाठी सरळ किनवट गाठले. 


ज्या आदिवासी मुलींना स्वत:ला सिद्ध करायचे आहे अशा मुलींनी पुढे यावे असे आवाहन करून प्रकल्प संचालक पुजार यांनी आदिवासी तालुका असलेल्या किनवट येथे दोन दिवसीय शिबिर आयोजित केले. याची यवतमाळ, धारणी येथील केंद्रांना कल्पना देऊन तेथील मुलींनाही निमंत्रित केले. दिनांक 6 व 7 सप्टेंबर रोजी झालेल्या दोन दिवसीय शिबिरासाठी 600 मुली यात सहभागी झाल्या. टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने एक स्वतंत्र मानव संसाधन विभागाचे पथक बेंगळूरू येथून दाखल झाले. त्यांनी त्यांच्या निवड पद्धतीने यातील तब्बल 410 मुलींची निवड केली. या सर्व मुलींना बेंगळूरू येथे विशेष प्रशिक्षण देऊन तेथून 50 किमी अंतरावर असलेल्या होसुर येथील टाटाच्या मोबाईल पार्टस् व इलेक्ट्रॉनिक्स विभागात रुजू केले जाणार आहे. 

तलाईगुडापाडा येथील या मुलींपैकी एक असलेले पालक राजाराम मडावी यांनी आपल्या मुलीच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. हा आनंद व्यक्त करतांना राजाराम व त्याची पत्नी अत्यंत भाऊक झाली. आमच्या पिढ्यांनी तालुक्याबाहेर जास्त दूरचे जग कधी बघितले नाही. मात्र पुजार यांच्या एका छोट्याशा प्रयत्नातून मुलगी बेंगळूरूला जाते ती सुद्धा नौकरीसाठी असे सांगून आपल्या आनंद अश्रुंना वाट मोकळी करून दिली. याच भावना इतर पालकांच्या नसतील तर नवलच !  

 

पालकांनी मुलींना धैर्य द्यावे - आमदार भीमराव केराम 

आदिवासी भागातील मुलींना शासनाच्या विविध योजनांमुळे शिक्षणाची संधी मिळाली. मुलींच्या पालकांनीही थोडे धैर्य दाखवून शिक्षणासाठी त्यांना बाहेर वसतीगृहात ठेवण्यास अनुमती दिली. हे जरी खरे असले तरी शिक्षण घेतल्यानंतर मुलींना जेंव्हा स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी मिळते तेंव्हा पालकांनी वेगळा विचार न करता धैर्याने त्यांच्या सोबत उभे राहून मुलींना हिंमत द्यावी असे आवाहन आमदार भीमराव केराम यांनी केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट व प्रकल्प संचालक किर्तीकिरण एच पुजार यांनी हाती घेतलेल्या या विशेष उपक्रमाचे त्यांनी कौतूक केले. टाटा सारखी कंपनी किनवटच्या आदिवासी भागात येते हे आम्हा सर्वांसाठी भूषणाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. 

आपल्या कर्तव्यातून काही घरे उजळल्याचा सर्वोच्च आनंद - किर्तीकिरण पुजार  

आपली शासकीय कर्तव्य बजावताना वास्तविक पाहता प्रत्येकाला समाज ऋण फेडण्याची, समाजाप्रती कृतज्ञता जपण्याची संधी मिळत असते. आदिवासी प्रकल्पातील काम हे मानवी मुल्यांना, मागास असलेल्या घरांना नवा प्रकाश देणारे असते. शासनानी ज्याही काही योजना हाती घेतलेल्या आहेत त्या या घटकातील प्रत्येकांना प्रकाश वाटा दाखविणाऱ्या आहेत. मी फक्त यांच्या रोजगारा संदर्भात टाटा कंपनीसमवेत बोललो व याला यश आल्याची भावना आदिवासी प्रकल्प संचालक तथा सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी व्यक्त केली. 


No comments:

Post a Comment

Pages